इंग्लीश स्पिकिंग शिकताना नेमकं काय चुकतं?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

निमंत्रित लेख

प्रत्येकालाच इंग्लीश बोलायला शिकायचे आहे, आणि ते अगदी स्वाभाविक आहे. यामध्ये मराठीला कमी लेखणे किंवा मातृभाषेशी प्रतारणा करण्याचा दृष्टीकोन नसतो तर जागतिकीकरणामुळे तयार झालेल्या संवादाच्या आणि व्यवहाराच्या संधींचा ताकदीने उपयोग करून घेणे, जागतिक समूहांशी संवाद साधने, असे उदात्त उद्देश असतात.

व्यक्तीगत पातळीवर स्वतःला हवी ती माहिती इंग्लीश बोलणाऱ्या व्यक्तींकडून मिळवणे, इंग्लीश बोलण्याची आवश्यकता असलेला शैक्षणिक/व्यावसायिक  कोर्स निवडणे, स्वतःच्या धंद्याशी अथवा उद्योगाशी सबंधित कॉन्फरन्स, उद्योजक मेळावे, परदेश वारी इत्यादी घडामोडींमध्ये सामील होणे, इंग्लीश बोलून स्वतःचे व्यक्तीमत्व पावरफुल बनवणे, गृहिणींनी संपूर्ण पाकशास्त्र इंग्लीश मध्ये सांगणे हे व असे अनेक उद्देश असतात.

या सर्व प्रक्रीयेमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने इंग्लीश बोलायला शिकण्याचा स्वतःहून प्रयत्न करत असतो. इंग्रजी बातम्या बघणे, पेपर वाचणे, कस्टमर केअरला सतत फोन लावून इंग्लीश मध्ये बोलणे, श्वासागणिक गुड मॉर्निंग, थ्यांक यु, सॉरी वगेरे-वगेरे  बोलणे, बाजारात येणारा प्रत्येक इंग्लीश स्पिकिंग क्लास लावून पाहणे, जादुई इंग्लीश स्पिकिंगची महागडी पुस्तके खरेदी करून टेबल सजवणे- एक ना दोन- अश्या हजारो कृती इंग्लीश बोलणे शिकण्यासाठी केल्या जातात. पण याचा नक्की कितपत फायदा होतो?

या सर्व कृतींचा सर्वाना फायदा होतोच किंवा अजिबात होतच नाही असे नाही. किंबहुना, अनेकजण आपला इंग्लीश स्पिकिंग विषयीचा न्यूनगंड वाढवत असतात आणि नकारात्मक विचारांनी मनाला त्रास देण्याची सवय लावून घेतात. या सर्व उलट्या प्रवासाचे कारण अगदी साधे आहे: इंग्लीश बोलण्यासाठीचे वरील प्रयत्न का केले जातात, याविषयी अजिबात माहिती नसणे.

आपली कृती कशासाठी करतोय याची माहिती नसताना आपण केलेली प्रत्येक कृती तितकी यशस्वी ठरेल याची शक्यता नसते किंवा कमी असते. यासाठीच, इंग्लीश स्पिकिंगचे मानसशास्त्र समजून घेणे आणि त्यानंतर वरील प्रयत्न आणि त्यासोबत इतर प्रभावी पद्धतींचा वापर केल्यास निश्चितच इंग्लीश स्पिकिंग शिकण्याचा व रोजच्या व्यवहारात इंग्लीश वापरण्याची क्षमता आणि वेग वाढतो.

सांगितलेल्या चुकीच्या पद्धतींमध्ये आंधळेपणाने वेळ वाया घालवल्याने आणि पाठांतर आणि घोकंपट्टी करायला लावणारे इंग्लीश स्पिकिंग चे क्लासेस लावून चुकीची तंत्रे शिकल्यामुळे बहुतेक लोकांचे इंग्लीश स्पिकिंग करण्याचे प्रयत्न फसले आहेत, हे वास्तव नाकारता येत नाही.

कोणतीही भाषा शिकायची असेल तर त्या संस्कृतीची किमान ओळख असणे आवश्यक असते. पण, बरेचजण इंग्लीश कोण आहेत? त्यांची संस्कृती काय आहे? इत्यादी गोष्टींविषयी जाणून न घेता फक्त कॉर्पोरेट पेहराव, आणि शहरी वातावरणाला पाहून वेडे होतात, भुलून जातात. यातून भाषा बोलायला शिकण्याच्या प्रयत्नांना अडथळा येतो.

