तरुणाईची ‘गर्दी’ थेरपी (संपादकीय)0 मिनिटे
‘आपल्या पोरांना’ घेऊन ‘युथ पावर’ दाखवल्याशिवाय राजकारणात ‘खुट्टा’ मजबूत होत नाय – हे त्रिकालाबाधित सत्य आधुनिक राजकारणाचा मुख्य मंत्र झाले आहे. त्यामुळे संख्यात्मक ‘तरुणाई’ची डिमांड सध्या जास्त आहे. मोर्चा, लग्न, स्थानिक ग्रुप मधील वाद, जिममधला राडा प्रत्येक ठिकाणी आपल्या बाजूला किती ‘पोरं’ आहेत यावरून शक्ती जोखली जाते. अर्थात, ही पावर फक्त आणि फक्त संख्येची असते. यामध्ये किती पोरं ‘दिलानं’ आलेली असतात हा संशोधनाचा विषय आहे. अर्थात हे झाल मुख्यत्वे ग्रामीण व शहरीकरण होत असलेल्या भागातील चित्र. ‘तरुणाईची गर्दी’ आणि तिचे राजकारणातील मूल्य हे आता उघड आहे. राजकारणी व इतर तथाकथित सांस्कृतिक संघटनावाले वेगवेगळ्या प्रकारची ‘तरुणाईची गर्दी’ अगदी यशस्वीपणे जमा करू शकतात, पण ही शिक्षण-करीयर यामध्ये बिझी असलेली तरुण मंडळी सगळं सोडून या ‘तरुणाई’च्या गर्दी मध्ये का सामील होतात आणि काय साध्य करतात?
जवळ जवळ सर्व घरामध्ये ‘कशाला ‘त्यांच्या’ मागे काम-धंदा सोडून बोंबलत फिरतो रे ?’ अश्या प्रकारचे वरच्या आवाजातले संवाद सर्वानीच ऐकलेले असतात. पण कोणीही तरुणाईच्या गर्दीचा भाग होण्याच्या नशेचा खोलात जाऊन तपास करत नाही. अनेक प्रकारचे मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय सिद्धांत या ‘तरुणाईची गर्दी’ प्रकारावर अत्यंत वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकतात. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या काळात मानवी संवाद कमी झाला आहे. त्यामुळे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, परिचित अश्या सर्वांना व्हाटसप वगेरे सारख्या माध्यमातून भेटणे यामध्ये ‘भावनिक ओलावा’ वगेरे तर सापडणे अवघड असतेच. फक्त शब्द वापरून तंत्रज्ञानाद्वारे साधला जाणारा संवाद ज्यामध्ये भावना, बोलण्यातील चढ-उतार, बोलणाराची देहबोली इत्यादी ‘मानवी’ गोष्टी गायब असतात. यामुळे हा यांत्रिक संवाद हळूहळू एक विशिष्ट प्रकारचे ‘सामाजिक आणि सांस्कृतिक अंतर’ तयार करतो. सध्याची तरुणाई या ‘अंतरामुळे’ खूप दूर गेली आहे. त्यातून वयोपरत्वे तरुणाईच जग कसे असावे आणि ते कुणी चालवावे याविषयीचे विचार अत्यंत विशेष असतात त्यामुळे स्वतःमध्ये विशिष्ट गोष्टींचा तिरस्कार असणे आणि त्यामुळे सतत ‘असंतोष’ असणे हे त्यासोबत आलेच. यातून तयार झालेलं तरुणाईच रसायन एकदम ‘स्फोटक’ असते. मग नक्की कश्याप्रकारे हे रसायन आपल्या बाजूला घेऊन राजकारणी किंवा इतरेजन त्याचा वापर करतात ?
बर्मन नावाचा सामाजिक शास्त्रज्ञ सांगतो की अलीकडच्या ‘सिविल सोसायटी’ सारख्या प्रकारांमध्ये सामील झाले की शहरीकरणाने व तत्सम विचाराच्या दिशेने वागण्याने निर्माण झालेली ‘सांस्कृतिक’ अंतराची भावना कमी होते. पन्नास भागातून कंपन्यांमध्ये पगारी नोकऱ्या किंवा मजुरी करायला आलेल्या लोकांच्यात मूळ सांस्कृतिक ओळखी हरवून फक्त कामगार चेहऱ्याने काम करणारे लोक ह्या सांस्कृतिक अंतरामुळे विशिष्ट एकटेपणा जाणवणारे असतात. शहरी वातावरणासाठी वेडी झालेली अर्ध-ग्रामीण मंडळी सुद्धा शहरी मध्यमवर्गीय मुल्ये आणि भाषा आत्मसात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात. मोठ्या कॅनवास वर हेच चित्र तपासले तर तरुणाईच्या गर्दीवादी विचारामागचे मानसशास्त्र काही अंशी उलगडते. सांस्कृतिक अंतराने एकटेपणाची भावना तयार झालेला व तरुण वयातील विशिष्ट मनो-कायिक बदलांच्या प्रभावात मनामध्ये बदलासाठीचा ‘असंतोष’ बाळगणारा तरुण त्याला आवडणारी ‘गर्दी’ किंवा ‘समूह’ शोधत असतो. अश्यावेळी तरुणाईची गर्दीची आवश्यकता एकप्रकारच्या ‘समूह थेरपीची’ असते, असे म्हणायला वाव आहे. अश्याप्रकारे तरुणाईची ‘गर्दी’ थेरपीची काहीशी स्वाभाविक अवस्था समजून त्याच्या आपल्या राजकीय किंवा तथाकथित सांस्कृतिक कामांमध्ये वापर करून घेणे फार ‘कौशल्यपूर्ण’ काम राहत नसते.