मित्र देश असावा जपानसारखा …0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

भारत व जपान यांचे परस्पर सांस्कृतिक संबंध जितके आवश्यक आहेत तितकेच महत्वाचे आहेत व्यापारविषयक संबंध. या सदंर्भात भारताला जपान मधून परस्पर सहयोग व सामंजस्य यासंबंधी दिशादर्शन व सल्ला देण्याचे अवघड काम भारताची जपानमधील एम्बसी किंवा दूतावास येथील अधिकारी करतात. जपानच्या दौऱ्यात आज आम्ही भारतीय दूतावास कार्यालयाला भेट दिली. तिथल्या अधिकारी वर्गाच्या स्वागतानंतर महाराष्ट्र केडर चे आय. ए. एस. अधिकारी श्री अरविंद सिंग यांनी मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्र्यांनी जपानशी हजारो वर्षांपासून असलेले संबंध दृढ करण्यासाठी उचललेली पावले व व्यापारविषयक घडांमोडीवर प्रकाश टाकला. मा. सिंग यांच्या विशेष निमंत्रणामुळे व त्यांच्या मनमोकळ्या संवादामुळे आमची जपान भेट संस्मरणीय झाली. गप्पांच्या ओघात आमच्या अधिकारी मित्रवर्गाने आपल्या जपानच्या दौऱ्यातील काही आठवणी सांगितल्या.

img-20161025-wa0006

मागच्या वर्षी चार-दिवसीय जपान दौऱ्यात मा. मुख्यमंत्री महोदयांनी जपानच्या व्यापार व अर्थविषयक तज्ञांशी विस्तृतपणे संवाद साधून परस्पर व्यापार सहयोग विषयक व जपानकडून भारतामध्ये गुंतवणुकीच्या शक्यता संदर्भात जपान एक्स्टर्णाल ट्रेड ऑर्गनायझेशन (जेट्रो) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात चर्चा घडवून आणली होती. त्या पार्श्वभूमीवर आमची अभ्यासभेट निश्चितच एका सकारात्मक वातावरणामध्ये घडत होती आणि खूप नवीन गोष्टी समोर येत होत्या.

भारत आणि जपान यांच्यातल्या कैक शतके जुन्या अश्या सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधाना अजूनही म्हणाव्या त्या पद्धतीने गती देता आली नव्हती. त्या दृष्टीने मा. मुख्यमंत्री महोदयांचे प्रयत्न निश्चितच आम्हा अधिकारी वर्गाला प्रेरीत करणारे आहेत. एक छोटा आशियायी देश असूनही जपानने हिरोशिमा च्या पडझडीनंतर स्वतःस सावरून अमेरिकेसारख्या देशात सर्वात जास्त कार विकणारी परकीय अर्थव्यवस्था म्हणून नाव कमावले. जपानी उद्योजकतेचा आणि मानसिक धैर्याचा हा अप्रतिम नमुना आपण भारतीयांनी समजून घेणे आवश्यक आहे.

परस्पर आर्थिक सहयोग हा परस्पर सांस्कृतिक सहयोगाच्या पार्श्वभूमीवर घडत असतो. त्यासंदर्भात भारत आणि जपान यांना जोडणारा दुवा म्हणजे बुद्धाचे तत्वज्ञान आणि बौद्ध धर्माची जुनी परंपरा. जपानी लोकांसाठी भारत ही पवित्र भूमी असून भारताविषयी इथे खूप आदरपूर्वक बोलले जाते. गेल्या ६० वर्षाच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आशियायी देशांमधला बौद्ध धर्मामुळे तयार झालेला सामायिक दुवा धरून परराष्ट्र धोरण का आखले गेले नाही असा प्रश्न पडावा अशीच सध्याची परिस्थिती आहे. त्या दृष्टीने मा. मुख्यमंत्री महोदयांनी कोयासन विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यामध्ये घडवून आणलेला परस्पर सामंजस्य करार एक ऐतिहासिक पाउल आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे.

img-20161025-wa0008

अर्थकारण व सांस्कृतिक अभ्यासानंतर आम्ही Nikken Sekkei या नागरी क्षेत्रात काम करणाऱ्या व जागतिक पातळीवर नाव असणाऱ्या कंपनीस भेट दिली. या कंपनीत कार्यरत असणारे पुणेकर श्री. आशिष लाहोटी यांच्या विशेष प्रयत्नाने ही भेट शक्य झाली. नागर विकास नियोजन आणि व्यवस्थापन यामध्ये कार्यरत असणारी ही कंपनी भारतात मुख्य शहरामध्ये ऑफिसेस असणारी आहे. जपानच्या नागरी विकासामध्ये मुख्य योगदान असणारी कंपनी असल्यामुळे आम्ही प्रशिक्षणार्थी अतिशय उस्तुकतेने सर्व काम समजून घेत होतो.  स्मार्ट सिटी संदर्भात या कंपनीने अतिशय अभिनव पद्धतीने काम सुरु केले असून ‘शून्य ऊर्जा वास्तू’ अर्थात ‘Zero Energy Building’ या संकल्पनेवर सध्या काम सुरु आहे. या प्रयत्नातून अनेक पर्यावरणस्नेही इमारती उभारल्या जात आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.

जरी जपान आणि भारत हे दुसऱ्या महायुद्धामध्ये परस्पर विरोधी गटात होते तरी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत-जपान संबंध अत्यंत सहकार्य आणि मैत्रीपूर्ण राहिले आहेत. याचे प्रमुख निदर्शक म्हणजे भारत आणि जपानी कंपन्यांमधला वेगाने वाढणारा व्यापार. आणखी एक कौतुकास्पद गोष्ट इथे नमूद करतो. ‘बीबीसी’ ने केलेल्या एका सर्वे मध्ये जवळजवळ ४२% जपानी लोकांनी भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत असल्याचे सांगितले आहे हे निश्चितच जपान हा भारताचा जवळचा मित्र आहे हे सिद्ध करणारे आहे. देशातील जनता कार्यनिष्ठ मुल्यवादी असल्याशिवाय देशाची आर्थिक प्रगती होत नाही हे जपानने सिद्ध केल आहे. उद्योजकता म्हणजे गुणवत्तेविषयी तडजोड करून उत्पादन बनवून फक्त ग्राहकांच्या माथी  माल मारणे असल्या प्रकाराला उद्योजकीय यश समजणाऱ्या भारतातील विशिष्ट वैचारीक प्रवाहाने जपानच्या कार्यशीलतेमधून खूप काही शिकण्यासारखे आहे.

header-add

Leave a Reply

Your email address will not be published.

मित्र देश असावा जपानसारखा …

by जमीर लेंगरेकर वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘योकोहामा’ चा सर्वांगीण स्वच्छतेचा आदर्श

आपल्या देशात जसे भ्रष्टाचार, गरीबी, निरक्षरता, अनारोग्य, स्वार्थाने बरबटलेले राजकारण असे कधीही न संपणारे विषय आहेत, त्याच पद्धतीने सांडपाण्याचा विषय

Close