आली का गौराई?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

गौराई उत्सव हा महिलांच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि स्वाभिमानाचा केंद्रबिंदु आहे. भारतासारख्या मुळच्या मातृसत्ताक आणि त्यानंतर भगिनी-भाऊ नाते संस्कृतीमध्ये परावर्तीत झालेल्या अत्यंत जुन्या परंपरेमध्ये गौरी उत्सवाचे सांस्कृतिक आणि पर्यायाने भावनिक महत्त्व जास्त आहे. मराठी मुलुखातल्या कोणत्याही स्त्रीला विचारले तर ‘गौराई’ विषयी एक मोठे आठवणींचे आणि भावनिकतेचे भांडार समोर येते. ‘गौराई’ ही स्त्रियांच्या अनेक रूपांचा एकात्म भाव असणारी समजली जाते. मृदू आणि वात्सल्य भाव असणारी गौराई प्रसंगी कठोर होऊन निःपात करण्यास मागे-पुढे पहात नाही. कडेगावात हाच स्त्री शक्तीचा निर्भीडपणा सध्या अनुभवायला मिळत आहे.

कडेगावच्या दारूबंदीच्या निमित्ताने सध्या चर्चा, वादविवाद सुरु आहेत. अगदी सक्षमपणे दारूबंदीचा निर्धार मूर्त रुपात आणण्यासाठी कडेगाव आणि परीसरातल्या रणरागीनींनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. गौरी उत्सवाच्या मध्यावर उत्पादन शुल्क खात्याने नियोजित केलेली सह्यांची फेरपडताळणी पुढे ढकलणे अत्यंत आवश्यक होते आणि त्यामध्ये सुद्धा कडेगाव परीसरातील स्त्री-शक्ती यशस्वी ठरली आहे. एकूणच, दारूबंदीच्या लढाईमध्ये जितक्या जास्त समस्या निर्माण होत आहेत किंवा केल्या जाताहेत तितक्याच प्रकर्षाने आणि सर्व शक्तीनिशी त्या सोडवल्या जाताहेत. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत सकारात्मक लक्षण मानता येईल. पुरुषप्रधान राजकारणाची घाणेरडी परंपरा असणाऱ्या भारताच्या सर्व भागांमध्ये बऱ्याचवेळा स्त्रियांचे समर्थन गृहीत धरले जाते किंवा स्त्रियांवर विशिष्ट पद्धतीने दबाव आणून पुरुषी राजकारणासाठी त्यांची सहमती घेतली जाते. प्रसंगी स्त्रियांना अंधारात ठेवून किंवा चुकीची माहिती देवून आपलेच घोडे पुढे दामाटनारे बहाद्दर राजकारणी महाराष्ट्रात कमी नाहीत. याचा अर्थ असा अजिबात नसतो की स्त्रिया मनातून समर्थन देताहेत किंवा दबाव टाकून स्त्रियांचा होकार मिळवले की काम झाले. स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर आणि स्त्री-गण म्हणून स्त्रियांच्या पातळीवर सर्व घडामोडींची चर्चा होते आणि त्याविषयीची अगदी प्रमाणिक मतेसुद्धा बनतात. याचे प्रतिबिंब आता मतदानात दिसायला लागले आहे. कुटुंबप्रमुखाच्या सांगण्याप्रमाणे जर घरातील स्त्रिया ‘त्या-त्या’ चिन्हा समोरील बटण दाबत असतील, अश्या भ्रमात कोणी असेल तर त्यांनी अलीकडच्या काही निवडणुकांवर आलेले शास्त्रीय विश्लेषण तपासावे. त्यामुळेच ‘पुरुषी राजकारण’ आणि ‘सरपंच पती’ मुळे नकारात्मकपने नावाजला जाणारा महाराष्ट्र हळू-हळू शक्तीच्या संतुलनाकडे जात आहे, असे म्हणायला वाव आहे.

दारूबंदीच्या लढाईच्या निमित्ताने हे चिंतन करण्याची आवश्यकता अशासाठी आहे की अजूनही दारूबंदीची लढाई पूर्णत्वास जाण्यास उशीर आहे आणि त्यामध्ये आणखी आव्हाने असणार किंवा निर्माण केली जाणार यात शंका नाही. यासाठीच महिलांनी आपली शक्ती व चित्त लक्ष्यावर ठेवणे आवश्यक असते. स्त्रियांच्या प्रश्नांना एकदम उंचावर नेवून ढकलून देण्याच्या चाली राजकारणात काही नवीन नाहीत. ज्या मातांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत सुजाण, सुशिक्षित नेते घडवले, ज्यांनी छत्रपतींच्या गनिमी काव्यामध्ये हिरीरीने सहभाग घेतला त्या परंपरेतल्या अस्सल घाटी स्त्रीशक्तीला हे असल्या चाली समजणार नाहीत, अश्या भ्रमात कुणी राहू नये. गौराईच्या सणाच्या निमित्ताने गणपती मंडळाच्या स्टेजवर बसलेल्या मंडळीनी आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे कारण ‘गौराई आली आहे’.जाहिरात


 

15 thoughts on “आली का गौराई?

Comments are closed.

आली का गौराई?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
15
Read previous post:
स्पंदन हॉस्पिटलमध्ये २८ ला मधुमेह, ईसीजी, दमा तपासणी मोफत शिबीर

कडेगाव : आपल्या कोणत्याही आजारासाठी एक्सपर्ट डॉक्टरांमार्फत अत्याधुनिक उपचारासाठी आता कराड किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही, कारण कडेगाव इथं स्पंदन

Close