‘शिराहामा’ची ‘सॉलिड’ कचरा व्यवस्थापन व्यवस्था0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

जपानच्या स्वच्छतेच्या आदर्शाबद्दल अगदी लहानपासून परदेशी पर्यटक आणि लहान जपानी मुलीची कथा ऐकत आलेल्या मला जपानच्या स्वच्छता यंत्रणेविषयी उत्सुकता असणे स्वाभाविक होतं. अगदी माझ्या सुप्त बालइच्छेला मान देणारा आजचा दिवस आम्हाला घेऊन गेला शिराहामा या शहराला.

शिराहामा हे वाकायामा किनाऱ्याच्या दक्षिण बाजूला असणारे जपानचे एक प्रमुख पर्यटन शहर आहे. आज इथल्या घनकचरा एकत्रीकरण, विभाजन, व विल्हेवाट करणारी अतिशय शिस्तबद्ध व्यवस्था समजून घेण्याचा आज आम्ही प्रयत्न केला. दरवर्षी अंदाजे १० हजार मेट्रिक टन कचरा तयार होणारे हे पर्यटन शहर फक्त २६००० लोकसंख्या वस्तीचे आहे. यावरून एकूणच पर्यटकांनी निर्माण केलेल्या कचऱ्याची कल्पना यावी. ‘स्वच्छ भारत मिशन’ च्या निमित्ताने सर्वत्र घनकचरा व्यवस्थापनाच्या वैविध्यपूर्ण व्यवस्था भारतामध्येही चर्चेत आहेत त्यामुळे माझी उत्सुकता वाढली होती.

img-20161022-wa0017

 अगदी सुरवातीला इथल्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचरा वर्गीकरण  हा भाग येतो. सामान्य कचरा, औद्योगिक कचरा, आणि धोकादायक कचरा अश्या तीन प्रमुख प्रकारांमध्ये प्रथम कचरा विभागाला जातो.

सामान्य कचरा या गटात मग आणखी तीन भाग तयार  होतात ते म्हणजे नागरी कचरा, मल कचरा, आणि विशेष कचरा ज्यामध्ये इलेक्ट्रिक  तसेच इतर हानिकारक वस्तूंचा कचरा. साधारण विघटनशील आणि अविघटनशील कचरा अश्या दोन वर्गवारी माहीत असणाऱ्याना जपानच्या कचरा वर्गीकरणाचा विस्तृत असा तक्ता पाहिल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

img-20161022-wa0021

यातील सगळ्यात महत्वाचा कचऱ्याचा प्रकार म्हणजे नागरी कचरा. हा दोन मुख्य गोष्टीपासून तयार होतो- घरगुती व स्थानिक उद्योगधंद्यापासून. यातील प्रमुख घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था ही या दोन प्रकारच्या घनकचरा व्यवस्थापनाशी निगडीत आहे.

सार्वत्रिक पद्धती प्रमाणे इथेही महानगरपालिका घरगुती कचरा गोळा करते व त्यावर विशिष्ट प्रक्रिया करते. कचरा व्यवस्थापनाचे वेळापत्रक हे लोकसहभागातून ठरवून दिलेले असते. घनकचरा व्यवस्थापनातला अतिशय प्रेरणादायक भाग म्हणजे जपानमधील लोकांचा ‘active’ सहभाग. आठवड्यातून विशिष्ट दिवशी सकाळी साधारण पाच-सहा वाजण्याच्या सुमारास इथला घनकचरा नेमून दिलेल्या ठिकाणांवरून गोळा केला जातो. जपानमधले लोक स्वतःच घनकचऱ्याचे वर्गीकरण करतात.

