​बोलतानाची भीती नक्की येते कुठून?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

निमंत्रित लेख

(सेल्फहूड या सर्वांगीण विकास प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थेतर्फे येत्या ३० जुलैला कडेगाव येथे  ‘वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने लेखकाच्या संमतीने पुनर्प्रकाशित उपयुक्त लेख)

−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−

कोणालाही सरळ प्रश्न विचारला ‘बोलताना आपल्याला भीती वाटते का?’ तर बरीच लोकसंख्या ‘नाही’ असे उत्तर देते. पण, जेव्हा अश्या व्यक्तीला विशिष्ट व्यक्तींसोबत, ग्रुपमध्ये, किंवा सभेमध्ये किंवा वर्गामध्ये बोलायला सांगितले जाते तेव्हा ‘बोलती बंद’ अशी परिस्थिती असते. भारतीय समाजात भित्रेपणा किंवा बुजरेपणा स्वतःहून कबुल करणे किंवा समस्या म्हणून यावर सल्ला घेणे याकडे फार कमी कल आहे. मुळात, ‘भीती वाटते का ?’ या गोष्टीवर ‘नकार देणे’ ही स्वाभाविक मानसिक आणि काही अंशी सामाजिक अशी प्रक्रिया आहे. पण खरी समस्या आहे ती अश्या दडवलेल्या भीतीने झालेले नुकसान.

मोठ्या संख्येमध्ये हुशार मुले किंवा अत्यंत उपयुक्त विचार असणारी मुले वर्गात न बोलता आल्यामुळे कुचंबना होऊन आपला ‘आवाज’ हरवून बसतात. मनातील सुप्त भीतीमुळे बोलता न आल्याने बऱ्याचदा मुला-मुलींमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींवर मत तयार करणे किंवा विचार करणे टाळण्याची प्रवृत्ती वाढीस लागते आणि याची परिणीती नंतर ‘मुलाखतीमधले अपयश’ किंवा ‘टिम मध्ये काम न करता येणे’ यामध्ये होते. इतर पातळीवरील बोलतानाच्या भीतीचे प्रारूप काहीसे मनोरंजक वाटू शकते. ‘आमचे हे कुठे तोंड वर करून विचारतात तेव्हा?’ किंवा ‘घुम्या’ या गोड नावाने मितभाषी नवऱ्याला बोलावणाऱ्या स्त्रिया, अगदी याचपद्धतीने ‘दगडासारखा काय उभा राहतोस काहीतरी बोल की’ असे वर्गात ऐकवणारे शिक्षक, किंवा ‘प्यार का इजहार’ आणि ‘हाल-ए-दिल’ बेधडक बोलून करण्यासाठी तरुण मुलामुलींची बोलायला ‘शब्द’ मिळवण्यासाठीची धडपड हे नेहमीच दिसते. वक्तृत्व स्पर्धेत आपल्या पाल्याने बोलावे व पारितोषिक मिळवावे, अशी इच्छा असणारे अनेक युवानेते सुद्धा तयार झाले आहेत पण त्याविषयीचे साहित्य तयार व्हायला अजून उशीर आहे असे दिसते. दडवलेल्या भीतीची सगळ्यात वाईट परिणीती कोणती असेल तर ते म्हणजे ‘भाषण स्वातंत्र्य मिळालेलं असतानाही गप्प राहणारे, आणि मुकाट्यानं सर्व सहन करणारे नागरीक’. असो.


बोलताना वाटणारी भीती नक्की कुठून आणि कधी येते याविषयी मत मतांतरे असू शकतात. आधुनिक मानसशास्त्र सांगते की बोलतानाचीच नव्हे तर सर्व प्रकारच्या भीती ह्या ‘शिकलेल्या’ असतात. होय, आपल्या विशिष्ट सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर वाढताना व वागताना आपण अश्या प्रकारच्या भीती आत्मसात करतो आणि त्या पद्धतीने ‘जगत आहे’ असे  दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करतो. मग, आता प्रश्न उद्भवतो की आपले कुटुंब किंवा आपले सामाजिक वातावरण ‘भीती’ सारखे नकारात्मक प्रकार का शिकवते?

अगदी खोलात जाऊन पहिले तर कोणीतीही भीती ही ‘जीवनावश्यक कौशल्य’ या गटात मोडते. अनेक प्राणी-पक्षी किंबहुना पूर्ण सजीव सृष्टीमध्ये आपल्याला लपून राहणारे, विशिष्ट वेळी धोका नसताना बाहेर येणारे, असे भीतीयुक्त राहणीमान असणारे जीव आढळतात. भीती हे जगण्या-वाचण्यासाठीचे अत्यंत आवश्यक नैसर्गिक कौशल्य आहे याची अशी बरीच उदाहरणे देता येतील. आपल्या मनात नक्कीच असा प्रश्न आला असेल की या सर्व गोष्टींचा बोलताना वाटणाऱ्या भीतीशी काय सबंध? आणखी थोडे खोलात जाऊन विचार करूया.

