तमाम भिकारी बंधू-भगिनींना दिवाळीच्या ‘विशेष’ शुभेच्छा…!!! (विशेष संपादकीय)0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

वेळप्रसंगी लेपंचेपं का हुईना पण मध्यमवर्गीय शहरी जनतेला सतत केंद्रस्थानी ठेवून दिवाळी, गुंतवणूक, विमा, झालंच तर एक किंवा दोन बीएचके अशी खुराडी छाप लेबर घरे, छोट्या-मोठ्या गाड्या आणि बाकीचे तथाकथित ‘लाईफस्टाईल’ तथाकथित ‘उंचीवर’ नेवून ठेवणारे इतर अर्थशास्त्रीय प्रयोग यावर खूप सारं लिहून झालेलं आहे. म्हणजे तशी पद्धतच आहे. आणि,  असा हा मध्यमवर्गीय चाकरांसाठीचा मिडिया रथ कुठेही न थांबता पुढेच जातच राहणार आहे. तसं नियोजनच आहे विकासाचं. असो. आज दिवाळीच्या निमित्ताने आम्ही भिकाऱ्यांना का शुभेच्छा देत आहोत, याचे काहीसे आश्चर्य हे संपादकीय वाचणाऱ्या सुजाण वाचक-वर्गाच्या मनात निश्चितच आले असेल.

कारण, अगदी साधं आणि सोपं आहे. नाही, आम्ही सहानुभूती म्हणून भिकारी वर्गास दिवाळीच्या शुभेच्छा देत नाही. काहीतरी वेगळेपण दाखवावं आणि वाचकांना भुलवावे, यासाठी तर हा लेखन प्रपंच अजिबात नाही. मध्यमवर्गीय दिवाळीच्या उधळपट्टीतून आलेल्या ‘गिल्ट’ मधूनसुद्धा  या विशेष शुभेच्छा दिल्या जात नाहीयेत.

आमच्या तमाम भिकारी बंधू-भगिनींना दिवाळीच्या ‘विशेष’ शुभेच्छा एका वेगळ्या कारणासाठी दिल्या जात आहेत.

या शुभेच्छा दिल्या जातायत ते त्यांचा मोठेपणासाठी आणि त्यांच्या जीवन मूल्यांसाठी. आता एन दिवाळीत जेव्हा बऱ्यापैकी जनता मेंदू बाजूला ठेवून आनंद घेण्याचा प्रयत्न करत असताना हे नवे कोडं फार त्रासदायक वाटू शकते, त्यामुळे पटकन हा विषय थांबवणे आवश्यक आहे. आमचाही तोच प्रयत्न आहे. थोड पुढे जाऊया.

सतत पैश्याच्या मागे धावणे, आपल्या पगाराच्या आणि काम करण्याच्या लायकीपेक्षा कोसभर दूर असणारी महागडी स्वप्ने तयार करून स्वतःचे शारिरीक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य घालवणाऱ्या ‘घरोघरी मातीच्या चुलीपेक्षा’ या घटकेला आम्हाला आमचे भिकारी बांधव-भगिनी अत्यंत निश्चल, स्थिर, आणि मानसिक व शारीरिक दृष्ट्‍या सजग आणि जीवनाविषयी अत्यंत सकारात्मक वाटत आहेत. याचा बाहेरील राजकीय किंवा आर्थिक किंवा अर्थ-राजकीय परिस्थितीशी कृपया संबंध लावू नये. चुकून लावल्यास ती आपली स्वतःची जबाबदारी असेल. भिकारी वर्गाविषयी फक्त आदर व्यक्त करून आम्ही थांबणार नाही. पुढे, आणखी कौतुक करणार आहे, परंतु , जबाबदारीने.

दिवाळी हा भारतातली गरीब-श्रीमंत दरी आणि त्यामधील वेगवेगळे थर ठळकपणे प्रकट करणारा सण आहे. आणि यात नेहमीच जिंकणारा वर्ग आहे तो आमच्या भिकाऱ्यांचा. तथाकथित सुखवस्तू घरांमधल्या उष्ट्या आणि शिळ्या अन्नाचे आणि व्यवहारात कमीत कमी वापरल्या जाणाऱ्या सगळ्यात छोट्या नाण्यांचे हे ‘धनी’. प्लास्टिक पैश्याच्या आणि त्यातून कल्पनेतच तयार होणाऱ्या स्वप्न विश्वाच्या मागे न धावता मन वास्तवात ठेवून लुटूपुटुच्या पोकळ शर्यतीमधून बाहेर पडलेले हे महान व्यक्तिविशेष भिकारी फारच मोठे जीवनाचे ज्ञान मुक्तपणे देत असतात. असे पैश्याच्या मागे न धावणारे लोक कुठे पाहायला मिळतात हो जास्त? प्रत्येकजण काहीतरी खजाना शोधण्याच्या प्रवासावर निघण्याच्या घाईत असतो. अर्थात, प्रगतीशील वगेरे आर्थिक विकासाच्या स्पर्धेत उतरून घाम गाळत धावणाऱ्या चाकर वर्गाला भिकाऱ्यांची ‘महानता’ पटकन कळणे अवघड आहे. कारण, अक्कल न वापरता ती तिजोरीत बंद करून ती ‘ठेव’ सुरक्षित ठेवायची कला शहरी मध्यमवर्गाच्या अर्थकारणातून त्यांनी उधार घेतलेली असते बहुधा. ते काहीही असो. आम्हाला आज आमच्या भिकारी बंधू-भगिनींना दिवाळीच्या विशेष शुभेच्छा द्यायच्या आहेत.

