फेसलेस क्राईमचे आव्हान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ई-बँकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मीडिया आदिंचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे अद्ययावत तंत्रज्ञान प्रगतीसाठी जसे वरदान ठरले आहे, तसा त्याचा वापर करून काही समाजविघातक कारवायाही होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवणे, डाटा चोरी, ई-मेल हॅक करणे, अश्लील मेसेज, इंटरनेटद्वारे फसवणूक, बदनामी, दहशतवादी कटकारस्थाने, एटीएम संबंधित गुन्हे, सोशल मीडियावर बनावट अकाऊंट एक ना अनेक… अशा घटनांना अनेक जण बळी पडतात. दैनिकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये, आकाशवाणी किंवा वृत्तवाहिन्यांवर आपण रोज अशा अनेक बातम्या वाचतो, ऐकतो, पाहतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरून गुन्हे करण्याच्या नवनव्या क्लृप्त्या हे गुन्हेगार शोधून काढतात. कायदा आणि सुव्यवस्थेपुढे उभे राहिलेले हे एक आव्हान आहे.

पण, आता गुन्हेगारी प्रवृत्तींच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सायबर गुन्ह्यांना आळा बसावा व कायद्याचा वचक राहावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागामार्फत महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते. गृह विभागामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर गुन्हे व महिला अत्याचार प्रतिबंध) ब्रिजेश सिंह यांच्या अधिपत्याखाली हा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 51 ठिकाणी सायबर लॅब उभारण्याचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत अद्ययावत डाटा सेंटर उभारले जाणार असून, त्यामुळे फरारी गुन्हेगारांना पकडण्याबरोबरच गुन्ह्यांची उकल होऊन, अपराधदोषसिद्धीचे प्रमाण वाढवणे शक्य होणार आहे.

सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयात या सायबर लॅबचे उद्घाटन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते झाले. अद्ययावत तंत्रज्ञान, पुरेसा निधी आणि प्रशिक्षणामुळे सांगली जिल्हा पोलीस दल सायबर गुन्ह्यांवर वॉच ठेवायला सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयात दोन कक्षामध्ये ही लॅब विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये 5 संगणक, लॅपटॉप, आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण वातानुकुलित अशी ही सायबर लॅब आहे. चौकशी अधिकारी आणि सायबर लॅबमधील तंत्रज्ञ यांच्यात संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स हॉलही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तपासणीसाठी आणलेले हॉर्डवेअर सुरक्षित राहण्यासाठी आग प्रतिबंधक स्टोरेजही आहे. आवश्यक प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास आणि अशा गुन्ह्यांतील जप्त संगणकीकृत पुराव्यांची तपासणी याकरिता ही लॅब उपयोगी पडणार आहे.

सायबर सेलचे प्रभारी अधिकारी अंजीर जाधव हे या लॅबचे प्रमुख आहेत. लॅबमध्ये सध्या सात कर्मचारी असून ही संख्या लवकरच 10 इतकी होणार आहे. ही टीम संगणक, ई-मेल्स, व्हॉटस् ॲप, फेसबुकवर वॉच ठेवणार आहे. आक्षेपार्ह संदेशांचे विश्लेषण करणार आहे.

याचबरोबर फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले आहे. वस्तुस्थितीजन्य पुराव्यांसाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक एविडन्स (पुरावे) जमा करण्यास मदत होणार आहे. न्यायालयातही ते ग्राह्य धरले जाणार आहेत. पुरावे गोळा करणे, त्याचे विश्लेषण यांच्यासाठी उपकरणे आणि साधनसामग्री मिळाली आहे. त्यामुळे साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. गुन्ह्यांचा शोध व प्रतिबंध यासाठी पोलीस खात्याला यामुळे मदत होणार आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याबरोबरच सबळ पुरावे गोळा करण्यास हे सर्व उपयुक्त ठरणार आहे.

एकूणच जिल्ह्यात कायद्याचे राज्य स्थापित करण्यासाठी आणि कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी तसेच समाजविघातक कारवाया वेळीच रोखण्यासाठी सायबर लॅब आणि फिरत्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या माध्यमातून सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे.

– संप्रदा द. बीडकर,
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगली.

Leave a Reply

Your email address will not be published.

फेसलेस क्राईमचे आव्हान

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डॉ. नागशेट्टी ह्यांचे लिंगायत युवाकडून अभिनंदन

कडेगाव: लिंगायत धर्माचे प्रसिद्ध अभ्यासक व तज्ञ शरण नागशेट्टी शेटकर ह्यांनी १९ ऑगस्ट २०१६ "लिंगायत धर्माचा दार्शनिक अभ्यास" ह्या विषयावरील

Close