पर्यटनस्थळ विकासाचे आव्हान …!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

भारत महासत्ता बनेल, असं भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हंटल होतं. त्यात काहीच अवास्तव नव्हतं. आज जी अमेरिका स्वतःला महासत्ता म्हणवते आहे त्याच अमेरिकेच्या शिकागो शहरात स्वामी विवेकानंदांनी काही वर्षापूर्वी भारताचा बंधुत्वाचा सर्वश्रेष्ठ उपदेश दिला होता. हा इतिहास इथे नमूद करण्याचं कारण म्हणजे या धुरिणांनी भारताच्या या उज्ज्वल भूमीत इतकी ताकद ओळखली होती. जपानसारख्या आपल्या मित्रदेशाचा दौरा करताना हॉटेल्स, पर्यटनस्थळे सोडून हे कसे काय आठवले, हा प्रश्न जसा तुम्हाला पडला असणार तसाच तो मलाही पडला. मात्र अशा प्रश्नांचा मागोवा घेण्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो याची खोल जाणीव असल्याने आम्ही हा दिवस पूर्ण याच चिंतनात घालवला. अर्थात हा विचार आता यापुढे कधीच मला स्वस्थ बसु देणार नाही, हेही तितकेच खरे.

मागील वर्षी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जपानच्या ज्या कोयासन शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचं अनावरण केलं, त्याच शहरात विशेष प्रशिक्षणासाठी जाण्याचा आणि काही दिवस राहण्याचा आम्हाला योग आला, ही मी जीवनातील एक अतिशय अविस्मरणीय अशी घटना मानतो. या कामी अशी अभ्यासभेट घडवून ‘यशदा’ने खुप चांगली आणि अभिनंदनीय भूमिका बजावली. राजकारणापलिकडे जावून आपल्या देशातील महामानवाचा जपानसारख्या देशात पुतळा उभारण्यात पुढाकार घेणारे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या समृध्द परंपरेतले पहिलेच मुख्यमंत्री असावेत. राजकीय कार्यक्रमांसाठी आपला संपूर्ण वेळ राखीव न ठेवता असे काही महत्वाचे कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या डायरीत असणे ही खरे तर आम्हा सर्वच अधिकारी वर्गासाठी शिकण्यासारखी बाब आहे.

img-20161023-wa0038

कोयासन पूर्वी कसे का असेना, मात्र मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे अनावरण झाल्याने ते तेव्हापासून जगाच्या नकाशावर वेगळ्याच लौकीकाने झळकु लागले. परंतु केवळ इतक्याशा बाबीने हुरळून जाण्यासारखी परस्थिती नाही. आपल्याकडे तर प्रत्येक शहरात आणि शहरातल्या प्रत्येक चौकात पुतळे आहेत. परंतु या महात्म्यांबददल असलेली निष्ठा, प्रेम, श्रध्दा आणि पवित्र भावना याच बाबी या पुतळयांना अक्षरशः जिवंत करत असतात. हाच अनुभव आम्हाला या कोयासनच्या भूमीत घेता आला. आमच्याकडच्या पुतळयांना संरक्षण लागते, आमच्याकडच्या पुतळयांवरून दंगलही सुरू होते, डोकी फुटतात, रक्त सांडते. परंतु जपानच्या नागरीकांनी या पुतळयाचे असे काही श्रध्देने जतन केले आहे की बस्स!