प्रत्येकाला किमान एवढे माहीत असेल की संस्कारक्षम बालवयात किंवा पालकत्वाच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याचवेळा ‘शिवी न देणे’ ‘विशिष्ट व्यक्तींचा/जातींचा आदर करणे’ असे बोलण्याशी सबंधित संस्कार केले जातात. कुठे काय बोलायचे याची काहीतरी मोठी यादी आहे आणि ती समजून घेणे आणि पाळणे हे प्रत्येक व्यक्तीचे आद्य ‘कर्तव्य’ आहे, अश्या पद्धतीची शिकवण घराघरामधून दिली जाते. यामधील पारंपारीक मूल्यात्मक भाग सोडला तर बऱ्याच प्रकारच्या अनावश्यक गोष्टी वाढत्या वयातील मुला-मुलींच्या डोक्यात घुसवल्या जातात. या सर्व प्रक्रियेतून गोंधळ तयार होतो, आणि याचा परीणाम म्हणजे भीतीचा ‘नैसर्गिक सुरक्षा पद्धती म्हणून केला जाणारा वापर’ समजून येण्याच्या क्षमतेचा दूषित किंवा अपुरा विकास. आपल्याला कुठे आणि का घाबरायचं आहे याविषयीच्या ज्ञानाचा आणि क्षमतांचा अभाव. यामुळेच सरसकट “आपण कशाला बोला?” किंवा “ बोलणारे बोलतील आपण कशाला ह्या फंदात पडा?” अशी प्रवृत्ती तयार होणे. भीतीचे मानसशास्त्र समजून घेतले की बोलातानाच्या भीतीचे मानसशास्त्र हळू हळू उलगडत जाते. अर्थात, प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण केले किंवा किमान स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले तर कोणत्या भीती कुठे शिकल्या गेल्या याचं पूर्ण चित्र समोर उभे राहते.

बालवयातील अश्या भीतीच्या अर्धवट आणि अपरीपक्व संस्कारास कायमचे दूर करणे, हे आजकालच्या स्पर्धेच्या जगात खूपच आवश्यक झाले आहे. ज्या वर्गात आपण ‘बोलणाराचे दगड विकले जातात पण न बोलणाराचे गहू विकले जात नाहीत’ हे ऐकतो त्याच वर्गात आपण आपल्या बोलण्याविषयीच्या भीतीसुद्धा तयार करत असतो हे विशेष. ‘भीती’ ही या प्रकारे अत्यंत किचकट स्वरुपात समोर दिसते. पण, यावर उपाय काय करावा किंवा सल्ला घेण्यास कुठे जावे याविषयी कुटुंबांमध्ये किंवा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर माहितीचा आणि कृतीचा अभाव आढळतो. अर्धवट वाचलेल्या किंवा समाजातून, नातेवाईकांकडून किंवा शिक्षकांकडून किंवा अन्य तथाकथित प्रभावी सामाजिक घटकांकडून घेतलेल्या सल्ल्याने बोलातानाच्या भीतीवर मात करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले जातात. काही वेळेला अश्या पद्धतीने समस्या कमी होते परंतु प्रत्येकवेळा ही पद्धती लागू पडते असे नाही. याची कारणे अगदी सोपी आहेत. प्रत्येक व्यक्तीची कुटुंबामधून किंवा समाजातून भीती शिकण्याची प्रक्रिया ‘वेगवेगळी’ आणि  ‘एकमेव’ असते त्यामुळे ‘बोलतानाच्या भीतीवर मात करणे’ ही खूपच व्यक्तिगत आणि खाजगी प्रक्रिया असते. अर्थात, या प्रक्रीयेचे परीणाम कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर लगेच कळतात. पण, खरी बदलाची प्रक्रिया ही मनाच्या खोल कोपऱ्यात त्या-त्या व्यक्तीने सुरु केलेली असते. तज्ञ मार्गदर्शकांच्या सहाय्याने ही प्रक्रीया अत्यंत सुलभ, सहज पद्धतीने आणि काहीशी वेगात घडवता येते.

आपल्या व्यक्तिमत्व विकासाला  ‘सेल्फहूड‘ च्या शुभेच्छा…!!!

© Dr. Govind Dhaske, 2017

No material from this article should be used without the permission of the author.

advt

​बोलतानाची भीती नक्की येते कुठून?

by डॉ. गोविंद धस्के वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
हर्षल वाघिरे यांच्या ‘शिवकृष्णाई’ संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन संपन्न

कडेगाव : तरुण समाजसेवक व धडाडीचे कार्यकर्ते हर्षल वाघिरे यांच्या ‘शिवकृष्णाई बहुदेशीय सेवाभावी संस्थे’च्या कार्यालयाचे औपचारिक उदघाटन आज कडेगाव येथील

Close