‘योकोहामा’ चा सर्वांगीण स्वच्छतेचा आदर्श0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

आपल्या देशात जसे भ्रष्टाचार, गरीबी, निरक्षरता, अनारोग्य, स्वार्थाने बरबटलेले राजकारण असे कधीही न संपणारे विषय आहेत, त्याच पद्धतीने सांडपाण्याचा विषय इथून जाण्याचे नावच घेत नाही. हा विषय वाटतो तितका साधा आणि सोपा मुळीच नाही. भारतातल्या सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्य समस्येशी खोलवर निगडीत असा विषय आहे हा. सर्वात महत्वाची आणि चिंताजनक बाब हीच की आजही अनेकदा निवडणुकीच्या जाहिरनाम्यात शौचालय बांधणे हा विषय असतो मात्र सांडपाण्यावर प्रक्रिया करणे असा विषय अपवादाने आढळतो. आम्ही जेवढे सहजतेने याकडे बघतो त्याच्या अगदी उलट तितक्याच गांभीर्याने जपानने याला महत्त्व दिले आहे. आमच्या या दौऱ्यात सकाळी आम्ही योकोहामाचा मैलाजल प्रक्रिया प्रकल्प (Sewage Treatment Plant (STP) ) पाहण्यासाठी आणि अभ्यास करण्यास गेलो. हा योकोहामा ‘एन्व्हायरन्मेंटल प्लॅनिंग ब्युरो’ द्वारा नियंत्रित केला जातो.

img-20161025-wa0014

थोडक्यात STP म्हणजे मैलाजल (Sewage Sludge ) शुद्धीकरण प्रकल्प. अशा प्रकल्पाला भेट देणे म्हणजे काही गृहितके अगदी डोक्यात अगदी बालपणापासून घर करून असतात. आपल्याकडे तर दोन किलोमीटर आधीच अशा प्रकल्पाची ‘चाहूल’ लागते. इथे मात्र चित्रच वेगळ. प्रकल्पाच्या प्रवेशद्वारातून आत आलो तरी कोणत्याही प्रकारची दुर्गंधी नाही. एखाद्याला जर डोळे बांधून आणले तर हा प्रकल्प कसला आहे हे सांगणेही अवघड होईल, इतकी स्वच्छता आणि टापटीप.

तिथल्या कार्यकारी प्रमुखांनी दुभाषाच्या मदतीने सर्व अधिका-यांना प्रकल्पाची माहिती दिली. संपूर्ण प्रकल्प स्वयंचलित आहे. जैवयांत्रिकी पद्धतीने मैल्यातील पाणी कमी करून त्यातील गाळावर प्रक्रिया करून Incineration Ash, Solid Fuel, आणि Phosphorous  तयार केला जातो. त्या प्रक्रियेत निर्माण होणा-या गॅसचा वापर इंधन म्हणून केला जातो. तसेच, सांडपाण्यावरही अशीच प्रक्रिया करून वापरायोग्य पाणी पुन्हा प्राप्त केले जाते किंवा ते शुद्ध करून समुद्रात, नदीत सोडले जाते. म्हणजे शुन्य टक्के प्रदुषण आणि त्यातूनच इंधन निर्मिती केली जाते. आम्ही हे सर्व पाहून थक्क झालो. कचऱ्यातुंन सोने काढण्यासारखा हा प्रकार आहे.

img-20161025-wa0012

एखाद्या देशाच्या प्रगतीत किती छोट्या-छोट्या बाबींचा सहभाग असतो, हे आम्हाला कळले. बाकीचा भाग थोडा बाजूला ठेवू मात्र अशा मैलाजलातून इंधन निर्मिती जरी आम्ही करू शकलो, तरी आमच्या देशातील लोकसंख्या पाहता आमचा इंधनाचा मोठा प्रश्न मिटेल. अर्थात त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती आणि तितकेच जबाबदारीची जाणीव असलेले नागरिक हवेत. निवडणुका आल्या की सांडपाण्याबाबत गळा काढणारे आणि काहीतरी स्टंट करुन् प्रसिद्धीत राहायचे म्हणून एखाद्या अधिकाऱ्याच्या अंगावर सांडपाणी फेकणारे ‘सुजाण’ स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत, तोवर हे अशक्यच !

