विकासाचा मंत्र खरा ……..अंधकाराला सायोनारा !!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

जपानमधले दैनंदीन जीवन, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे आणि काही प्रकल्प पाहिल्यानंतर आम्ही शेवटच्या दिवशी फक्त टोकीयो पाहणार होतो. तिथे सर्वप्रथम पाहिला तो टोकीयो स्काय ट्री टॉवर. या उंचच उंच टॉवरवरून टोकीयो पाहणे हा अनुभव काही वेगळाच होता. शहरातली खुप महत्वाची ठिकाणे इतक्या उंचीवरून काही वेगळीच भासत होती. खूप वेळ हे विहंगम दृष्य आमच्या डोळयासमोरून जातच नव्हतं. जपानने खास पर्यटनाच्या हेतुने या टॉवरची उभारणी केली आहे. पर्यटकही मोठया संख्येने या टॉवरला भेट देताना दिसतात. या ठिकाणाहून नंतर ‘असाकुसा टेंपल’ इथ गेलो. अतिशय प्रसन्न आणि भक्तीमय वातावरणाचा अनुभव इंथ आला. त्यानंतर वेळ होती ती अर्थातच खरेदीची. कारण जेव्हा मी परत मायभुमीत परतणार तेव्हा सर्वजण पहिला प्रश्न हाच विचारणार की, काय आणलं जपानहून? पण खरं सांगु का, इथल्या वस्तुंच्या किमती आपल्या भारताच्या तुलनेत दुप्पट तिप्पट होत्या. त्यामानाने आमच्या भारत देशात खूपच स्वस्त वस्तु मिळतात. अर्थात तिथले जीवनमान, वेतन हे उच्च असल्यामुळे तिथल्या लोकांना कदाचित या वस्तु परवडतही असतील, पण भारतात त्यामानाने स्वस्त आणि मस्त वस्तु.

img-20161026-wa0020

एकुणच या जपान दौ-यात काही प्रकर्षाने जाणवलेले ठळक मुददे खरेच विचार करायला लावणारे आहेत. जपान हा तंत्रज्ञानाने पुढारलेला देश. रस्ते, रेल्वे, रहदारी याचे मजबुत व अत्याधुनिक जाळे संपूर्ण देशभर विखुरले आहे. परंतु या देशांत वयोवृध्दांची संख्या अधिक आहे. तरूण मनुष्यबळ त्या तुलनेत कमी आहे. खरे तर ही मोठी शोकांतिका आहे. कारण निसर्गसंपदा, समृध्दी, अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च राहणीमान, दर्जेदार मुलभूत सुविधा असुनही इथे तरूण मनुष्यबळाची कमतरता आहे. त्या तुलनेत भारताकडे तरूण मनुष्यबळ अधिक आहे, परंतु इतर सर्वांची वानवा आहे. जपानसारख्या देशात आपल्या तरूणांना अतिशय चांगली संधी आहे. फिलीपिन्स व मलेशीयन लोक इथे निम्नसेवा उद्योगात काम करतात. जपानी लोक भारतीय लोकांना बुध्दीमान मानतात. सध्या या क्षेत्रात भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. परंतु आपल्या देशांत मोठया प्रमाणात असणाऱ्या युवा मनुष्यबळाला इथे खुप मोठी संधी आहेत.

img-20161026-wa0017

जपानसारख्या देशांतले स्वयंपूर्णता आणि इन्फ्रास्ट्रक्चर पाहीले की भारतातल्या पुढील काही धोक्यांची चाहुल लागते. आज आपल्या देशातली शहरे झपाटयाने वाढत आहेत. ग्रामपंचायतींच्या नगरपालिका, नगरपालिकांच्या महानगरपालिका होत आहेत. परंतु असे निर्णय घेत असताना सर्वांत प्रथम लक्ष दिले पाहिजे ते त्या शहरातल्या पायाभूत सुविधा अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर. कारण सुरवातीला ही काळजी नाही घेतली तर प्रत्येक शहरात कचरा, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, रस्ते, शौचालये यांची समस्या जाणवणारंच. जपानी लोकांनी सुरवातीपासून ही काळजी घेतल्याने आणि केलेल्या नियोजनाची संपूर्ण अंमलबजावणी केल्याने आज मुलभूत सुविधा अतिशय शिस्तबध्द आणि अत्याधुनिक स्वरूपात उपलब्ध होवू शकल्या. त्यामुळे जपानच्या या दृष्टीकोनातुन एक चांगला विचार इथे आम्हाला मिळाला की कोणत्याही शहराचा विस्तार हा केवळ राजकारणाचा किंवा राजकीय घोषणेचा एक भाग न होता, आधी तेथील मुलभूत सुविधांचे इन्फ्रास्ट्रक्चर गांभीर्याने उभारले पाहीजे. आज नागपुरसारख्या सतत वाढणा-या शहरातील प्रत्येक टप्प्याची आणि समस्येची अगदी जवळून ओळख आणि अभ्यास आमचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना आहे. त्यांच्यामुळे आपल्या नागरी विकासाला एक गती प्राप्त झाली आहे.

img-20161026-wa0019

कोणत्याही देशाच्या विकासात अडसर ठरणारे जे काही घटक आहेत, ते लांब ठेवल्यानेच आज जपानसारखा देश प्रगतीपथावर आहे. भ्रष्ट्राचार, राजकारण, तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांचा कारणाशिवाय होणार हस्तक्षेप यामुळे खरेच आपल्या देशातले अनेक प्रकल्प आजही रखडलेले आहेत. आज समाजातल्या या सर्वच घटकांनी आपला दृष्टीकोन न बदलल्यास ही परस्थिती आणखी भीषण होत जाणार आणि याला जबाबदारही आपण सारे असू. जपानसारखा देशातला कोपरा न कोपरा पाहताना सातत्याने ही बाब मला जाणवत होती ती ही की आपल्याकडे परंपरा, संस्कृतीचा इतका मोठा ठेवा आहे, इतकी चांगली मंदीरे, पर्यटनस्थळे आहेत, परंतु त्यांचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने हातात हात घालुन पुढे येण्याची गरज आहे. ही केवळ सरकारची जबाबदारी आहे, असे म्हणून आपल्या घरात आपण कोणते तरी न्यूज चॅनेल लावून कॉफीचे घोट घेत आरामात बसलो तर हे शक्यच नाही. अगदी सामान्यातल्या सामान्य नागरीकानेही देशाच्या विकासकार्यात आपले शंभर टक्के योगदान देण्याची गरज आहे. जपानची रेल्वे स्वच्छ असते ती तिथल्या सरकारमुळे नाही तर तिथल्या नागरीकांमुळे. रस्त्यावर कधीही रहदारीची कोंडी होत नाही, याचा अर्थ तिथले वाहतूक पोलिस अतिहुशार आहेत, असे नाही. तिथल्या नागरीकांनी ही स्वयंशिस्त अंगी बाळगली आहे. प्रशासनाची भुमिका एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून असते, पण खरा देश चालवतात ते देशावर ख-या अर्थाने श्रध्दा असणारे आणि २४ x ७ स्वयंशिस्त बाळगणारे नागरीक, हाच एक मौल्यवान विचार घेवून आमच्या विमानाने मुंबईकडे झेप घेतली.

(समाप्त)

selfhood-vc1010101s

Leave a Reply

Your email address will not be published.

विकासाचा मंत्र खरा ……..अंधकाराला सायोनारा !!!

by जमीर लेंगरेकर वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी आबांची कन्या स्मिता पाटील

मुंबई : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँगेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची नियुक्ती केली

Close