नमस्कार, जपान !!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

जपान म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो हीरोशिमा आणि नागासाकीचा अंगावर आजही शहारे आणणारा इतिहास. राखेतुन झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्या काळातही जपानने प्रगतीची उत्तुंग भरारी घेतली, ती आजही कायम आहे. इथे जे काही मी अनुभवतोय, ते खरेच आपल्या मातीतल्या लोकांपर्यंत पोहोचवावे, असे मला जेव्हा मनापासुन वाटले तेव्हा अतिशय बिझी शेडयुलमधुन वेळ काढून मी लिहायचा निर्णय घेतला. केवळ प्रघात म्हणून नव्हे तर आमच्याकडच्या एखाद्या जिल्हयाएवढा देश स्वयंशिस्तीमुळे जगातला एक आघाडीचा देश कसा होतो, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी.

img-20161021-wa0022

मी तिथल्या विमानतळावर पोहोचलो तर अतिशय शांतता अनुभवायला मिळाली. अगदी विमानांची घरघरही आपल्या मुंबईच्या एअरपोर्टसारखी नव्हती. तिथुन बाहेर पडताच अतिशय स्वच्छ आणि सुंदर रस्त्यांवरून आमचा प्रवास चालु होता. रस्त्यावर एकही डिव्हायडर नव्हता. सर्वजण रस्त्यावरील वाहतुकीच्या फलकांवरील सुचनांचे तंतोतंत पालन करत होते. अगदी खाजगी जागेतही पांढऱ्या पट्ट्या मारून अतिशय शिस्तबध्द पार्कींग केलेही वाहने दिसत होती. इंजिनचे आयुर्मान संपलेली वाहने इथे रस्त्यावरून वेळीच उचलली जातात. त्यामुळे कोणतेही प्रदूषण करणारे वाहन इथे तुम्हाला दिसणार नाही. याहीपेक्षा अतिशय चांगली बाब म्हणजे इथे सायकलींचा जास्त वापर होतो व त्यासाठी विशेष मार्ग आखले गेले आहेत.

img-20161021-wa0026

जपानला भूभागच कमी असल्याने उपलब्ध जागेचा अतिशय सुयोग्य वापर करून घेण्याची एक चांगली सवय जपानी लोकांना आहे. अगदी पार्कीगच्या शेजारी असलेल्या जागेत, ऑफिसच्या बाजुला जिथे जागा असेल तिथे पालेभाज्या लावलेल्या दिसतात. ‘अर्बन फार्मिंग’ चा एक आदर्श नमुना म्हणून या देशाकडे पाहायला हरकत नाही.

इथले बांधकाम तंत्रज्ञान तर खुपच अद्ययावत आहे. मला उत्सुकता होती ती त्याबाबतच. कारण अणुबॉम्बने नेस्तनाबुत झालेला जपान ज्या गतीने आणि ताकदीने परत उभा राहीला, त्या भुमीत निश्चितच बांधकामाचे सर्वांत चांगले तंत्रज्ञान असणार. इथले पुल आणि रस्ते प्रीफॅब्रिकेटेड पध्दतीने वेगात बांधतात. छोटे मोठे भुकंपाचे धक्के जरी आले तरी त्यांचे बांधकाम काही वेळात उभा राहते. रस्त्यांची निगाही चांगली राखली जाते. त्यामुळे अतिशय स्वच्छ आणि सुंदर रस्ते इथे पाहायला मिळाले. सर्वांत महत्वाचे म्हणजे इथले समुद्रकिनारे व्यवस्थितरीत्या विकसित करण्यात आले आहेत. हे इथे आवर्जुन नमुद करण्याचे कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जवळपास ८०० किलोमीटरचा विस्तृत समुद्रकिनारा आहे. या दरम्यान कोणताही प्रकल्प उभारायचा असेल किंवा तो समुद्रकिनारा विकसित करायचा असेल तर पर्यावरण रक्षणाचा पुळका घेणारे तथाकथित पर्यावरणवादी लगेच आडवे पडतात. मात्र जिथे खरेच प्रदूषण होते आहे, तिकडे मात्र कोणी पहात नाही. सीआरझेड आणि अन्य कायदयांचा बाऊ केला जातो. जपानने अशा बाबींना अजिबात थारा दिला नाही. आपल्या देशाच्या विकासात सर्व नागरीक, सर्व यंत्रणा एकजुटीने एकरूप झाल्या तर नेस्तनाबुत झालेल्या एखाद्या छोटयाशा देशाचेही कसे नंदनवन होवू शकते, याचा आदर्श जपानने आपल्यासमोर ठेवलाय.

Leave a Reply

Your email address will not be published.

नमस्कार, जपान !!!

by जमीर लेंगरेकर वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कोण आहे मूक मोर्चाचा ‘बोलवता धनी’?

पुणे : ऑगस्ट महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत दावा करण्यात येत आहे की याचे नेतृत्व कुणाच्याही हातात नाही, हा एक

Close