झुकs झुकss झुकsss झुकssss विकास गाडी !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

एखाद्या देशातील युवकांच्या तोंडी कुठले गाणे आहे, यावरून त्या देशाचे भवितव्य ठरते असे म्हणतात. परंतु मी तर म्हणतो, एखाद्या देशाची सद्यस्थिति आणि भवितव्य त्या देशातील रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता आणि नीटनेटकेपणावरुन समजते. आज मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराच्या वाहतुक व्यवस्थेकडे पाहिले तर असे लक्षात येते की यातून रेल्वे वगळली तर काय परिस्थिती निर्माण होईल. आपल्या शरीरातल्या  रक्तवाहिन्या इतकेच महत्वाचे स्थान रेल्वेला आहे. परंतु एक सामान्य नागरीक म्हणून आम्ही किती महत्त्व देतो या सर्वाला? आधी आम्हाला याबाबतचा नकारात्मक दृष्टिकोण बदलावा लागेल. त्यानंतरच आम्ही रेल्वेसाठी काही चांगले करू शकु. हे इथे आवर्जून नमूद करण्याचे कारण म्हणजे देशाच्या प्रगतीत रेल्वेचे स्थान आणि त्याबाबतची सामान्य नागरीक म्हणून भूमिका काय असते हे जपानमध्ये नुकतेच अनुभवायला मिळाले. आज आम्ही वाकायामा ते शिन ओसाका असा रेल्वेने प्रवास केला तर शिन ओसाका ते शिन योकोहामा स्टेशनपर्यंत बुलेट ट्रेनने प्रवास केला. या संपूर्ण  प्रवासात ‘तिथली’ आणि ‘आमची’ स्टेशन्स यांची तुलना होत होती. जपानने इतक्या वेगाने ज़ी प्रगती केली त्यात शिस्तबद्ध रेल्वे प्रवास आणि वेळेवर धावणाऱ्या रेल्वे हेही एक कारण आहे.

img-20161024-wa0016

या संपूर्ण प्रवासात कोठेही गर्दी, गोंगाट, प्रवाशांचा लोंढा नाही. खाद्यपदार्थ मिळतात पण कोणीही कागद किंवा चहाचा रिकामा कप रुळावर फेकत नाही. मोबाईलसारख्या साधनाने कर्मचारी प्लॅटफॉर्म वरूनच् अनाउंसमेंट करू शकतात. आपल्याकडे हे शक्य आहे का? मुळातच महासत्ता व्हायला निघालेल्या भारतात अजूनही स्वच्छ भारत अभियान राबवावे लागते, हे आमचे किती मोठे दुर्दैव आहे? त्यातही पंतप्रधान मोदींनी एकट्याने झाडू मारून हा देश स्वच्छ होणार आहे का?

आपल्या तुलनेत इथले रेल्वेचे तिकीट दर जास्त आहेत. पण हा दर रेल्वेचा खर्च भागावा इतपत तरी नको का? आज आमच्या देशात सर्वात स्वस्त रेल्वे प्रवास आहे. पण काहीजण तेही तिकीट न काढता प्रवास करण्याचा प्रयत्न करतातच ना? मुळात एक मुलभूत गोष्ट चर्चेत घेतली जात नाही ती म्हणजे तिकीट हा रेल्वेसेवा सक्षम ठेवण्यासाठीच्या खर्चाचा एक मोठा स्त्रोत आहे. तिकिटांच्या किमती त्या दृष्टीने ठरवणे रेल्वे व्यवस्थेला आवश्यक आहे आणि ही गोष्ट रेल्वे प्रवासी सोडून कोण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल ? जबाबदार प्रवासी म्हणून तिकीट काढणे व रेल्वे सारख्या सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे व सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सहभागी होणे हे सध्या खूप आवश्यक आहे. थोडीशी भाडेवाढ झाली की पटकन आंदोलन करणारे प्रवासी व त्यांना नेतृत्व देणारे सामाजिक कार्यकर्ते यांनी देशाच्या विकासासाठी अधिक जबाबदार आणि अभ्यासात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे.

