आपला माणूस, वर्दीतला माणूस !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

म.पो… महाराष्ट्र पोलीस.. आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर. आपल्या रक्षणासाठी ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेऊन त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.

पोलीसदल हे शासनाच्या नेतृत्वाखाली लोकांच्या संरक्षणासाठी असणारे असे भक्कम दल आहे, ज्यांच्यावर सामान्य नागरिकांपासून ते सर्वच मोठ्यास्तरातील लोकांच्या सुरक्षा व्यवस्थेची जवाबदारी असते. उन्हातान्हात, पाणी पावसात, वादळ वाऱ्याला झुंज देत आपले महाराष्ट्र पोलीस स्वतःच्या जीवाची परवा न करता हजर असतात. मोर्चा असो किंवा आंदोलन, राजकीय सभा असो किंवा दंगल आपल्या पोलिसांना सतत जागरूक राहून त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागते. ही बाब लक्षात घेऊनच शासनाने नुकताच लोकराज्य मासिकाचा ”आपले पोलीस” हा विशेषांकही प्रसिद्ध केला आहे.

पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावताना अनेक अडचणी येत असतात तरी ही त्या अडचणीवर मात करून ठामपणे उभं राहून वर्दीतला माणूस आपले कर्तव्य बजावत असतो. फक्त लोकांचे रक्षण करणे आणि समाजात शांतता सुव्यवस्था निर्माण करणे याशिवाय विचारांच्या पलीकडे प्रत्येक क्षेत्रांत पोलीस आपले काम कोणतीही तक्रार न करता करत असतात. हत्या, चोरी, खून, घातपात अशा घटनांचा शोध घेणे, अपघातस्थळी जाऊन त्याबद्दल सविस्तर माहिती घेणे, पासपोर्ट कागदपत्रांची पडताळणी करणे, घरगुती हिंसा हाणामारी नवरा बायकोची भांडणे सोडवणे, रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीची समस्या सोडवणे, आग लागल्यास त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांची मदत करणे, हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यापासून ते दुष्काळ, भूकंप, त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा पोलीस कटाक्षाने आपली कामगिरी बजावत असतात.

पोलिसांची कामगिरी इकडेच थांबत नाही तर क्रिकेट मॅच, सिनेतारकांचे कार्यक्रम, जाहीर सभा, गणपती विसर्जन, जुम्मे की रात, ईद, महत्त्वाच्या लोकांचे भाषण या सर्व ठिकाणी पोलिसांची उपस्थिती अनिवार्य असते. १२ महिने ३६५ दिवस पोलीस स्टेशन चालू असते. सणासुदीला आपण सगळे आपल्या कुटुंबासोबत मज्जा करत असतो तेव्हा रस्त्यावर कुठे तरी तासन्तास उभं राहून पोलीस आपली ड्युटी करत असतात. कारण पोलिसांना सुट्टी नसते.

आपण आपल्या छोट्या-छोट्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर येतो, भांडण करतो उगाच जाळपोळ करून आपल्याच संपत्तीच नुकसान करतो. तेव्हा पोलीस बंदोबस्तासाठी उभे असतात आपलं म्हणनं शांतपणे ऐकून घेण्यासाठी. पण आपण काय करतो, पोलिसांची भूमिका समजून न घेता समोरच्यावर बोट दाखवून मोकळे होतो.
आपण स्वत: जर नियमांचे पालन केले, समाजात शिस्त निर्माण करून आधी स्वतःला थोडी शिस्त लावली तर बांद्रासारख्या ठिकाणी स्वत:चे कर्तव्य पार पाडणाऱ्या स्व. विलास शिंदेचा दुर्देवी मृत्यू झाला नसता. आपल्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती हवीच कारण पोलिसांच्या टोपीचा हेवा प्रत्येक जणाला वाटतो. पण अनेक अडथळे समस्या झेलून त्या टोपी मध्ये किती घाम येतो हे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच माहित असते. कुजलेल्या अवस्थेत असणाऱ्या एका मृत देहाजवळ ज्यातून प्रचंड घाण वास येत होता अशा ठिकाणी पोलीस तैनात होते, जिकडे सामान्य नागरिक जाण्यास ही नाक मुरडत होते. मदत तर खूप दूरच राहिली अशा परिस्थितीत पोलिसानी तो मृतदेह बाहेर काढला. मग पोलीस सामान्य नागरिक नाही का? ते कोणत्या श्रेणीत येतात. तरीही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस न डगमगता आपल्या पराक्रमाने दाखवतात.

जिगर, साहस आणि शौर्य. २६/११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्वश्री करकरे, कामटे, साळसकर आणि एके ४७ शी दोन हात करून आपल्या जीवाची पर्वा न करता जिवंत कसाबला पकडणारे शहीद तुकाराम ओंबळे म्हणजे आमचे महाराष्ट्र पोलीस.. ज्यांचा आपल्याला मनापासून आदर हवाच. २४ तास काम कराव लागेल या अटी मान्य करून एक सामान्य व्यक्तिमत्व आयुष्यभर असामान्य काम देखील करत असत. ज्यांना सुट्या नसतातच हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कधी हजारोंच्या तर कधी लाखो लोकांच्या गर्दीत वर्दीतला माणूस आपल्या वैयक्तिक जीवनातील ताण-तणाव, चिंता विसरून फक्त आणि फक्त निस्वार्थ काम करत असतो. अशा पोलिसांकडून शांत आणि सामंजस्याच्या वागणुकीची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांना आपल्या सहानभुतीची किती गरज आहे याचा विचार एक माणूस म्हणून नक्की करायला हवा.

गणपती उत्सव सध्या सुरू आहे. चौकात, नाक्यावर, मोठमोठ्या गणेश मंडळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना तैनात केले असणारच, अशा गर्दीच्या ठिकाणी प्रचंड शारीरिक, मानसिक त्रास सहन करून आपले पोलीस मित्र कार्यरत असणार. त्यांना योग्य ते सहकार्य करून एक नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडूया. जयहिंद.
-अमृता आनप

आपला माणूस, वर्दीतला माणूस !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात सोमवारी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिल्लीच्या वेगवेगळ्या

Close