मुख्य विषय हाच आहे की केवळ पुतळे नव्हे तर अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत, की त्यांच्याबाबत अजुन आम्हीच पुरते जागृत झालो नाही. आमच्या या अनमोल ठेव्याची आम्हालाच जणु काही कल्पना नाही. ऐकेकाळी जगात डंका पिटवलेल्या, समृध्द आणि संपन्न भारताच्या परंपरेचा एक पाईक म्हणून जर या वस्तुस्थितीचा विचार करायचा म्हटले तर शरमेने मान खाली जाते. आजवर आम्ही विकास म्हणजे केवळ इमारती, प्रकल्प, रस्ते यावरच भर देतोय. परंतु माणुसकीला जिवंत ठेवणारी, समाजात सर्वधर्मसमभाव पेरणारी ही जी काही धार्मिक पर्यटन स्थळे आहेत, त्यांना त्यांच्या मुळ रूपासह, वैचारीक गाभ्यासह जपण्याची गरज आहे, असे कोणालाच का वाटत नाही, असा प्रश्न एक सजग नागरीक म्हणून मला पडला. याचे कारण जपानी लोकांनी हा सर्व धार्मिक परंपरांचा ठेवा आजही तितक्याच श्रध्देने आणि प्रेमाने जपून ठेवलाय. त्यामुळेच ते कोणत्याही समस्येवर स्वतःच  मार्ग शोधतात आणि कोसळले तरी पुनःपुन्हा तितक्याच जोमाने उभे राहतात. येते कुठून ही शक्ती? आमच्याकडे का नाही ही ताकद? आजही आम्ही आमच्या घरासमोरच्या नाल्यातली आम्हीच केलेली घाणही सरकारने काढावी, अशी अपेक्षा का ठेवतो? इतकी खालावलेली विचारसरणी असेल तर भारताकडे असलेला इतका समृध्द धार्मिक वारसा आम्हाला दिसणार तरी कसा? आमच्या धार्मिक स्थळाचा विकास सरकारने करावा, अशी मागणी तर लोकप्रतिनिधीही करतात, परंतु अशी मागणी करताना केवळ निधीने हा विकास होणार आहे का? त्यासाठी स्थानिकांनी कुठेतरी हा आपला वारसा, आपली परंपरा असल्याची भूमिका घ्यायला नको का?

एक छोटे उदाहरण देतो, जपानमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. त्यांची निगा आणि प्रसिध्दी खूपच सुंदर पध्दतीने करण्यात आली आहे. जगभरातले पर्यटक खास त्यासाठी इथे येताना दिसतात. असेच गरम पाण्याचे झरे कोकणामध्ये चिपळूणनजीकच्या संगमेश्वर इथे पाहायला मिळतात. मात्र मुंबई-गोवा हायवेच्या कडेला असलेले हे गरम पाहण्याचे झरे तिथून दहावेळा जाणा-याच्या तरी लक्षात येतात का? या एका जागतिक वारशाची काय प्रसिध्दी केली आम्ही? राज्य सरकार निधी देते पण विकासाचे ‘व्हिजन’ कसे देता येणार? मग अनावश्यक बांधकामावर खर्च केला जातो. नको तिथे हा निधी वाया जातो. राज्य व देशपातळीवरील नेतृत्वाच्या विकासाच्या धोरणाचे विकेंद्रीकरण म्हणजेच स्थानिक नेतृत्वामध्ये अगदी समान धोरणनिष्ठा आवश्यक आहे. पर्यटन विकास हा त्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न म्हणून पाहायला हरकत नाही.

img-20161023-wa0035

पर्यटन विकास हा तरुणाईला रोजगार देणारा एक मोठा स्त्रोत आहे पण अजूनही आपण तिकडे तेवढ्या धोरणात्मक दृष्टीकोनातून पहिले नाही. यामध्ये स्थानिक राजकीय नेतृत्वाचा अभाव जेवढा कारणीभूत आहे तेवढाच नकारात्मक दृष्टीकोन प्रजेमध्येसुद्धा आहे. आपल्या देशात विकासाला प्रचंड वाव आहे. विविधतेने नटलेल्या व प्रचंड सांधनसंपत्ती व निसर्गाने समृद्ध देशात विकासाचा दृष्टीकोन लोकांत कमी आहे. अलिकडेच जगात होणारे बदल पाहता भारतानेही चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे. पर्यटन भारतासाठी वरदान ठरणार आहे. परंतु आपण देशांतर्गत वा आंतरदेशीय पर्यटनावर म्हणावे असे लक्ष दिले नाही.