एक साधे उदाहरण हे स्पष्ट करेल. पुस्तक घेऊन जर आपण कन्नड शिकण्याचा प्रयत्न केलात तर किमान २० चांगली वाक्ये बोलायला दोन महिने जातात. तेच जर तुम्ही धारवाड-निपाणी किंवा कर्नाटकातल्या कोणत्याही ठिकाणी १० दिवस राहिला तर खूप सारे कन्नड शब्द आणि वाक्ये शिकता. शेजारी कोणी कन्नड कुटुंब राहत असेल तरीसुद्धा काही शब्द बोलायला शिकण्याची शक्यता वाढते. तात्पर्य इतकेच की भाषा आणि संस्कृती एकत्र पहिली, समजून घेतली की इंग्लीश स्पिकिंग शिकण्याचे तंत्र पटकन समजून येते. अर्थात, अश्या पद्धतीने शाळेत किंवा सध्याच्या बहुतेक इंग्लीश संभाषण शिकवणाऱ्या क्लासेस मध्ये शिकवले जात नाही हे दुर्दैव.

इंग्लीश बोलायला शिकताना बहुतेकजण तयार वाक्ये पाठांतर करून बोलणे ही पद्धती वापरतात. इंग्लीश वाक्यांचे उच्चार मराठी मध्ये लिहिणे आणि त्याखाली त्याचे भाषांतर लिहिणे हीच ती पद्धती.  अश्या प्रकारे तयार केलेले कागद सतत जवळ ठेवून राहणारे अनेक लोक आपल्याला आजूबाजूला दिसतील. हा सगळ्यात जास्त हानिकारक आणि इंग्लीश स्पिकिंग शिकण्याचे प्रयत्न धुळीस मिळवणारा प्रकार आहे. तरीही, अश्या दोषपूर्ण पद्धती सर्रास वापरल्या जातात.

अंतिमतः सगळ्यात मोठी चूक होते ती आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण हवे आहे आणि त्या पद्धतीचे प्रशिक्षण कुठे मिळेल, हे ठरवताना. अगदी साध्या उदाहरणाने हे स्पष्ट होईल. अगदी पाचवी पासून इंग्लीश शिकणाऱ्या आणि अलीकडच्या पहिलीपासून इंग्रजी शिकणाऱ्या पिढ्या मुलभूत व्याकरण, काळ व त्यांचा वापर इत्यादी प्रकार दरवर्षी नव्याने शिकत असतात. यातून बऱ्यापैकी इंग्लीश भाषेच्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान आलेले असते. तरीही, बरेच विद्यार्थी आणि तरुण असे इंग्लीश स्पिकिंगचे क्लास निवडतात जिथे त्याच त्या गोष्टींची पुनःपुन्हा घोकंपट्टी केली जाते. हा वेळेचा आणि पैशाचा अपव्यय नाही तर चुकीच्या तंत्रांचे संस्कार मेंदूवर होऊन आपल्या नैसर्गिक भाषा शिकण्याच्या प्रवृतीची मोठी हानी आहे. इंग्लीश संभाषणाच्या समस्या व्यक्ती निहाय, व्यवसाय निहाय अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यावर अत्यंत खोलात जाऊन विचार करणे आणि कृती करणे आवश्यक असते. अश्यावेळी इतर सुविधा उपलब्ध नसल्याने रामबाण उपाय म्हणून इंग्लीश स्पिकिंग शिकवण्याचा दावा करणाऱ्या (मुख्यत्वे २०/४५/६०/९० दिवसात वगेरे) क्लास मध्ये फी भरून भरती होतात आणि स्वतःच्या भाषा शिकण्याच्या प्रक्रीयेची दोरी इतरांच्या हाती देतात.

स्वतःच्या इंग्लीश स्पिकिंगच्या समस्या अचूक शोधणे आणि त्यावर अचूक उपाय करणे, प्रसंगी तज्ञांची वेळीच मदत घेणे, आणि स्वतःचे इंग्लीश शिकण्याचे गोल ठरवणे व त्यासाठी वेळापत्रक ठरवून प्रमाणिक प्रयत्न करणे आवश्यक असते. बऱ्याचवेळा वैयक्तीक समुपदेशन घेणे आणि समस्येवर खोलात जाऊन उपाय शोधणे आवश्यक आहे. इंग्लीश बोलण्याचे मुलभूत मानसशास्त्र आणि तंत्र एकदा समजून घेतले आणि आपली भाषा शिकण्याची पद्धत सोपी आणि सहज ठेवली की मग इंग्लीश बोलणे अगदी सहज साध्य गोष्ट आहे.

वेळेत योग्य तो रस्ता पकडला की मग आपली गाडी इच्छीत स्थळी पोचते, हे सांगायला कोणी तज्ञाची गरज नसते. आपल्यातल्या भरकटलेल्या जहाजांना हे निश्चितच समजले असेल. अजूनही समजले नसेल तर आपले जहाज अजूनही भरकटलेल्या स्थितीत आहे, असे समजण्यास हरकत नाही.

 

© डॉ. गोविंद धस्के , संचालक, सेल्फहूड

 

इंग्लीश स्पिकिंग शिकताना नेमकं काय चुकतं?

by डॉ. गोविंद धस्के वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शाळगाव येथे ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

शाळगाव : येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक स्नेहमिलन व अनुभव कथन कार्यक्रमाचे आयोजन आज पार पडले.

Close