राज्यातील गुन्हे सिद्धतेत १४० टक्क्यांनी वाढ0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई : राज्यातील गुन्हे कमी करण्यासाठी गुन्हे सिद्धतेत वाढ होणे आवश्यक आहे, हे ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या विविध निर्णयांवर गृह विभागाने केलेल्या अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या २० महिन्यात गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात १३९.५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविणे आवश्यक असून त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही आहेत. गुन्हे सिद्धतेत वाढ करण्यासाठी पोलीस यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या सक्षम करतानाच न्यायवैद्यक प्रयोगशाळांच्या उपलब्धतेवर भर देण्यात आला आहे. गुन्हे दाखल होणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच गुणवत्तापूर्ण चार्जशीट दाखल करणे आवश्यक आहे. त्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.

गुन्हे सिद्धतेत वाढ होण्यासाठी पोलीस, सरकारी वकील, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्यात समन्वय राखण्याबरोबरच महत्त्वाच्या खटल्यात खाजगी वकील नेमण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याबरोबरच खटल्यांचे पुनर्विलोकन, सुनावणीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर, प्रत्येक न्यायालयात पैरवी अधिकाऱ्याची नियुक्ती, दोषारोपपत्र तपासणीसाठी सनियंत्रण समिती स्थापन्याबरोबरच आरोपी निर्दोष सुटल्याबाबतच्या कारणांचा अभ्यास आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या घटकांमध्ये दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ झाली नसेल त्यांना मार्गदर्शन, साक्षीदारांना संरक्षण व सुविधा आणि आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केल्यानंतरच न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याबाबत कार्यवाही आदी बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. दारूबंदीच्या गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलीस उप अधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त यांना विशेष लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

या सर्व उपाययोजनांमुळे खटले भक्कमपणे लढले जात असून दोषींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्च २०१३ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान गुन्हा सिद्धतेचे प्रमाण १४.१६ टक्के होते, त्यात १३९.५५ टक्क्यांनी वाढ होऊन नोव्हेंबर २०१४ ते जून २०१६ या वीस महिन्यांच्या काळात तेच प्रमाण ३३.९२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

याबरोबरच दोषसिद्धीबाबतच्या उत्कृष्ट कामाला प्रोत्साहन देण्यासाठी पोलिसांना मुख्यमंत्री पदक देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच याबाबतच्या चांगल्या कामाची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात घेतली जात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहेत.

राज्यातील गुन्हे सिद्धतेत १४० टक्क्यांनी वाढ

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूसमधे गणेशोत्सवाची जोरदार तयारी

पलूस: गणेशोत्सवासाठी पलूस नगर सज्ज झाले असून सर्वत्र जोरदार खरेदी सुरु आहे. मोठ्या आकाराचे मखर व सजावटीचे देखावे अगदी घरगुती

Close