देशांतील ऐतिहासिक , धार्मिक व नैसर्गिक महत्त्वाच्या ठिकाणांचे ब्रँडिंग व्हायला पाहिजे. पर्यटन विकास कार्यक्रम तयार होणे, त्यातून विशिष्ट तिर्थस्थळे आणि लगतची शहरे विकसित होणे, आणि पर्यटकांचा ओघ वाढून त्यातून स्थानिक लोकांसाठी उद्योगधंदे व रोजगार तयार होणे प्रक्रिया फक्त सरकारी योजनांमधून होत नसते. यामध्ये लोकसहभागातून पर्यटन स्थळांच्या विकासाचा प्लॅन तयार करणे ही मुख्य बाब असते. जपानसारख्या देशाने त्यांच्या उद्योजकतेचा पुरेपूर वापर करून तिथल्या अध्यात्मिक व धार्मिक वारसा असणाऱ्या स्थळांना व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून विकसित केले आहे. यामध्ये नागरी स्वच्छता, सुंदर हॉटेल्स व राहण्याची ठिकाणे, बगीचे, जलस्रोतांचे सुशोभीकरण, रस्त्यांची निर्मिती व व्यवस्था, बाहेरून आलेल्या पर्यटकांना सुरक्षित वाटेल असे अदारातिथ्यपूर्ण वातावरण या गोष्टींवर खूप भर दिला आहे.

आपल्याकडे प्रचंड भूसांस्कृतीक वारसा आहे पण अजूनही आपण आपली पारंपरीक वास्तुअभ्यासावर आधारीत  जुनी मंदिरे, गुहा, इतर वास्तू पाडून कुरूप सिमेंटच्या वास्तू तयार करून सांस्कृतिक वारशाचा पायाच ढासळवतो आहोत. पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी मूळ सांस्कृतिक वारसा समजून घेणे व त्यापद्धतीने विकास आराखडा तयार करणे आवश्यक असते यामध्ये सांस्कृतिक संशोधन संस्था , प्रशासन, व स्थानिक जनता यांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर नागरीसुविधा तयार करणे आणि पर्यटन स्थळ म्हणून व्यावसायिक पद्धतीने मार्केटिंग करणे आवश्यक असते. सगळ्यात महत्त्वाचं आणि दुर्लक्षित म्हणजे आपल्या सेवांमध्ये असणारा आदरातिथ्य आणि पाहूणचाराचा अभाव. स्वच्छता व नियमांचे पालन तसेच आदरातिथ्य यात आपण कमी पडतो हे सत्य नाकारता येण्यासारखे नाही. परदेशी किंवा भारतातील इतर राज्यांमधून आलेले पर्यटक यांच्या खाण्याच्या व राहण्याचा शैलीचा अभ्यास करून त्यापद्धतीने सेवा व मनुष्यबळ तयार करणे ही बाब खूप महत्त्वाची आहे. आपल्या परंपरांमध्ये प्रगत असे आपले अन्नपदार्थ तीर्थस्थळ पाहायला येणाऱ्या लोकांना विकणे यामध्ये प्रत्येक अन्नाची पार्श्वभूमी समजून घेणे व त्याची माहिती देता येणे हे कौशल्य असते. या कमी चांगल्या पद्धतीचे वाचनीय साहित्य तयार करणे व चित्ररूपातून आपले सांस्कृतिक अन्नपदार्थ देशी व परदेशी पर्यटकांसमोर आणणे आवश्यक आहे.

जगातला एक धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या  अतिशय समृध्द देश म्हणून भारताची ओळख आहे, मात्र आता ती केवळ पुस्तकात आहे. जपानसारख्या एका छोटयाशा देशाकडून बोध घेवून आपण आपल्या देशातील ही धार्मिक स्थळे अतिशय कल्पकतेने आणि त्यांचा आत्मा न हरवता केली तर खरेच पुन्हा एकदा या देशात सोन्याचा धुर निघाल्याशिवाय राहणार नाही.  विकास म्हणजे फक्त उंचच उंच इमारती व रस्ते नसून स्थानिक पर्यावरणास अनुसरून लोकांचे जीवन उंचावण्यासाठी केलेल्या स्थानिक परिस्थितीचा व वैशिष्ट्यांचा कायापालट आणि या कामी पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमाचे महत्व खूपच आहे.

img-20161023-wa0039

Leave a Reply

Your email address will not be published.

पर्यटनस्थळ विकासाचे आव्हान …!!!

by जमीर लेंगरेकर वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये प्रवेश

पलूस: कांग्रेस चे माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन वाघमारे , तसेच विष्णुपंत मोरे यांच्या त्याच्या सहकाऱ्यासमवेत शिवसेनेचे पलूस कडेगाव संपर्क प्रमुख

Close