करबचती सोबत संपत्ती निर्मितीचा नवा मार्ग: मनोज डाके0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

निमंत्रित विशेष लेख

मार्च महिना म्हटले की चाकरमान्यांची करबचतीसाठी लगबग सुरु होते. करबचतीसाठी आयकराच्या कलम ८० क अंतर्गत उपलब्ध असलेली लोकप्रिय गुंतवणुकीची साधनांमध्ये प्रामुख्याने पी पी एफ, विमा, पी एफ, एन एस सी, बँकेतील ५ वर्षाची मुदत बंद ठेव, आणि म्युच्युअल फंड मधील ई एल एस एस योजनायांचा समावेश होतो. खर पाहता करबचतीचे नियोजन हे नेहमी वर्षाच्या सुरुवातीला करायला पाहिजे. मात्र, पूर्वकल्पना असतानाही बऱ्याचदा मार्च महिना आला आणि ऑफिस मधून करबचतीच्या पावत्या मागितल्या गेल्या आणि मग प्रत्येकातला सुप्त ‘इन्वेस्टमेंट गुरु’ जागा होतो.

करबचतीसाठी आयकराच्या कलम ८० क अंतर्गत आपण रु. १,५०,०००/- ची गुंतवणूक करू शकतो. पारंपरिक पर्याय हे मुख्यत्वे करबचत हा उद्देश समोर ठेवतात. परंतु, नेहमीच्या किंवा पारंपारिक पर्यायांना बगल देऊन करबचतीसोबत संपत्ती निर्मितीची क्षमता असलेल्या म्युच्युअल फंडातील ई एल एस एस (Equity Linked Savings Schemes) फंड्सचा करनियोजनात समावेश हा अलीकडे समोर आलेला सक्षम आणि ग्राहककेंद्रित पर्याय आहे. त्याच महत्वाच कारण म्हणजे पारंपारिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, वाढणारी महागाई, आणि सध्या पगारदार व्यक्तीना बंद झालेली पेन्शन यांचा संयुक्त परिणाम.

ई एल एस एस योजने बाबत बोलायचं झालं तर कलम ८० सी अंतर्गत उपलब्ध सर्वच गुंतवणुकीच्या साधनांमध्ये सर्वात कमी ‘लॉक-इन’ कालावधी या योजनेतच आहे. फक्त ३ वर्षे एवढा कमी ‘लॉक-इन’ कालावधी आणि सोबत दोन अंकी महागाईला संतुलन राखणारा करमुक्त परतावा ही वैशिष्ट्ये निश्चितच या योजेनेला सर्वोत्कृष्ट बनवतात. सलग तीन वर्षे पैसे भरून नंतर याच योजनेतील पैसे काढून परत याच योजनेत गुंतवल्यास तीन वर्षानंतर तुम्हाला नवीन गुंतवणूक न करताही कर बचतीचा लाभ घेणे शक्य होऊ शकते किंवा प्रत्येक वर्षी करबचतीची गुंतवणूक करून निवृत्ती पश्चात त्याचा लाभ घेता येतो.  हे सर्व करत असताना म्युच्युअल फंड या गुंतवणूक प्रकारामध्ये लोकप्रिय असलेल्या एस आय पी या मासिक गुंतवणुकीद्वारे सुद्धा गुंतवणूक करू शकतो आणि त्यामुळे मिळणारा रुपी कॉस्ट अव्हरेजिंगचा फायदा घेता येतो.

या योजनेत सर्वसाधारणपणे दर वर्षी डिव्हिडंड दिला जातो (यासाठी डिव्हिडंड – पेआऊट हा ऑप्शन गुंतवणूक करताना घ्यावा लागतो) यामुळे नियमीत प्रॉफिट बुकिंगही होते त्याचबरोबर मिळणारी रक्कम परत अशाच योजनेत गुंतवून करबचतीचा लाभही घेता येतो. ह्या डिव्हिडंडचा नवीन गुंतवणूकदाराला सरासरी वार्षीक ८ ते १२ टक्के करमुक्त परतावा मिळतो, जो नंतर नंतर वाढतच जातो. ज्या गुंतवणूकदारांनी १५ ते २० वर्षापुर्वी असा पर्याय स्विकारलेला होता त्याना आता मुळ गुंतवणूकीवर ‘तगडा’ साधारण  डिव्हिडंड  (सरासरी ३० ते ६० टक्के) दर वर्षी मिळत आहे.

प्रत्येक म्युच्युअल फंड घराण्याची अशी किमान एक तरी योजना असते. त्यातील एक जुनी आणि परताव्याचे सातत्य राखलेली योजना म्हणजे आय सी आय सी आय प्रूडे लॉंग टर्म इक्विटी फंड, परंतु याबरोबरच अनेक पर्याय इतर कंपन्याकडून उपलब्ध होतात आणि त्यासाठी तुमचा “आर्थिक वैद्य” हाच योग्य सल्लागार असतो.

‘एका दगडात दोन पक्षी मारणे’ अशी एक सर्वश्रुत म्हण आहे. त्याच्याही पुढे जाऊन एका दगडात चार पक्षी मारणे हे काम आपण या योजनेद्वारे करू शकतो. करनियोजन, संपत्ती निर्मिती, करमुक्त परतावा, आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन असे चार पक्षी ही योजना एका सुज्ञ निर्णयातून मिळवून देते.  अशी ई एल एस एस योजना आपल्या करनियोजनात निश्चितच असायलाच हवी. चांगला निर्णय कधीही चांगलाच परिणाम देतो आणि असा निर्णय वेळेत घेणे आवश्यक असते, मग लागा कामाला.

मनोज डाके हे कराड स्थित गुंतवणूक तज्ञ आहेत. लेखक manoj@moneycareservices.com किंवा ९८५०७२५५४३ वर आपल्या शंकांना उत्तरे देण्यासाठी उपलब्ध आहेत.


करबचती सोबत संपत्ती निर्मितीचा नवा मार्ग: मनोज डाके

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूस पं स सभापतीपदी मांगलेकर तर पवार उपसभापती

पलूस (सदानंद माळी): पलूस पंचायत समितीच्या सभापती मा. सीमाताई मांगलेकर व उपसभापती मा. अरूण पवार यांची आज निवड करण्यात आली. 

Close