हे भिकारी वर्गातले किरकोळ समजले जाणारे जीव नक्की काय चमत्कार करतात? उत्तर अगदी सोप्प आहे. भिकाऱ्यांना  ज्याला भिक मागायची त्याच्या आर्थिक वर्गाची अजिबात भीती नसते. अगदी बस स्थानकावर गाडीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा भिक मागायला भिकारी लाजत नाहीत. कुणी कितीही नकार दिला, शिव्या देवून हाकलून लावले, अंगावर कुत्री सोडली, तरीही अजिबात निराश न होता पुनश्च निष्ठेने आपल्या ‘भिकारी’ धर्माचे पालन करणारे हे प्राणी काहीतरी मानसिक आरोग्याचे सिक्रेट बाळगून असावेत अशी ठाम शंका आमच्या मनात आहे. त्यामुळेच बहुतेक वेळा भिकाऱ्यांना पहिले की आम्हाला आमच्या मानसिक स्वास्थ्याची हरवलेली किल्ली अधून-मधून का हुईना पण शोधायची इच्छा निश्चितच होते. डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे ‘जगण्याच्या खोट्या स्पर्धेतील वख-वख’ संपलेले हे ‘महा’जन मानवी समाजासाठी निश्चितच मोठा आदर्श आहेत.

आणि हो,  ‘काम न करता जगणारे’ म्हणून त्यांची अवहेलना करण्याचा मूर्खपणा करणाऱ्या ‘वर्किंग क्लास’ने एक लक्षात घ्यावे की भिकारी स्वेच्छेने दिलेल्या गोष्टींमधून जगतात आणि त्यांच्या जगण्यातून ‘मोठा’ जीवन कौशल्याचा आदर्श समाजासमोर ठेवतात. तुमच्या कुठल्याही स्पर्धेचा ते भाग नाहीत. एवढी मोठी जीवन विद्या शिकवणारे हे भिकारी कोणतीही फी चार्ज करत नाहीत, जी एस टी वगेरे लावून.  बहुतेक मजूर गट, विशेषतः तरुण ‘मजूर’ (‘नोकरदार’ चा वास्तववादी समानार्थी शब्द ) ‘ऑफिस मध्ये काहीच काम कसं नसत’ आणि करायला सांगितलेलं ‘काम कसं केलं नाही’, याच्या स्टोऱ्या दहा ठिकाणी मोठ्या आवाजात सांगत असतात. हेच ‘शहाणे’ भिकाऱ्यांना ‘भीक’ देताना ‘काम करत नाहीत साले’ आणि ‘भीक मागतात’ वगेरे डायलॉग मारून तत्त्ववेत्ते असल्याची फुशारकी आपल्या कुटुंबासमोर मारत असतात. असला मध्यमवर्गीय दुटप्पीपणा म्हणजे महान भिकारी वर्गासाठी तसा किरकोळ विनोद आहे, रोजच्या टीवीवरच्या डेली सोप सारखा. यामुळे कोणताही भिकारी बहुधा असले कोरडे मध्यमवर्गीय बाण गंभीरपणे घेत नसावा. असो.

मग आमचं या एकूण विषया विषयी नक्की मत काय आहे? नाही, सगळ्यांनी भिकाऱ्यासारखे व्हावे किंवा वागावे असे आम्हाला अजिबात वाटत नाही ! उगीच गैरसमज नकोत !

सध्याच्या जगात प्रत्येकजण स्वतःच्या मेंदूने निर्णय घेतो आणि तरीही सगळे ‘मिडल-क्लास’ वाले थोडासा फरक वगळता सरसकट ‘एकाच’ टाईपचे घरे, वस्तू, गाड्या, गुंतवणूक करत असतात. आणि आपलं ‘त्यांच्या’ पेक्षा वेगळं आणि चांगल आहे, अश्या धर्तीवरच्या गप्पा मारत असतात. असल्या स्पर्धेच्या भयंकर वातावरणात इतरांनी कसे निर्णय घ्यावेत, हे आम्ही सेमी-ग्रामीण (किंवा सेमी-शहरी) मिडीयावाले कोण ठरवणार ? त्यासाठी आर्थिक विकासाच्या पाठीवर बसलेले महान ‘चाकर मेंदू’ सक्षम आहेत. आम्ही आपले आमच्या मुळच्या दिवाळी शुभेच्छा कार्यक्रमाकडे वळतो आणि या विषयातून या दिवाळीपुरते मुक्त होतो.

पुन्हा एकदा, तमाम भिकारी बंधू-भगिनींना दिवाळीच्या ‘विशेष’ शुभेच्छा ! 

16 thoughts on “तमाम भिकारी बंधू-भगिनींना दिवाळीच्या ‘विशेष’ शुभेच्छा…!!! (विशेष संपादकीय)

Comments are closed.

तमाम भिकारी बंधू-भगिनींना दिवाळीच्या ‘विशेष’ शुभेच्छा…!!! (विशेष संपादकीय)

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
16
Read previous post:
काँ. शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार ‘आडम मास्तरांना’; रविवारी पलूसमध्ये सोहळा

पलूस:  काँ. बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार यंदा सोलापूरचे माजी आमदार, कामगार नेते काँ. नरसय्या आडम (मास्तर) यांना जाहीर झाला

Close