तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई: संपादकीय0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कृषीसंस्कृतीचा मूलाधार म्हणजे बैल आणि त्या बैलाच्या शेतीमधल्या अमर्याद योगदानाविषयी कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे ‘बैलपोळा’ किंवा ‘बेंदूर’. हरीतक्रांतीच्या लाटेवर स्वार होऊन पारंपारीक शेतीव्यवस्था व शेतीसंस्कृतीला मागे टाकत एका ‘हायब्रीड’ अवस्थेला पोचलेला शेतकरी व ग्रामीण वर्ग सध्या संक्रमणातून जात आहे. तरीही, ‘आपण परंपरेपेक्षा मोठे नाही’ हा ‘हिंदू’ कार प्रा. नेमाडे यांचा देशीवादी सिद्धांत आजही ‘कृषीसंस्कृती’ला लागु पडतो. भलेही आता घरटी बैलजोडी दिसत नसली तरी ज्यांना परंपरेचा अभिमान आहे आणि ज्यांची मूळ अजूनही इथल्या मूलनिवासी मातीत खोलवर गेली आहेत त्यांनी ‘बैल’ अजूनही सोडला नाही. कोणतीही सांस्कृतिक परंपरा ही एकांगी नसते तर ती रोजच्या जीवनशैलीचा आणि व्यवहाराचा भाग असते. सध्या सर्व भारताचे लक्ष सध्या ‘गाई’ या एकमेव पशुवर असल्याने बैल मागे पडला आहे हे तर स्पष्ट आहे. त्यातून बैलगाड्या शर्यत सारख्या अतिशय जुन्या कृषीपरंपरेवर झालेले आघात पाहता ‘बैल’ हा भयंकर दुर्लक्षित पशु झाला आहे.

शेतकऱ्याला त्याच्या ‘कुणबी’ मुशीतून बाहेर काढण्याचे केविलवाणे प्रयत्न गेली अनेक दशके बऱ्याच घटकांकडून सुरु आहेत. संतुलित पारंपारीक शेतीला वाळीत टाकून ऊस, कापूस व तत्सम नगदी पिकांमध्ये खोलात गुंतवून ‘शेतकरी आणि निसर्ग’ हे पारंपारीक जैविक नाते सोडून ‘शेतकरी आणि कारखानदार नेते’ असे अर्थ-राजकीय नाते तयार झाले आहे. त्याहीपेक्षा दुर्दैव म्हणजे यांत्रिक शेतीचे पाश्च्यात प्रकार डोळे झाकून भारतीय कृषीवर तथाकथित वैज्ञानीक प्रगतीचे लक्षण ठरवून लादल्याने शेतीचे आणि पर्यायाने शेतकऱ्याचे अमाप नुकसान झाले आहे. अर्थात, याची जबाबदारी घ्यायला कुणीच समोर येत नाही आणि असल्या मुलभूत प्रश्नांवर चर्चा करणे ‘हरीतक्रांतीमत्त’ शेतकऱ्यांना आणि त्यांच्या नेत्यांना परवडणारे नाहीच. इथे राजकीय गटांना बैलपोळ्याच्या निमित्ताने चर्चेत आणायचे कारण म्हणजे शेतीची व शेतकऱ्याची झालेली हानी आणि पर्यायाने एकूणच कृषीसंस्कृतीवर झालेला हल्ला अधोरेखित करणे हे आहे. बंदी घालणे व उठवणे या सत्रातून जात असलेल्या ‘बैलगाड्या शर्यती’ हे कृषीसंस्कृतीवरील या नवसांस्कृतिक हल्ल्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घेता येईल.

सध्या शेतीविषयी धोरण निर्मिती व शहरी विज्ञानवादी पिढ्यांचे शेतीच्या राष्ट्रीय अर्थकारणातील स्थानाविषयीचे अज्ञान यांचाच गोलमाल सुरु असताना शेती, शेतकरी आणि बैलगाडी शर्यत यांचे ‘सेंद्रिय’ नाते सर्वाना समजावणे आणि समजणे म्हणजे मोठेच आव्हान आहे. तरीही काही गोष्टी अधोरेखित करणे आवश्यक आहे. पारंपारीक शेतीमध्ये शेतकरी सगळ्यात जास्त वेळ कोणासोबत घालवत असेल तर ‘कारभारीण’ हे त्याचे पटकन जिभेवर येणारे उत्तर चूक आहे. अर्थात, बरोबर उत्तर आहे ‘ढवळ्या-पवळ्या’. अश्या एकसंध आणि शेतीसंस्कृतीने बांधलेल्या अविभाज्य ‘बैल-शेतकरी’ नात्याला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारी परंपरा म्हणजेच ‘बैलगाडी शर्यत’.

