गुन्हेगारीची धोकादायक ‘पार्टनरशिप’0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

काही दिवसांपासून कडेगाव-पलूस परीसरात होणार्‍या गुन्ह्यांकडे अगदी ओझरता कटाक्ष टाकला तर अगदी सामान्य नागरीकाच्याही लक्षात येईल की इथे घडणाऱ्या गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. अगदी अलीकडचं प्रकरण म्हणजे कडेगाव मधील पिस्तुलचा वापर करून केलेली पेट्रोल पंपावरील चोरी. आणि त्यानंतर जवळच्या कराड तालुक्यातील असाच प्रयत्न. हुशार पोलीस यंत्रणेच्या मदतीने या टोळीला जेरबंद करण्यात यश आले असले तरी या निमित्ताने अनेक प्रश्न ऐरणीवर आलेत आणि त्याचा वेळीच विचार करणे आवश्यक आहे.

या चोरीत सापडलेल्यामध्ये सामील असणारे गुन्हेगार ग्रामीण भागातील असून टोळीमध्ये परप्रांतीय व्यक्तींचा समावेश आहे. हे विशेषपणे अधोरेखित करण्याचे कारण कोणीतीही द्वेष भावना प्रकट करणे किंवा परप्रांतीय मजुरांच्या विषयी सर्वसामान्य झालेल्या गृहीतकांना पुनःपुन्हा मांडणे हा नसून गुन्ह्यांच्या रूपावरून समोर येणाऱ्या तथ्यांचे विश्लेषण करणे हा आहे. अजून चोरीचा तपास सुरु असल्याने त्याविषयी जास्त मीमांसा करता येत नाही परंतु भागातील ग्रामीण युवक आणि इतर प्रांतातून आलेले युवक यांचे गुन्हे करण्याचे धाडस आणि त्यासाठी तयार झालेली ‘पार्टनरशिप’ भविष्याच्या दृष्टीने निश्चितच धोकादायक आहे.

कडेगाव असो किंवा पलूस असो, ही पारंपरीक शेतकी आधारित बाजारपेठ असणारी गावे अत्यंत वेगात शहरीकरणाकडे वळत आहेत. आजूबाजूला वाढणारे उद्योग, परीसरातील ग्रामीण भागातून या तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होणारी वाढती कुटुंबे, रियल इस्टेटच्या नावाखाली वाढलेले भाड्याचे, जागांचे व सेवांचे अवास्तव भाव, मजुरीच्या आणि धंद्याच्या आशेने महाराष्ट्राच्या व भारताच्या इतर प्रांतातून येणारी कामगार, व्यापारी व उद्योजक मंडळी, आणि या सर्व प्रकारामुळे नागरी प्रशासन व्यवस्थेवर पडणारा ताण हा दुर्लक्ष करता येण्यासारखा निश्चित नाही.

शहरीकरणाच्या प्रभावामुळे अनेक गोष्टी टाळणे अवघड असते कारण आजपर्यंत विकासाचे मॉडेल आणि राहणीमानाचा दर्जा उंचावणारी म्हणून समोर आणली गेलेली शहरे वास्तवामध्ये कचऱ्याचे भांडार, प्रदूषण, वाहतुकीची कोंडी आजूबाजूच्या निसर्गाचे नुकसान अश्या अनेक समस्यांनी त्रस्त आहेत तरीही ‘आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय’ या न्यायाने तेच धोरण राबवणे सुरु आहे. शहरीकरणाचे स्वरूप आणि ते ठरवण्यामध्ये स्थानिक जनतेचा संपूर्ण सहभाग या गोष्टीएवजी कोणत्याही मार्गाने मिळणाऱ्या नफ्याच्या मागे धावणारे लोक आणि त्यांची उद्योजकता जेव्हा या प्रक्रियेचे नेतृत्व करतात तेव्हा अनावश्यक किचकट समस्या तयार होतात. दिवंगत राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांनी समोर आणलेलं शहरी सुविधा ग्रामीण भागात पुरवणे (PURA-Providing Urban Amenities to Rural Areas) मॉडेलसुद्धा अक्षरश: मोडीत काढण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

भारतातल्या शहरीकरणाच्या अपयशाला  विशिष्ट आर्थिक गटांनी भारतातल्या शहरीकरणावर सुरु ठेवलेली दादागिरी हेच मुख्य कारण आहे. आर्थिक मशीन असल्याचे चित्र रंगवण्यात आलेली शहरे स्वप्नांची साईझ इतकी मोठी करतात की वास्तवापासून दूर राहणाऱ्या तरुणाईला पटकन पैशाचे मार्ग शोधणे हाच ‘रामबाण’ उपाय वाटू लागतो. मग यातून वेगवेगळ्या प्रकारचे धंदे उभे राहतात. अर्थात, हे काहीसं भांडवल उपलब्ध असेल तर अन्यथा ‘कमिशन’ एजंट बनणे हा ‘ज्ञानाधारीत’ धंदा मुख्यत्वे केला जातो. यातील काही तरुण मंडळी काहीच मार्ग सापडला नाही तर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तिकडे वळू शकतात. अजून शुगर लॉबी मध्ये ‘क्रिमिनॉलॉजी’ वरच संशोधन फासेपारधी समूह सोडले तर कुणावरच केलेलं दिसत नाही त्यामुळे इथे याबाबतच्या माहितीचा अभाव आहेच. शहरीकरणासोबत वाढणारी गुन्हेगारीचे वेगळे रुप आपल्याला भारतातल्या छोट्या शहरांमध्ये आणि वेगाने ‘शहर’  होऊ पाहणाऱ्या कडेगाव, पलूस, कराड, तासगाव सारख्या ग्रामीण भागांमध्ये दिसते.

गावांची आणि तिथल्या जनतेची सुरक्षा धोक्यात आणणारी कोणतीही विकास प्रक्रिया ही खऱ्या अर्थाने विकास प्रक्रिया म्हणून घ्यावी का याविषयी जनतेने गंभीर विचार करणे आवश्यक आहे. यामध्ये पश्चिमेतून पूर्वेत आणि महानगरातून गावात घुसणाऱ्या सर्व ‘विकास कल्पना’ डोळे झाकून स्वीकारणाऱ्या आणि राबवणाऱ्या  तरुण तडफदार युवा नेत्यांचे ‘डोळस’ कार्य महत्वाचे ठरणार आहे.जाहिरात


 

 

गुन्हेगारीची धोकादायक ‘पार्टनरशिप’

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
समाजकारणाचं राजकारण नक्की काय साधणार आहे ?(संपादकीय)

सोनहिरा खोऱ्यामध्ये लोककेंद्री सामाजिक न्यायाची परंपरा आहे. एकमेकांच्या चांगल्या-वाईट, साधक-बाधक कामांवर सामाजिक पातळीवर मुक्त चर्चा घडणाऱ्या भारतातल्या मोजक्या भागांमध्ये कडेगाव-पलूस

Close