आता खरा ‘कस’ लागणार…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

संपादकीय

शेतकऱ्यांचा संप आणि त्या अनुषंगाने सुरु असलेल्या राजकारणाने आणि चळवळीतील अनपेक्षित रागरंग पाहून अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी सक्षमपणे व दूरदृष्टीने न हाताळता तात्पुरते मलम लावण्याच्या प्रवृत्तीमुळे सध्याचे शेतीविषयक प्रश्न अतिशय किचकट होऊन बसले आहेत. त्यातून अनैतिक पद्धतीने झालेल्या राजकीय प्रचारातून विदर्भ – मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र – नाशिक आणि कोकण असे ‘क्लास’ मार्क्सवादी पद्धतीने तयार करण्याचे केविलवाणे प्रयत्न करण्यात आलेत. या सर्व गोंधळामध्ये सर्वात दुर्दैवी अवस्था झालीय ती छोट्या शेतकऱ्याची कारण त्याचे प्रतिनिधित्व करणारे राजकारणी तर केव्हाच संपले होते पण चळवळी व समाजकारण यामध्ये जो थोडासा सहानभूतीने विचार करणारा सुज्ञ टक्का उरलेला तोही शहरीकरण आणि मध्यमवर्गीय राजकारणात संपून गेलाय. अगदी खोलवर जाऊन पहिले तर ‘शेती’ या सेक्टरवर सगळ्याच सेक्टरनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकऱ्याला एकटे पाडले आहे.

कालच्या बंदला सर्वत्र संपूर्ण पाठींबा निश्चितच होता आणि ते महाराष्ट्राचा सुज्ञपणा अजूनही ‘व्हाटसप्प ‘ क्रांतीमध्ये हरवला नाही आहे या जिवंतपणाचे लक्षण म्हणून घ्यायला हरकत नाही. पण, यामुळे ‘शेती’  हा एक पारंपारीक व्यवसाय किंवा जीवनशैली म्हणून स्वीकारणारे वाढतील किंवा शेतीविषयक शहरी जगाचा दृष्टीकोन सुधारेल अशी तिळमात्र शक्यता नाही. शेतीचे प्रश्न हे नव्या विकासनीतीमध्ये ‘दुखनं’ म्हणूनच घेतले जाणार आहेत. याला कारण एकाच आहे – गेल्या काही वर्षात पद्धतशीरपणे शेतीमधील चळवळी मारण्याचे जागतिक प्रयत्न. खोलात जाऊन पहिले तर शेतीमधली चळवळ जवळपास सुप्त झालीय आणि शेतीला नेतृत्व राहिलेले नाही. हे नेतृत्व फक्त राजकारणात किंवा अर्थकारणात नव्हे तर इतर ज्ञान व धोरण क्षेत्रातसुद्धा शेतकऱ्याचा वाली नाही राहिला. हे का झाले असावे? याविषयी मराठी मुलुखातल्या समस्त ‘अस्सल’  शेतकऱ्यांनी गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. कारण बदलत्या आर्थिक प्रवाहात सक्षम व अभ्यासू आणि मुळे जमिनीत रुतलेल्या, मातीशी इमान राखणाऱ्या ज्ञानाधारित नेतृत्वानेच काहीतरी प्रश्न मार्गी लागू शकतात. अर्थात, हे नेतृत्व केंद्रीय किंवा राजकीय असायला हवे असा अजिबात अर्थ नाही. राजकारणात न जाता प्रश्न सुटणे हे सुद्धा चांगल्या लोकशाहीचे लक्षण असू शकते. किंबहुना, शेतीचे नेतृत्व हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात तयार झाले पाहिजे म्हणजे शेतकरी नेत्यांना ‘म्यानेज’ करण्याचे सगळे कावे संपुष्टात येतील.

अलीकडे संपाच्या निमित्ताने शेतीविषयक प्रश्नांची सर्वांगीण चर्चा होईल व मराठी जनतेला शेतीच्या प्रश्नांवर काहीतरी सविस्तर माहिती मिळेल, उद्बोधन होईल , अशी शक्यता होती पण शहरी मध्यमवर्गीय मिडियाने ती शक्यता अनावश्यक चर्चेला आणि व्यक्तींना प्राधान्य देवून मोडीत काढली. शेतकऱ्याच्या चळवळीत अनेक नवीन प्रकारची ‘नवीन कलमे’ घुसली आहेत आणि त्याच्यामुळे नवीन किडी तयार झाली आहे आणि त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे, हे कुणीही नाकारणार नाही. पण, मिडियाने स्वतःचे अज्ञान न दाखवता ‘अस्सल’ शेतकरी जनतेला समोर आणून खऱ्या प्रश्नांची उकल केली पाहिजे.

