तिरक्या बाटलीचं ‘आव्हान’…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगावचे दारूबंदी आंदोलन सध्या एका नव्या ‘आव्हाना’चा सामना करत आहे. जे आव्हान अनेक लोकचळवळींचे नुकसान करत आले आहे, अगदी तेच आव्हान कडेगावच्या दारूबंदी आंदोलनामध्येसुद्धा घुसले आहे. ‘ते’ आव्हान अगदी उघड आहे. सर्वाना समजण्यासारखे आहे पण ‘त्या’वर कोणीही बोलत नाही. कोणताही राजकीय नेता, उद्योजक, आणि काही पुरुष नागरीक त्याविषयी बोलत नाहीत.

दारूच्या बऱ्याच वाईट सामाजिक आणि कौटुंबिक परीणामांची जाण असणाऱ्या काही महिला आपापल्या पातळीवर खाजगीमध्ये त्या आव्हानाविषयी बोलतात.

कदाचित काही सुजाण पुरुष नागरीकसुद्धा त्याविषयी बोलत असतील, पण त्याची शक्यता खूपच कमी जाणवते, कारण ते इतरांना ऐकू जाऊ नये, असे बोलतात.

तरुण मुलीमधल्या अगदी मोजक्या धाडसी मुली त्यांच्या विशिष्ट भाषेत गप्पांच्या ओघात हे ‘आव्हान’ बोलून जातात, पण सगळ्या मुली ते तितकंस गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे ‘ते’ आव्हान समोर येवूनही पुन्हा हरवून जातं.

कडेगावची तरुण पोरं ‘त्या’ आव्हानाला चांगलेच समजतात. शेवटी घाटावरची पोरं आणि सोनहिरा खोऱ्याच पाणी ‘असली’ आव्हानं समजायची उपजत बुद्धी देतं, त्यामुळे ‘हे’ आव्हान बऱ्यापैकी तरुण मंडळी जाणून आहेत, पण अजूनही कुणीच त्या विषयी बोलत नाहीत. नक्की अस काय आहे ‘त्या’ आव्हानामध्ये ज्यामुळं ‘ते’ माहीत असूनही बोललं जात नाही?

‘ते’ आव्हान तसं खूप जुनं आहे. अगदी दारूच्या शोधाच्या आधीचं असण्याचीच जास्त शक्यता आहे. अर्थात, ‘हे’ आव्हान खऱ्या अर्थाने मोठेच ‘आव्हान’ आहे पण ‘ते’ आव्हान अजूनही बऱ्याचदा ‘आव्हान नाहीच’ अश्या अर्थाने बोलून चर्चेमधून घालवून टाकले जाते. काही ठिकाणी ‘ते’ आव्हान शिष्टाचार म्हणूनही टाळले जाते तर काही ठिकाणी ‘ते’ माहीत असूनही ‘आपण कशाला तसल्या फंदात पडा?’ असे बोलून हलकेच बोलायचे टाळले जाते. ‘नक्की काय आहे ते आव्हान?’ अशी उत्सुकता निश्चितच वाढली असेल, पण, यामध्ये सुद्धा आणखी एक ‘आव्हानाचं आव्हान’ आहेच.

बाकी सगळ्यांच्या प्रमाणे ‘मिडिया’ ने तरी ‘ते’ आव्हान प्रकट करावे की नाही, याविषयी खूपच संभ्रम आहे. ‘ते’ आव्हान खूपच ‘पावरफुल्ल’ असल्याने एकूणच ‘ते आव्हान’ प्रकट करून नसत्या फंदात ‘एकट्या मिडीयाने का पडावे?’ असे नवीन आव्हान समोर येत आहे. नको तसले नाद मिडियाला कशाला हवेत, मिडिया ने आपली पायरी ओळखून राहावे, हो की नै, मालक?

म्हणजे, ‘त्या’ जुन्या आव्हानाचं ‘हे’ नवीन आव्हान आहे म्हणा अन विषय गोल करा ! तसं अगदी उघड बोलायचं झाल तर त्या ‘आव्हानाची’ मुख्य जबाबदारी नागरीकांची आहे. नागरीकांनी त्यांची कर्तव्ये केली नाहीत आणि घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर केला नाही तर मिडियाने कशाला स्वतःचा धंदा बुडवावा आणि रिस्क घ्यावी ? म्हणजे ही असली आव्हानं मिडियाने घ्यायची आणि स्वतःला नको त्या लफड्यात ओढून घ्यायचं आणि ऐकून न ऐकल्यासारखे वागणारे, बोलून न बोलल्यासारखे वागणारे, डोळ्यासमोर दिसत असून कबूल न करणाऱ्या पब्लिकचा दबाव घ्याचा? लॉजिक लागत नाही. आपल्या ‘कडेगाव-पलूस’च्या भाषेत बोलायचं झाल तर ‘आपणच आपल्या पायावर कशाला धोंडा पाडून घ्या?’

आपण सुजाण माय-बाप जनता जनार्दन किमान एवढे निश्चित समजला असाल की अगदी सारासार विचार केला तर ते ‘आव्हान’ इतके ताकतवर आहे की ‘त्याच्या’समोर बाकीची आव्हाने अगदी किरकोळ वाटतात. आता ‘हे’ आव्हान आहे तोपर्यंत दारूबंदी होणे खुंपच अवघड असते. ज्यांना ‘ते आव्हान’ माहीत आहे त्यांना ‘हे’ सत्य पूर्ण माहीत आहे. पण ‘त्या’ आव्हानाविषयीचे ‘ते’ सत्य माहीत आहे हेही बोलायचे नसते इतका ‘त्या’ आव्हानाचा दबाव असतो.

तात्पर्य हेच की जोपर्यंत ‘ते’ आव्हान निघून जात नाही तोपर्यंत दारूबंदी अवघड आहे.

आता आपण हे आव्हान वगैरे सोडून आपण मुख्य फोकस पुन्हा दारूबंदी आंदोलनाकडे वळवला तर एक चित्र स्पष्ट दिसेल की बाटली आडवी झाली नाहीये तर ‘तिरकी’ झाली आहे. वरच्यांनी खालनं वजन लावलं तर तिरकी बाटली पुन्हा सरळ हुणार, आणि खालच्यानी अजून थोडा वरनं जोर लावला की बाटली आडवी हुनार, अगदी ‘धोबीपछाड’च म्हणा की !

या लढ्याला यश येवो, हीच श्री गोविंदगिरी आणि श्री भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना !

अजूनही हा तिरक्या बाटलीचा चमत्कार कसा घडला, असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडला असेल.

तर ही सगळी ‘त्या’ आव्हानाचीच करणी हो!  तुम्ही-आम्ही जास्त काय बोला ?जाहिरात


17 thoughts on “तिरक्या बाटलीचं ‘आव्हान’…!!!

Comments are closed.

तिरक्या बाटलीचं ‘आव्हान’…!!!

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
17
Read previous post:
‘टपोऱ्या’ पावसानं सांगलीला झोडपलं !

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी) : पावसानं दडी मारल्यानं सामान्य नागरीकांची आणि विशेषतः शेतकऱ्यांची 'दांडी' गुल होण्याची वेळ आलीय. सारेच चिंतेत असताना

Close