सिंधुदुर्गात गरजला लाख मराठा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सिंधुदुर्गनगरी : आरक्षणाबरोबरच विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने शनिवारी लाखाचा मोर्चा काढला खरा पण पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे बऱ्याच बांधवाना मोर्चाच्या ठिकाणी पोहोचताच आल नाही. वाहतूक कोंडीमुळे आणि बऱ्याच एसटी बसेस मराठा मोर्चासाठी आरक्षित राहिल्याने अनेक प्रवाशांना देखील गैरसोयीचा सामना करावा लागला.

मराठा समाजाच्या वतीने रविवारी सिंधुदुर्गनगरीत काढण्यात आलेल्या मोर्चामुळे सामान्य माणसांचे मात्र हाल झाले. कणकवलीपासून सावंतवाडी पर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. ओरोस पासून कणकवलीच्या दिशेने १२ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तीच परिस्थिती सावंतवाडी पर्यत होती. बऱ्याच एसटी बसेस वाहतूककोंडीत सापडल्याने कुडाळवरुन सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. मराठा मोर्चासाठी बसेस आरक्षित झाल्याने कुडाळ बस आगारातून अनेक प्रवासी फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. कुडाळ आगारातून मोर्च्यासाठी १८ गाड्या आरक्षित झाल्या होत्या. कुडाळ बस स्थानकात सुमारे २ ते तीन तास प्रवासी बसची प्रतीक्षा करत होते. वाहतूककोंडी झाल्याने पोलीस यंत्रणेच्या मर्यादासुद्धा यामुळे उघड झाल्या.

मराठा मूक क्रांती मोर्चाच्या निमित्ताने विविध वीस मागण्यांच निवेदन रणरागिणीनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे दिल. या मागण्यामध्ये जिल्ह्यातल्या काही प्रश्नांचा समावेश आहे.

मोर्चा, आंदोलने म्हटली की घोषणा, दादागिरी ही आलीच. आणि त्यातही सिंधुदुर्गातील मोर्चा म्हणजे शांततेत होतच नाही. मात्र, जिल्ह्यात आज न भूतो, न भविष्यती असा निघालेला मराठा समाज मूक मोर्चा याला अपवाद ठरला. कडक उन्हाचा पारा, ना कोणती घोषणाबाजी ना दादागिरी, होती ती फक्त शिस्त. जिल्ह्यात आजवरच्या इतिहासात पहिलाच शिस्तबद्ध निघालेला हा आजचा मराठा समाजाचा मोर्चा.

कोपर्डी  येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तातडीने हाती घ्यावे, मराठा तरुणांना स्वयंरोजगारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्वरित सुरु करावे, संपूर्ण भारतातील एकमेव छत्रपती शिवरायांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या शिवराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार त्वरित व्हावा, किल्ले सिंधुदुर्गची डागडुजी करण्यात यावी, या आणि इतर मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील मराठा समाज बांधवाने मूक मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाची महिनाभर मराठा समाज बांधवांकडून जय्यत तयारी सुरु होती. राज्यभरात सर्वत्र लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