img-20161024-wa0018

आज मुंबई सारख्या शहराचा गांभीर्याने विचार केला तर सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल की नाही याचीही खात्री देता येत नाही. कुठुनही कसेही डब्यात घुसणारे प्रवासी पाहिले की असे वाटते, ब्रिटिशांच्या काळात आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनीही इतक्या वाईट पद्धतीने रेल्वे लुटल्या नसतील. दहा रुपयाचे तिकीट काढले की आमचा रेल्वे प्रवासी कोठेही कचरा करण्याचे जणू लायसन्स मिळाल्या सारखेच वावरतो. कचरा टाकताना कोणी आपल्याला बघतय का, याचीही त्याला लाज नसते. आमचे रेल्वे सफाई कर्मचारी मात्र जीव धोक्यात घालून हा सारा कचरा गोळा करत असतात. रेल्वेचे हे मनुष्यबळ आपणच नको तिथे वाया घालवतो. प्रत्येकाने जर इतरांकडे बोट न दाखावता स्वयंशिस्त ठेवली, तर रेल्वेच्या अर्ध्या समस्या कमी होतील. या देशाचे मनुष्यबळ वेळेवर आणि सुखरूप कामावरून घरी परतेल. दुसरी नोंद करण्यासारखी बाब म्हणजे येथील सर्व रेल्वे कर्मचारी विशिष्ट गणवेशात असतात. आपल्याकडे तिकीट तपासनीस सोडले तर इतर स्टाफ गणवेशात नसतो त्यामुळे सेवांमध्ये व्यावसायिकतेचा अभाव जाणवतो.

रेल्वे स्टेशनवरचे छोटे उद्योजक, चहावाले व इतर दुकाने यांच्या माध्यमातून होणारा कचरा व अस्वच्छता हाही गंभीर विषय आहे आणि प्रवासी व रेल्वे प्रशासन यांनी तो गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. जपानच्या रेल्वे स्टेशन वर दुकाने तसेच वेडिंग मशीन च्या माध्यमातून खान-पान व इतर सुविधा दिल्या जातात पण स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊन. इथे फेरीवाले किंवा अनधिकृत दुकाने व त्यांना समर्थन देणारे लोक कुठेही दिसले नाहीत.

शहरे ज्या पद्धतीने वाढतात त्या पद्धतीने सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवरचा ताण ही वाढतो. आपल्या देशातला शहरीकरणाचा वेग पाहता सार्वजनिक परिवहन व्यवस्थेकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. परंतु राजकीय सोईने हा विषय बघितला जातो त्यामुळे आपली सार्वजनिक परिवहन व्यवस्था अजूनही कमकुवत आहे !

आता मेट्रोचेच बघा ना. एकतर आधीच उशीराने आम्ही या प्रकल्पाला सुरुवात केली. त्यातही ट्रेन कोठुन कोठे न्यायची, तिचा मार्ग काय असावा हेही आंदोलन करुन् आणि राजकारणाच्या चौकटीतून ठरवले जाणार असेल तर असे प्रकल्प वेळेत कसे पूर्ण होणार, प्रकल्प रखडले की त्याच्या खर्च वाढतो, त्याची जबाबदारी कोणावर टाकायची? आजपर्यंत आपले बहुतेक विकास प्रकल्प उशिरा सुरु होते आले आहेत आणि त्यामुळे देशाची प्रगती अक्षम्य पद्धतीने हळू हळू सुरुय. त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी म्हणून रेल्वे सेवा हे प्रमुख उदाहरण होऊ शकते.

img-20161024-wa0021

जपानच्या अतिशय सुंदर, स्वच्छ आणि शिस्तबद्ध रेल्वे स्टेशन्सकडे पाहिले की अगदी मेट्रोच्या गतीने असे स्वतःवर सकारात्मक टीका करणारे विचार समोर उभे राहतात. आज सगळ्यात जास्त ‘civic sense’ ची गरज कुठे असेल तर ती आपल्या रेल्वे प्रवाश्यांमध्ये !

जपानची रेल्वे आणि तिचे प्रवाशी पाहिल्यानंतर निश्चितच जपानी रेल्वे हा सार्वजनिक प्रवासाचा ‘आदर्श’ नमुना आहे असे वाटून गेले. देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रेल्वेबाबत राज्यकर्ते आणि या देशाचे मालक असणारी जनता यांची मानसिकता कधी बदलणार, हाच विचार आम्हाला या प्रवासात अस्वस्थ करुन गेला.

header-add

Leave a Reply

Your email address will not be published.

झुकs झुकss झुकsss झुकssss विकास गाडी !

by जमीर लेंगरेकर वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूसमध्ये पाणी, गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर

पलूस: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  पलूसमध्ये जनमत चाचणी व समस्या याबाबत नुकतीच चर्चा घेण्यात आली. यामध्ये ‘कांग्रेस’ चे सुहास पुदाले, ‘राष्ट्रवादी’ चे

Close