img-20161025-wa0019

इच्छाशक्ती हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण हे होवू शकते, हे दाखवून दिले आहे कराड सारख्या छोट्या शहराने. ७० च्या दशकात भुयारी गटार योजना राबवली. मलनिसारण प्रकल्प उभारला. सांडपाणी स्वच्छ करुन शेतीला दिले. त्याकाळी काय राजकीय स्थिती होती, त्यांनी कसा, कोठुन निधी उभारला, त्यात किती अडचणी आल्या, हा स्वतंत्र विषय. मात्र हे इथे आवर्जून नमूद करण्याचे कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि विकासाचे धोरण असेल तर हे होवू शकते. याच एका विधायक दृष्टिकोनातून भारतातल्या समाजकारणाने, राजकारणाने वाटचाल केली, तर आपलाही देश जपानसारखी प्रगती करू शकतो.

भारतामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे फार कमी प्रकल्प आहेत. किंबहुना तश्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाची गरज भारताला आहे याबाबाबत तितकी जाण नाही. अलीकडे ‘स्वच्छ भारत अभियान’ च्या माध्यमातून सोलिड आणि लिक्विड कचरा वेगळा संबोधण्यात आला आहे आणि त्याला तशीच शास्त्रीय कारणे आहेत. पूर्वीच्या काळी अगदी अत्यल्प जलीय मैला तयार होत होता. अगदी घरातील सर्व वापरलेले पाणी किचन गार्डन वगेरे ठिकाणी जिरवून त्याचा नैसर्गिक निःसरण होत होते. सध्या वाढते शहरीकरण, पाण्याचा जास्तीत जास्त वापर, अंघोळीसाठी-भांडे धुण्यासाठी-संडाससाठी-औद्योगिक वापरासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळे रासायनिक पदार्थ इत्यादी घटकांमुळे प्रदूषित सांडपाणी पिण्याच्या व शेतीच्या मुख्य स्त्रोतामध्ये प्रक्रिया न करता मिसळू देणे अत्यंत अवैज्ञानिक आहे. त्यातूनच सार्वजनिक आरोग्याच्या अनेक समस्या उभा राहतात.

सेप्टिक टाकीच्या माध्यमातून होणारा जलीय मैला हा कोणत्याही जलस्त्रोतामध्ये प्रक्रिया न होता मिसळला जात असेल तर त्या शहरांना व गावांना हागणदारीमुक्त (ODF) दर्जा देण्यात येवू नये असे ‘स्वच्छ भारत अभियान’ ने जाहीर केलेल्या व्याख्येतून प्रतीत होते. म्हणजे फक्त संडास बांधणे हे लक्ष्य नसून पूर्ण सांडपाणी प्रक्रिया करून आपले पिण्याचे पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान सध्या भारतासमोर आहे.  हा विषय अजूनही तितक्या गांभीर्याने घेतला गेला नाही. मुळात कोणताही स्वच्छते संदर्भातला प्रकल्प हा एकांगी नसतो ही मुलभूत बाब आपल्या धोरणव्यवस्थेमध्ये तसेच नागरीकांमध्ये येणे आवश्यक आहे.त्याचबरोबर सांडपाणी प्रक्रिया संदर्भातल्या योजना ह्या केंद्रीभूत पद्धतीने राबवणे आवश्यक आहे कारण प्रत्येक शहर जर स्वतःची वेगळी सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था तयार करत असेल तर गुणवत्ता राहील आणि सार्वजनिक आरोग्याच्या उद्देश सफल होईल.

जपान चे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हे जपानच्या सरकार आणि नागरीकांनी मिळून तयार केलेल्या एकसंध स्वच्छता कार्यक्रमाचे फलित आहेत. जपानच्या तांत्रिक विकासाचा आणि इंजिनियरिंगचा नमुना म्हणून संबोधून आपण लोकसहभागातून केलेल्या नियोजनाला कमी लेखने योग्य ठरणार नाही. तात्पर्य,  जपान कडून खूप सारे लर्निंग सुरु आहे आणि हे विचारचक्र लवकर थांबेल असे वाटत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

‘योकोहामा’ चा सर्वांगीण स्वच्छतेचा आदर्श

by जमीर लेंगरेकर वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
झुकs झुकss झुकsss झुकssss विकास गाडी !

एखाद्या देशातील युवकांच्या तोंडी कुठले गाणे आहे, यावरून त्या देशाचे भवितव्य ठरते असे म्हणतात. परंतु मी तर म्हणतो, एखाद्या देशाची

Close