नवीन आर्थिक वर्ष…नवीन आर्थिक नियोजनाचा संकल्प : मनोज डाके0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

प्रत्येक वर्षी एप्रिल महिना सुरु झाला की सर्वच क्षेत्रात आगामी आर्थिक वर्षासाठी नियोजनास सुरुवात होते. त्यामध्ये विविध संस्था, व्यापारी वर्ग, कंपन्या आणि अगदी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा याचा सारासार विचार केला जातो. आगामी वर्षामध्ये उपलब्ध आर्थिक स्त्रोत, त्या अनुषंगाने खर्च आणि बचतीचे नियोजन केले जाते. खरेतर बचत/गुंतवणूक हे क्षेत्र कॉर्पोरेट पातळीवर जसे सखोल अभ्यासले जाते त्याप्रमाणे याचा व्यक्तिगत पातळीवर विचार केला जात नाही. किंबहुना आपण पैसे कमवायला जेवढा वेळ देतो, जेवढे कष्ट घेतो त्यापैकी किती वेळ आपण गुंतवणूक योग्य व्हावी म्हणून देतो? हा आत्मचिंतनाचा विषय आहे. पण सध्या वेळ आहे ती भौतिक जगातील आपल्या भविष्याचे नियोजन करण्याची.

गुंतवणुकीच नियोजन करत असताना आपण नजीकचा (छोटा कालावधी),मध्यम, आणि दीर्घ कालावधीची उद्दिष्टे समोर ठेऊन केली पाहिजेत. पण अश्या प्रकारे आर्थिक नियोजन बहुतेक ठिकाणी दिसत नाही. नेमक यामुळेच उद्दिष्टपूर्ती मध्ये अडथळा येऊ शकतो. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून उद्दिष्टपूर्ती करण्याच्या दृष्टीकोनातून या नवीन आर्थिक वर्षात आपण नियोजनाचा संकल्प करूया.

भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील अर्थव्यवस्था (Emerging Economy) म्हणून ओळखली जाते. जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल सुखावह आहे. जग अगदी हाकेच्या अंतरावर आलेलं आहे. तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत आहेत. या अशा परीस्थितीत गुंतवणूक क्षेत्र कसे मागे राहील. सन २०१४ मध्ये केंद्रात नवीन सरकार आल्यापासून सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीकोनातून पावले उचलायला सुरु केली. त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून प्रमुख व्याजदरामध्ये कपात करण्यात आली आणि भविष्यात सुद्धा केली जाईल असे चित्र आहे. ज्यावेळी अर्थव्यवस्था गतीमान करावयाची असते त्यावेळी देशांतर्गत उपलब्ध कर्जाचे व्याजदर कमी असणे गरजेचे असते. किंबहुना, त्याशिवाय देशाच्या पायाभूत विकास आणि एकूणच उद्योगधंद्याला गती मिळत नाही. कर्ज जेव्हा स्वस्त होतात तेव्हा स्वाभाविकपणे बँकांना त्याच्या मुदत ठेवींचे व्याजदर कमी करणे गरजेचे असते. आपण या व्याजदरावर जर एक कटाक्ष टाकला तर पाठीमागच्या १ ते १.५ वर्षात जवळजवळ २ ते २.५ टक्यांनी कमी झालेलं आहे. त्यामूळे मुदत ठेवींबरोबर प्रामुख्याने गृहबांधणी कर्ज आणि औद्योगिक कर्जांचे दर खाली आलेले आहेत. याचाच दुसरा भाग म्हणजे सरकारनेही त्यांच्या पी.पी.एफ., पी.एफ., ई.पी.एफ., पोष्टाच्या सर्व योजना, अन्यूटी (पेन्शन) दर, सुकन्या योजना यावरील व्याजदर कमी केलेले आहेत. या अवस्थेत सर्वसामान्य गुंतवणूकदार कोड्यात पडला आहे. त्यात भर पडली आहे ती नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या साशंक वातावरणाची आणि वाढत्या महागाई मुळे नियोजन कोलमडण्याची. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकालाच  “आर्थिक वैद्याची” गरज वाटू लागली आहे.

आर्थिक वैद्य आपल्याला गरजेनुसार गुंतवणुकीचे नियोजन करून देण्यात मदत करतात. आपल्याला कमी जोखमीचे पण जादा परताव्याचे विविध मार्ग उपलब्ध करून देतात. म्युच्युअल फंड सारख्या दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालेलेल्या गुंतवणूक माध्यमापासून जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून द्यायचा याच मार्गदर्शन करतात. निवृत्ती नियोजन (Retirement), मुलांच्या शिक्षणाचे / लग्नाचे नियोजन, विशिष्ठ कालावधीमध्ये विशिष्ठ संपत्ती निर्मिती (Targeted Corpus), करमुक्त परतावे (Tax Free Returns) कसे मिळवायचे, ई एल एस एस योजनांद्वारे करबचतीचे नियोजन (Tax Planning), देशाच्या विकासाचा भागीदार असणार्या समभाग गुंतवणुकी पासून दीर्घकालीन संपत्ती निर्मिती कशी करायची, बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा आकर्षक व सुलभ पण जादा परतावा देणाऱ्या योजना (Fixed Income Schemes), बॉण्ड मधील गुंतवणूकीचे पर्याय, शोर्ट टर्म  किंवा आपत्कालीन व्यवस्थापना मध्ये (Emergency/Quantingency) लिक्विड फंड द्वारे नियोजन, जोखमीचे नियोजन (Risk/Insurance Management), सिप (Systematic Investment Plan) चा दीर्घकालीन नियोजनात समावेश, गुंतवणुकीचे असेट अलोकेशन (Asset Allocation), पोर्टफोलिओ नियोजन (Portfolio Management) अशा अनेक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करू शकतात आणि आर्थिक जीवन सुखकर होण्यात मदत होते. तसेच त्यांच्या सल्ल्यामुळे आपल्याला आर्थिक शिस्त सुद्धा लागायला मदत होते.

“If you fail to plan, you are planning to fail! ” अस प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाइन यांनी म्हटलेलं आहे. अशी वेळ यायच्या अगोदर या नवीन वर्षाच्या प्रसंगी आपले गुंतवणुकीचे नियोजन करून आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या आयुष्याच नियोजन सुखकर करण्याचा प्रयत्न करूया. चांगला निर्णय कधीही चांगलाच परिणाम देतो आणि असा निर्णय वेळेत घेणे आवश्यक असते, मग लागा कामाला  आगामी नवीन आर्थिक वर्षासाठी आपणाला भरभरून परताव्याच्या शुभेच्छा..!!

मनोज डाके हे कराड स्थित गुंतवणूक तज्ञ आहेत. लेखक manoj@moneycareservices.com किंवा ९८५०७२५५४३ वर उपलब्ध आहेत.

नवीन आर्थिक वर्ष…नवीन आर्थिक नियोजनाचा संकल्प : मनोज डाके

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पै. वैभव रास्कर ' मुंबई कामगार केसरी' किताबाचे मानकरी

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगावचे सुपुत्र वैभव कृष्णत रास्कर यांनी मुबंई येथे  झालेल्या मुबंई महाराष्ट्र कामगार केसरी कुस्ती स्पर्धेत चांदीची गदा

Close