कृषी संस्कृती विषयी कृतज्ञता0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

संपादकीय

अलीकडे शेतीचा प्रश्न फक्त कर्जमाफीचे आख्यान बनून राहिला आहे त्यामुळे आजचा ‘कृषी दिन’ बहुतेक पुन्हा एकदा असाच निघून जाणार. त्यातून आज GST चा पहिला दिवस असल्याने शेतकरी पुन्हा एकदा ‘कृषी दिवस’ असला तरी मर्यादित TRP घेऊन शांतपणे शेतीच्या कामात व्यस्त राहणार हे उघड आहे. प्रामाणिकपणे आपले काम करत राहणाऱ्या शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. सर्व वातावरण शेतीविरोधी असतानाही अजूनही आपल्या ‘मुळांशी’ बांधिलकी ठेवून धान्य, भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याविषयी दाखवावी तेवढी कृतज्ञता कमीच आहे. पण, नक्की कोण शेतकऱ्याविषयी किती कृतज्ञ आहे ते समजून घेणे हे आजच्या विशेष दिवसाच्या निमित्ताने समजून घेणे औचित्यपूर्ण ठरेल.

गेली काही दशके, म्हणजे पारंपारीक शेती हरीतक्रांतीमध्ये बदलून झाल्यानंतर, शेतीविषयी विचार करण्याची शेतकऱ्यांची आणि इतर व्यावसायिक – नोकरदार गटांची मानसिकता व मुल्ये बदलत गेली आहेत. सहकाराच्या माध्यमातून सुरु झालेले साखर कारखाने, हायटेक बियाण्यांच्या माध्यमातून वाढलेलं कापूस, केळीचे उत्पादन, आणखी बरेच तथाकथित शास्त्रीय प्रयोग करून शेती एका वेगळ्या अवस्थेत गेली आहे. शेतीचा वाढता खर्च, मालाची ढासळलेली किंमत, उदासीन सामाजिक, प्रशासकीय, राजकीय वातावरण, हवामानातील बदल असे कैक प्रश्न सध्या शेतीसमोर आहेत. पण, त्याहीपेक्षा गंभीर प्रश्न आहे तो ‘शेती’ विषयक बदललेल्या तथाकथित शहरी मध्यमवर्गाच्या मुल्यांचा.

एरवी शेतकरी किंवा कोणताही अट्टल ग्रामीण समाज शहरी नवमध्यमवर्गाला किंवा त्यांच्या विकासविषयक विचारांना भीक घालणार नाही. पण, जेव्हा शहरीकरण आणि नोकरदार मध्यमवर्गनिर्मिती हा सरकारी धोरणाचा भाग बनवला जातो तेव्हा आपसूकच शेतकऱ्यालाही सर्वत्र पाहून राहावे लागते. कर्जमाफीच्या आंदोलनाच्या वेळी या मध्यमवर्गाकडून शेतकऱ्यांविषयी जी मुक्ताफळे उधळण्यात आली ती पहिली की जग आणि देश नक्की कुठल्या दिशेने चाललंय याचा सहज अंदाज येवू शकतो. नक्की शेतीतली काय खटकत ज्यामुळे शेतमालाला भाव देणे, कर्जमाफी वगेरे प्रश्न फक्त शेतकऱ्याचे बनून राहतात आणि बाकीचं जग त्याच्या विरुद्ध जाते?

शहरीकरणामधून तयार होणाऱ्या नव्या समाजाचे सौंदर्यशास्त्र बिघडलंय का ? बैलगाडी फक्त कृषीपर्यटन केंद्रात जाऊन सेल्फी काढण्यासाठीचे वाहन आहे काय? असे हजारो प्रश्न याविषयी उपस्थित होतील. सरकार आणि अर्थतज्ञच नव्हे तर अगदी हायस्कूलला जाणारे शेबंड पोरगं सुद्धा सांगू शकेल की शेती पिकली नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळते आणि बाजारात मंदी येते. परंतु गेली काही वर्षे शेतीचा राष्ट्रीय अर्थकारणात असलेला हिरोचा रोल कमी करण्यात आलेला आहे. याच दिग्दर्शन कोण करतंय हा तपासाचा विषय ठरू शकतो. आपल्याच देशातील स्वतःला विकासोन्मुख म्हणवून घेणारा शहरी मध्यमवर्ग आंदोलन सोडा पण साध शेतीच्या कुठल्याही प्रश्नावर घराच्या बाहेर पडत नाही. अश्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी विशेष दबाव आणि शेतीचा प्रभाव न जाणवणे हे स्वाभाविक आहे. अर्थात, शेतकऱ्यांच्या स्वतःच्या चळवळी आहेत म्हणून अल्प-स्वल्प का होईना, शेतीविषयक चर्चा केली जाते. अर्थात हे यश सामान्य शेतकऱ्याचे आहे. बाकी शेतीतल्या चळवळींच्या नेतृत्वाविषयी अधिक न बोललेलं बर.

हरीतक्रांतीचे फायदे वापरून खाजगी उद्योगांमध्ये उतरून किंवा नोकरी करून भलेही काही शेतकऱ्यांनी शेतीतली ‘रिस्क’ कमी केली असली तरी बाकीच्या अनुत्पादक संस्कृतीमध्ये शाश्वत विकास शक्य नसून फक्त शेती हाच पृथ्वीच्या सुरक्षित पर्यावरणाचा शाश्वत मार्ग आहे. पूर्वजांनी दिलेला पारंपारीक कृषी मुल्यांचा वारसा किती महान आहे हे कदाचित सध्याच्या ‘आर्थिक’ चष्म्यातून दिसत नसेल पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. ‘कृषी दिन’  हा त्या मातीतून तयार झालेल्या अस्सल कृषी मुल्यांची आणि कृषक संस्कृतीच्या गौरवाचा दिन आहे.

लिंगायत धर्म संस्थापक बसवेश्वर म्हणतात,

ज्याने आपल्या घामाने ही काळी माती भिजवली,
कष्ट उपसलेत पोटासाठी आयुष्यभर,
अखंड श्रमाने ज्याने आपला देह राबविला ,
ज्याने आपले तन, मन, श्रमपूर्वक झिजवले ,
श्रमाची पूजा करुन ज्याने शिवाची पूजा केली ,
श्रमिकांच्या झोपडीला जो कैलास मानतो.
ज्याची कथनी तशी करणी असे कूडलसंगमदेवा, तोची जगदगुरु झाला

भारतीय कृषकसंस्कृतीचे पाइक असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवाना ‘कृषी दिनाच्या’ शुभेच्छा.जाहिरात


 

कृषी संस्कृती विषयी कृतज्ञता

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
विशेष लेख: सोशल मीडियाची पावर

व्हाटसप, फेसबुक किंवा ट्विटर नक्की काय करू शकते याविषयी ग्रामीण भागात शंका असणे शक्य आहे. या शंका मुख्यतः पारंपारीक संवाद

Close