जेव्हा शेतकरी वार्षिक जत्रेत आपली सगळी ‘मनातली’ खरेदी आणि मजा करून घेतो तेव्हा त्याच्या जिवलग बैलानाही त्यांची मस्ती दाखवण्याची संधी आवश्यक असते आणि त्याची परिणीती म्हणजेच ‘बैलगाडी शर्यत’. याच्यात ‘रानटीपणा’ नसून अगदी पारंपारीक काळापासून जपलेलं सेंद्रिय नातं आहे. या पारंपारीकतेला ग्रहण लागलं ते काही अज्ञानी शेतकऱ्यांनी बैलगाडी शर्यती मध्ये घुसवलेल्या अनैतिक पद्धतीमुळे. शेतकऱ्याची मातीतून आलेली अस्सल रसिकता काळवांडनारे काही तुच्छ जीव एका सांस्कृतिक परंपरेची हानी करत राहिले आणि शेतकरीही याविषयी काही बोलू किंवा करू शकला नाही. ज्या यात्रांमध्ये पारंपारीक बैलगाडी शर्यतीला इजा पोचवणारे आणि बैलांची हानी करणारे प्रकार चालत त्यामध्ये काही मूल्यवादी लोकांनी बैलगाड्या शर्यतीमध्ये बऱ्याच चुकीच्या प्रकारांवर बंदी घातली होतीच. परंतु, बैलगाडी शर्यत असो किंवा शेती असो त्यातील बऱ्याच समस्यांना नक्की कुणी आणि कसा अटकाव घातला पाहिजे याविषयी अजूनही संदिग्धता असते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जेव्हा आवाज उठवला जातो तेव्हा न उजवे नेते येतात न डावे नेते समोर येतात. शेतकऱ्याच्या अवस्थेला जबाबदार शेतकरीच समजला जातो अशी ‘अवस्था’ शेतकऱ्यांची करून ठेवली आहे. कृषीसंस्कृतीचे अस्सल स्वरूप माहीत नसलेल्या सध्याच्या शेतकऱ्यांच्या पिढ्या ऊसाचे दर आणि कापसाचे दर याच्यापलीकडे काही मुद्दे घेऊन सुधारणेची भाषा करतील याविषयी अतिशय कमी आशा राहिली आहे. त्यातून बैलगाडी शर्यत सारखे प्रकार राबवायला लागणारा स्वाभिमान, जिगर आणि अस्सलपणा असणारी यात्रा आयोजक मंडळी सुद्धा डीजे वगेरे ‘अलभ्य लाभ’ मध्ये झाकोळून गेलीयत. जितक्या गंभीरपणे शेती घेतली जाते तितक्याच गंभीरपणे शेतीतल्या सर्व परंपरा घेतल्या पाहिजेत आणि त्या जतन केल्या पाहिजेत.

बैलगाडी शर्यतीमधल्या घृणास्पद प्रकारांचा निषेध करतानाच कृषीसंस्कृतीचा पुरस्कार करण्यासाठी बैलगाडी शर्यती जोमाने सुरु होणे, वाढणे, टिकणे आणि सर्वांनी त्यात सहभागी होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ‘बैलगाडी शर्यत’ सारखी आपली सांस्कृतिक ओळख जपणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा शेतकरी ओळखला जातो ते वेगवेगळ्या पारंपारीक सण, उत्सव, मातृदेवतांची , स्थानिक लोकदेवांची जत्रा, खाद्यान्न परंपरा अश्या अनेक गोष्टींमुळे. यात ‘बैलगाडी शर्यत’ तितकीच महत्वाची ओळख आहे आणि अश्या परंपरा जपणे हा फक्त शेतकऱ्याचा प्रश्न नाही तर तो आपल्या ‘राष्ट्रीय’ संस्कृतीच्या संरक्षणाचे मुख्य कर्तव्य आहे.जाहिरात


 

 

तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई: संपादकीय

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
निधन वार्ता: निवृत्त पोलीस श्री. भालचंद्र सदाशिव लोखंडे

कडेगाव : येथील निवृत्त पोलीस श्री. भालचंद्र सदाशिव लोखंडे (वय ७७) यांचे आज लिंगैक्य झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक

Close