काच, बाटल्या, कागद, धातूचा कचरा असे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते आणि कचरा ठरलेल्या व्यवस्थेनुसार इथले लोक शिस्तबद्ध पद्धतीने आणि जबाबदारीने कचरा जमा करतात. लोकसहभागातून नेमण्यात आलेले स्वच्छता दूत या पूर्ण कचरा गोळा करण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष देत असतात. शिराहामा इथल्या कंपन्या स्वतःच्या औद्योगिक कचऱ्याची शासनाने नेमून दिलेल्या वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच प्रक्रिया करून विल्हेवाट लावतात. इथे तयार होणारा ओला कचरा हा ज्याचा त्याने जीरवायचा असतो.

img-20161022-wa0029

घनकचरा व्यवस्थापनामध्ये अतिशय आवश्यक अशी बाब म्हणजे ज्वलनशील कचरा. त्यासाठी इथे लोकांना प्लास्टिकच्या विशिष्ट पिशव्या विकत दिल्या जातात ज्यामधून आठवड्यातून एकदा ज्वलनशील कचरा गोळा केला जातो. जे लोक जास्त कचरा तयार करतात त्यांना या प्लास्टिकच्या पिशव्या जास्त दराने विकल्या जातात जेणेकरून प्लास्टिकचा वापर आणि कचरानिर्मिती या दोन्हीवर अंकुश बसावा. पुनर्वापर केलेल्या प्लास्टिक पिशव्या सवलतीच्या दरात दिल्या जातात.

img-20161022-wa0022

शहरातील जुन्या भागात खांबाजवळ किंवा रस्त्याच्या कडेला कचरा जमा केला जातो पण तो वेळेत उचलला जात असल्याने जमा होऊन राहत नाही. त्याचपद्धतीने, जपानमध्ये घर बांधताना सोसायटीमध्ये कचरा ठेवण्यास विशिष्ट आणि स्वतंत्र अशी जागा ठेवणे आणि ती नगरपालिकेने सांगितलेल्या सुचनेप्रमाणे बांधणे बंधनकारक आहे. जमा झालेला सर्व कचरा गाडीतून संकलन आणि प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. तिथे मशीनद्वारे धातू व इतर कचरा वेगळा केला जातो. शेवटी इंसिनरेशन प्रक्रियेने कचरा जाळण्यात येतो व त्यातून तयार होणारी राख जमीन पुनर्भरण करण्यास वापरली जाते.

img-20161022-wa0026

गेल्या तीस वर्षापासून इथले स्थानिक लोकच घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था पाहतात. अतिशय आश्चर्याची आणि आवर्जून नमूद करावी अशी बाब म्हणजे फक्त २१ लोकांची टिम शिराहामा शहराची घनकचरा व्यवस्था पाहतात. संपूर्ण ऑटोमेटेड यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यामुळे इतक्या कमी मनुष्यबळामध्ये हे शक्य होते.

भारतात कचरा उचलणे ही सरकारची जबाबदारी आहे अशी लोकभावना आहे त्यामुळे कचरा आपल्या घरातून बाहेर गेला की स्वच्छतेची जबाबदारी संपली अश्या पद्धतीच्या  बेजबाबदार धारणा लोकांमध्ये आढळतात. शिराहामा च्या उदाहरणावरून हेच लक्षात येते की नागरिकांनी जबाबदारीने ४-R तत्वाचा (re-use/reduce/refuse/recycle) वापर केल्यास कचऱ्याची व पर्यावरणीय तसेच आरोग्याची समस्या उद्भवणार नाही.

जपानमधल्या त्या मुलीची गोष्ट कचऱ्याचे व्यवस्थापन हे राष्ट्रीय वैशिष्टय आहे असाच फक्त मेसेज देत नसून ते सुजाण नागरिकत्वाच्या शिक्षणाचा परिणाम आहे हेही समजून घेणे आवश्यक आहे.

आजच्या शिराहामा भेटीने बालपणातली गोष्ट पुन्हा नव्याने समजून घ्यायची संधी मिळाली आणि अजूनही त्या अतिशय साध्या वाटणाऱ्या कथेतून नवीन शिकवण एकेक करून समोर येत आहे.

‘शिराहामा’ची ‘सॉलिड’ कचरा व्यवस्थापन व्यवस्था

by जमीर लेंगरेकर वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शिवसेना पलूस नगरपरिषदेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार : प्रा. नितीन बानुगडे-पाटील

पलुस : नगरपरिषदेच्या सर्व १७ जागा शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढवणार असून कोणत्याही स्थितीत पलुस पालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार

Close