पुस्तकाच गाव, भिलार त्याच नावं !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

महाबळेश्वर (संग्राम इंगळे) :  सह्याद्रिच्या डोंगर रांगात वसलेलं भिलार गावं. गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून याची ओळख आहे. येथे पिकाणारी स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी महोत्सव पर्यटकांना खुणावतो. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामुळे या परिसरात साक्षात लक्ष्मीच नांदते. मात्र आता या गावात लक्ष्मी बरोबर सरस्वतीचा वास असणार आहे.

देशातलं पहिलं पुस्तकाचं गाव होण्याचा मान या गावाला मिळाला आहे. हे गाव आता साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज दि. ४ मे २०१७ रोजी पुस्तकांच्या गावाचे लोकार्पण होत आहे, त्या निमित्त…

मुळात देशात थंड हवेसाठी प्रसिध्द असणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणी या हिलस्टेशनच्या जवळच सुमारे तीन हजार लोकवस्तीचे भिलार गाव वसले आहे. येथे पिकाणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या गोडीने इवल्याशा भिलारचं नाव जगाच्या नकाशावर उमटले आहे. त्यामुळे पाचगणी-महाबळेश्वरला येणाऱ्यांना भिलार हे गाव चांगलेच परिचयाचे झाले आहे. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात येथे भरणाऱ्या स्ट्रॉबेरी महोत्सवाने अनेकांना भुरळ घातली आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना साहित्याची मेजवाणी मिळावी यासाठी ही योजना साकारण्यात आली आहे.

स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामुळे डोंगराळ भागातील हे गाव आर्थिक संपन्न झाले आहे. आर्थिक सुब्बतेच्या खुणाही गावात गेल्यानंतर सहज लक्ष वेधतात. या निमित्ताने या गावात लक्ष्मी नांदत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. या गावाला पर्यटनाची आणखी जोड देण्यासाठी पुस्तकांच्या गावाची संकल्पना पुढे आली. पुस्तकांचे गाव ही कल्पनाच भन्नाट आहे. ही भन्नाट कल्पनाही तितक्याच कल्पकतेने भिलारमध्ये साकारण्यात आली आहे. गावात प्रवेश करताच तेथील घरांच्या भिंतीवर चितारण्यात आलेली चित्रचं येणाऱ्यांशी संवाद साधतात.

पुस्तकाचे गाव साकारण्यासाठी केवळ मोठी ग्रंथालये काढून चालणार नाही, तर त्यासाठी स्थानिक लोकांनाही या उपक्रमात जोडले पाहिजे. या संकल्पनेतूनच गावातील २५ घरांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. या २५ घरात विविध विषयांवरील जवळपास १५ हजार पुस्तकांचा खजिना ठेवण्यात आला आहे, यामध्ये कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, स्त्री साहित्य, संतसाहित्य, चरित्र आदी विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे.

परदेशी पर्यटनाच्या धर्तीवर ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. या संकल्पनेनुसार या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले पर्यटक किंवा रसिक-वाचक निवडलेल्या घरांमध्ये जाऊन निवांत वाचन करु शकणार आहेत. या निवडलेल्या २५ घरांवर विविध प्रकाची चित्र रेखाटण्यात आली आहेत. ही चित्रेही वैशिष्टपूर्ण आहेत. या‍ चित्रांच्याही संगती लावण्यात आल्या आहेत, हे विशेष होय. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात साहित्य वाचकाला उपलब्ध होणार आहे. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतसाहित्य व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होणार आहे. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती होणार आहे.

या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना निवास व भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निवडलेल्या घरातच ही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे या घरातील लोकांना पर्यटनाचा नवा रोजगारही उपलब्ध होणार आहे. तर पर्यटकांना स्थानिक पध्दतीचे, घरगुती जेवण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी पर्यटकांची नेत्र, जिव्हा आणि बौध्दिक भूक भागणार आहे. दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याची उन्हाळी सुटटी लक्षात घेऊन येथे बाल साहित्य महोत्सवाचेही आयोजन केले जाणार आहेत. याचबरोबर वाचन, लेखन, प्रकाशन आणि प्रशिक्षण कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने, काव्यवाचन, अभिवाचन आणि साहित्यिक गप्पा असे विविध कार्यक्रमांचेही आयोजन या गावात करण्यात येणार आहे.

केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. पंचवीस घरात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली असून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्याच्या आवडीप्रमाणं वाचन करता येणार आहे. जवळपास शंभर प्रकाशकांची पंधरा हजार मराठी पुस्तकं या गावात ठेवण्यात आली आहेत. तसेच वाचनाचा कंटाळा येणाऱ्या पर्यटकांसाठीही येथे इ-पुस्तकांची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी शंभर बोलकी पुस्तकं या इ-बुकच्या माध्यमातून पर्यकांशी संवाद साधणार आहेत. पुस्तकांच्या गावात वर्षभर विविध उपक्रम राबिवले जाणार आहेत. अशा प्रकारे भिलार खऱ्या अर्थानं पर्यटकांना समृध्द करणारं पुस्तकांच गाव झाले आहे.

काय आहे पुस्तकांच्या गावात…

 • २५ घरात १५  हजार पुस्तकांचा खजिना.
 • पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध.
 • चित्रांच्या संगतीनुसार पुस्तकांची मांडणी.
 • गावात कथाकथन अन् कविता वाचनाचे आयोजन.
 • पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक.
 • वाचन-संपादन-मुद्रितशोधनाची होणार कार्यशाळा.
 • अंधांसाठी ब्रेल लीपीसह इ-बुकची उपलब्धता.
 • पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे.

कसे आहे पुस्तकांचे गाव…

 • महाबळेश्वर-पाचगणीच्या जवळ सह्याद्रिच्या कुशीत.
 • सुमारे तीन हजार लोकवस्तीचे साडे तीनशे उंबऱ्यांचे गाव.
 • स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी महोत्सवासाठी देशात प्रसिध्द.
 • पुण्यापासून ११० तर साताऱ्यापासून केवळ ५५  किलोमीटरवर.
 • निसर्गाच्या सानिध्यात साहित्याचा सहवास.

छाया : संग्राम इंगळे, बारामती


मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.


                                                                                                                                                                                          (जाहिरात)


पुस्तकाच गाव, भिलार त्याच नावं !

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आली आली सर ही ओली…

पलूस (प्रतिनिधी) : कडाक्याच ऊन, घामान अंगाची होणारी लाही लाही, कोरडा पडणारा घसा आणि  जीवाची होणारी काहिली....गेले तीन चार महीने

Close