हरितक्रांतीच्या लाटेवर स्वार होऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीची ‘फ्याकटरी करून’ फक्त ऊस किंवा कापूस अश्या सहज-सुलभ आणि ‘कष्टेविन’ धन देणाऱ्या शेतीत स्वतःचे ज्ञान खूप वाढवले आहे आणि त्यातून शेतीची पर्यावरणीय दुरावस्था केली आहे. यातूनच आत्मा हरवलेल्या शेतकऱ्यांची एक राजकीय जातकुळी तयार झाली आहे जी फक्त पैश्याच्या भाषेत शेतीचे प्रश्न मांडायला शिकली आहे. जागतिक पातळीवर जाऊन पाहिल्यास शेतीचे खरे आव्हान हे जागतिक तापमान बदल आणि त्याचा शेतीवर आणि पर्यायाने अन्नसाखळीवर होणारा बदल याचे असणार आहे. याविषयी शेतकऱ्यांनी गंभीर होऊन दूरदृष्टी ने उपाय योजना तयार करणे व सरकारला पाउले उचलण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. शेतीचे राजकारण किंवा धर्मकारण किंवा विज्ञान न बनवता शेतीची शाश्वतता पारंपारीक चौकटीत सर्वांनी बसून तयार करणे आवश्यक आहे. आणि या सर्व कामाला शेतकऱ्याच्या खिशातला एकही पैसा जाऊ नये असेच धोरण तयार केले पाहिजे.

सध्याच्या अर्थव्यवस्थेत शहरकेंद्रित विकासनीतीवर जोर असल्याने शेतीसारखे ग्रामीण क्षेत्र तथाकथित विकसित मध्यमवर्गाला दिसेल की नाही हे अगदी गावातलं शेंबड पोरग सुद्धा सांगू शकेल. त्यामुळे समस्त शेतकऱ्यांना स्वतः कंबर कसून समोर येणे आणि स्थानिक पातळीवर आपला ‘खुटा’ मजबूत करणे आवश्यक आहे. शेतीला सगळ्यात जास्त धोका आहे तो कष्ट न करता जमिनीतून पैसे कमावणाऱ्या हरीतक्रांतीच्या पुढच्या पिढीचा. कारण ही ‘पिढी’ मातीशी इमान राखणारी नाही तर फक्त आणि फक्त ‘पैश्याशी’ इमान राखणारी आहे. शेतकरी श्रीमंत होऊ नये असा याचा अर्थ अजिबात नाही. पण, पण शेती जर ‘नीच’ पातळीवर जाऊन फक्त पैश्यात पहिली तर जमीन विकून किंवा जमिनीवर काडीपेटीसारख्या इमारती बांधून ‘हिरीचं पाणी’ टाकीत चढवणारी पोकळ जनता तयार होईल, किंबहुना ती तयार झाली आहे. ती वाढू न देणे हे फक्त शेतकऱ्यांचा हातात आहे.  मुळात मनाने आणि धनाने श्रीमंत असणाऱ्या तमाम मराठी शेतकऱ्यांना ”नक्की काय चाललंय?’ हे कळत नाही असे नाही. भलेही शेतकरी नेत्यांनी मातीशी इमान सोडले असेल पण ‘अस्सल’ शेतकऱ्याने ते सोडले नाही म्हणूनच शेती जिवंत आहे नाहीतर मराठी जनता उपासमार होऊन केव्हाच ‘वर’ गेली असती. खरी लढाई शेतकऱ्यांनी कोणत्याही नेतृत्वाशिवाय एकजुटीने शेतीचे प्रश्न सरकारला सोडवायला भाग पाडणे याची आहे. आणि हे काम फक्त ‘अस्सल’ मातीचे पूत करू शकतात. ‘भेसळ’ झालेल्या लोकांनी शेतकऱ्यांच्या चळवळीतून स्वतःहून बाहेर पडणे चांगले नायतर गनिमी कावा करणारा मराठी शेतकरी  ‘तण’ काढून टाकायला मागे पुढे बघणार नाही यात शंका नाही. संपाच्या निमित्ताने महाराजांच्या महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी पहिल्यांदाच इतकी ‘कसदार’ वाटायला लागली आहे.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

 

One thought on “आता खरा ‘कस’ लागणार…!!!

Comments are closed.

आता खरा ‘कस’ लागणार…!!!

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
कडेगाव-पलूस लाइव न्यूज वर जाहिरात द्यायचीय?

'कडेगाव-पलूस लाइव न्यूज' हे आपल्या भागात वेगानं वाढणार बातम्यांचं व उपयुक्त माहितीचं दालन आहे. फक्त भागातच नव्हे तर पुणे मुंबई

Close