राज्यभर झालेले मोर्चे पाहता मराठा समाज बांधवानी मोर्चाच्या आदल्या रात्रीच मोर्चासाठी रवाना होत होते. त्यामुळे आज सिंधुदुर्गात होणाऱ्या मोर्चाकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. मोर्चासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ओरोस येथील क्रीडा संकुल येथे होणाऱ्या सभेसाठी किल्ले सिंधुदुर्गची प्रतिकृती असणारे व्यासपीठ उभारण्यात आले होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग बॉम्ब शोधक नाशक पथकाने या सभा स्थळी जाऊन तपासणी केली. या मोर्चात राजकीय व्यक्ती, तसेच मोठा लाखोंचा जमाव येणार असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. सभास्थळी कमांडोसहित पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती. हातात भगवा झेंडा, डोक्यावर टोपी, आणि एक मराठा लाख मराठा टी-शर्ट परिधान करून जिल्ह्यातील मराठा समाज बांधव सिंधुदुर्गनगरी येथे चाल करू लागले. मालवण, सावंतवाडी, कुडाळ, देवगड, कणकवली, वैभववाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग येथील मराठा समाजबांधव गाड्यांच्या ताफ्यात डेरेदाखल झाला. जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर भगवं वादळ आले होते. नागरिकांसह, गाड्यांच्या ताफ्यांनी सर्वच रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मोर्चा सुरु होण्याच्या अगोदरच जिल्ह्यातील सर्व रस्ते चक्काजाम झाले होते. लांब पल्ल्याचे सोडून सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मालवण वरून येणारा मूक मोर्चाची रानबांबुळी पासूनच लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. साडे दहाच्या सुमारास प्राची कोकितकर ,सानिया सावंत ,तन्वी कदम,पूजा सावंत, यशिका परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजाच्या मोर्चाने राजधानी गर्दीने फुलून गेली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यासह सर्वपक्षीय पुढारी या मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चासाठी पार्किंगची खास व्यवस्था करण्यात आली होती.  सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तालुक्यातील सर्व रिक्षा, चारचाकी, सहाचाकी वाहने जिजामाता चौक येथे, कुडाळ तालुक्यातील सर्व मोटारसायकल व इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था जिजामाता हॉस्पिटल फाटा. मालवण तालुक्यातील सर्व वहाने रानबांबुळी फाटा, शासकीय विश्रामगृह याठिकाणी, तर कणकवली, देवगड, वैभववाडी, या तीन तालुक्यातील सर्व मोठी वहाने रानबांबुळी फाट्यावरून मुख्यालयात येतील व रानबांबूळी गावातील रस्त्याने डॉन बॉस्को हायस्कूल समोरील पटांगणावर पार्किंगची वव्यवस्था करण्यात आली होती. या मोर्चावर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या सहाय्याने मोर्चावर लक्ष ठेवण्यात येत होते. जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिल्यानंतर मोर्चा क्रीडा संकुल येथील सभेच्या ठिकाणी दाखल झाला. संपूर्ण क्रीडा संकुल भगवेमय झाले होते. सभेच्या सुरुवातीलाच कोपर्डीतील पिडीत युवतीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर जिजाऊंच्या गीताने कार्यक्रमाला सुरवात आली. मोर्चातील युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त केलेल्या निवेदनाचे वाचन केले,. त्यानंतर तरुणींनी आपल्या सडेतोड शब्दात कोपर्डी येथील घटनेचा निषेध करताना आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. भाषणे संपले तरी मराठा समाज बांधव हे सभास्थळी येतच होता. ज्या पद्धतीने शिस्तीत मराठा बांधव मोर्चात सामील झाले, त्याच पद्धतीने शिस्तीने पुन्हा माघारी फिरत होते. त्यामुळे कोणताही राडा, घोषणाबाजी न करता जिल्ह्यात असा न भूतो न भविष्यती असा लाख मराठा मोर्चा पार पडला.

vlcsnap-2016-10-23-20h04m10s294

सिंधुदुर्गनगरी येथे मराठा मुक मोर्चा हा कोकणातील सर्वात मोठा मोर्चा ठरला. या मोर्चातील ‘तुफान’ गर्दी  कोल्हापूरहून आणण्यात आलेल्या ड्रोन कॅमेऱ्याने टिपली. राज्यात सिंधुदुर्गची पर्यटना बरोबर राडेबाज सिंधुदुर्ग अशीही ओळख आहे. मात्र याच राजकारण्यांना लाख मराठ्यांनी खड्या सारखे बाजूला केले. राज्यात सर्वत्र मराठा मूक क्रांतीचे मोर्चाचे वादळ घोंगावत आहे. कोपर्डी येथील घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यात आरक्षणासहित अनेक मुद्दे घेऊन राज्यातीलच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात असणारा मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्यात सर्वत्र हे मोर्चे लाखोच्या घरात आहेत. आज पर्यंतच्या मोर्चाचे नेतृत्व हे राजकारण्यांनी केले आहे. मोर्चाची सुरुवात, अधिकाऱ्यांना निवेदन, व्यासपीठावर भाषणबाजी… सारे काही राजकारण्यांनी केले. मराठा समाजाचे नेतृत्व आणि भाषणही तरुणींनी केले. राजकारण्यांना खड्यासारखे बाजूला सारत आंदोलन नेतृत्व केले आणि आंदोलन यशस्वीही केले. आज सिंधुदुर्गात झालेला मोर्चाही असाच निघाला. या मोर्चात सर्वात पुढे महिला, तरुणी, विद्यार्थी, नंतर राजकारण्यांना स्थान देण्यात आले होते. या मराठा मूक मोर्चाला सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जाहीर पाठींबा दिला होता. मोर्चात सहभागीही झाले. मात्र चर्चेत आले नाहीत. व्यासपीठावर एकही राजकीय नेत्याला स्थान देण्यात आले नव्हते. राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, प्रमोद जठार, संदेश पारकर यासह अनेक राजकीय पक्षाचे नेते सहभागी झाले होते. काही काळ मोर्चात सभागी झाल्यानंतर सारे नेते दिसेनासे झाले. मात्र तरीही मोर्चा यशस्वी झाला. राजकारण्यांना बाजूला ठेवून बरेच काही करता येते हेच या लाख मराठा मोर्चाने दाखवून दिले आहे.

सिंधुदुर्गात गरजला लाख मराठा

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूस ची निवडणूक भाजप ताकदीने लढणार: पृथ्वीराज देशमुख

पलूस: भाजपा चे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पलूसची नगरपरिषद निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत काल

Close