आत्मविश्वास कसा वाढवावा? (निमंत्रित लेख)0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

 

‘आत्मविश्वास’ हा शब्द बहुतेक सर्वांनी ऐकलेला आहे. व्यक्तीमत्वाचा, किंबहुना त्याहीपेक्षा व्यक्तीत्वाचा एक प्रमुख घटक म्हणून आत्मविश्वास महत्वाचा समजला जातो. काही मितभाषी लोक वगळता बहुतेक सर्वजण ‘मला सेल्फ-कॉन्फिडन्स आहे’ किंवा ‘माझा सेल्फ-कॉन्फिडन्स कमी आहे’ असे शब्दप्रयोग करताना दिसतात. परंतु, प्रत्येकाला ‘सेल्फ-कॉन्फिडन्स’ किंवा ‘आत्मविश्वास’ म्हणजे नक्की काय? हे माहीत असतेच असे नाही. यासाठी प्रथम आत्मविश्वास म्हणजे काय?’ हे समजून घेणे आवश्यक आहे.

आत्मविश्वास म्हणजे दिलेले काम किंवा आव्हान झेलून ते पूर्ण करून दाखवण्याच्या स्वतःच्या क्षमतेची सजग जाणीव.

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर- मी दिलेले काम किंवा आव्हान पूर्ण करू शकेन ही मनाची सकारात्मक भावना म्हणजे ‘आत्मविश्वास’. अगदी खोलात जाऊन आत्मविश्वास समजून घ्यायचे झाले तर आणखीही विस्तृत व्याख्या तयार करता येवू शकते पण सध्याच्या चर्चेपुरते ‘आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या काम तडीस नेण्याच्या क्षमतेविषयीची स्वतःला असलेली ठळक जाणीव’ असे घेऊया. एकदा ‘आत्मविश्वास’ म्हणजे काय समजले की तो वाढवावा कसा हे लक्षात घेणे अतिशय सोपे आहे. पण त्यापूर्वी अत्माविश्वसाविषयी आणखी एक गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे.

सामान्य माणसांच्या पातळीवर आत्मविश्वास हा ज्या पद्धतीने एकूण व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक म्हणून दिसतो किंवा घेतला जातो ते थोडेसे चुकीचे आहे. मुळात आत्मविश्वास हा दिलेल्या आव्हानाशी किंवा कामाशी निगडीत असतो. यामुळेच, प्रसंगी एखादा किरकोळ शरीराचा व्यक्तीसुद्धा आपल्यापेक्षा शक्तिमान व्यक्तीला हरवताना दिसतो. दुसरे उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी सध्या घरातली आणि कोणताही विशेष पाठींबा नसलेली मुले-मुली स्पर्धा परीक्षांमध्ये अचानक यशस्वी होतात. यात इतर लोक आणि जिंकलेले लोक यामध्ये ‘आत्मविश्वास’ हा घटक वेगवेगळ्या प्रमाणात असल्याने निकालामध्ये फरक दिसतो. हे सर्व अशासाठी स्पष्ट केले कारण बहुतेक जनता आत्मविश्वास म्हणजे सतत स्वतःजवळ असणारी एक गोष्ट जी सतत व्यक्तींच्या अस्तित्वामध्ये हवा भरत असते आणि समाजातील प्रभाव कायम ठेवते अशी सिक्रेट गोष्ट अश्या स्वरुपात समजून घेतात आणि स्वतःमध्ये स्वतःविषयी अनावश्यक न्यूनगंड आणि कमतरतेची भावना तयार करतात. एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने समजून घेतली तर आपण आपल्याच ज्ञानाचे बळी कसे ठरतो ते लक्षात येईल. आत्मविश्वास ही अशीच एक संकल्पना आहे जी चुकीच्या पद्धतीने समजून घेतली तर तुमचे व्यक्तिमत्व कमकुवत बनवू शकते. आपण आता पुढे जाऊन आत्मविश्वास कसा वाढवावा याविषयी जाणून घेऊया.

  • आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन एकत्र नांदतात. तेव्हा, स्वतःविषयी आणि स्वतःच्या क्षमातांविषयी सकारात्मक राहणे आवश्यक आहे. आपल्यामधील क्षमतांचा होत असलेला विकास सजगपणे बघायची सवय लावून घेतली तर आपल्या मधील आत्मविश्वासाचा विकास समजून येतो. जी गोष्ट आपण काही वर्षापूर्वी करू शकत नव्हतो तीच आपण आता व्यवस्थित करू शकतो ही भावना आत्मविश्वास वाढवण्यास पूरक असते. त्यामुळे नेहमी स्वतःविषयी सकारात्मक असा आणि बदल तपासा.
  • स्वतःच्या क्षमता वाढवत रहाणे हे स्पर्धेत टिकण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. परंतु, आत्मविश्वासाच्या बाबतीत हीच बाब फार महत्वाची ठरते. क्षमता वाढवणे आणि त्या योग्य दिशेने वाढत आहेत काय हे तपासणे आवश्यक आहे. याबाबतीतला आत्मविश्वास वाढण्यासाठीचा सर्वात मोठा उपाय म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या नवीन गोष्टी शोधणे आणि त्यात शक्य तेवढे सहभागी होणे. गट-चर्चा, मेळावे, भाषणे, छंद गट, कार्यशाळा, राजकीय व्यासपीठ, आंदोलने या व अश्या अनेक गोष्टी आपल्यामधील आत्मविश्वास वाढवतात आणि नवीन माहिती आणि ज्ञानाबरोबरच कौशल्ये वाढवतात. याचा एकत्रित परीणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःच्या क्षमतांना जितके मोठे आव्हान तयार करता तितक्या मोठ्या प्रमाणात तुमच्यामध्ये दडून बसलेल्या मानसिक शक्ती बाहेर येतात. त्यामुळे सतत आव्हान झेलण्यास तत्पर रहा.
  • प्रत्येकाच्या मानसिक क्षमता जरी अमर्याद पद्धतीने वाढत असल्या तरी एका विशिष्ट पातळीवर शारीरिक क्षमता किंवा ताकद असणे आवश्यक असते. यासाठी पुरेसा आणि आरोग्यदायी देशी आहार, देशी पद्धतीचे यांत्रिक गोष्टींशिवाय केलेले निवडक व्यायाम व योग, रोज काही वेळ केलेले ध्यान, निसर्गामध्ये फिरणे अश्या गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवतात. लक्षात ठेवा, आपल्या परंपरेतून आलेले ज्ञान हजारो वर्षे अनेक पिढ्यांनी तपासलेले असते. स्वतःमध्ये न्यूनगंड आणि कमीपणाची भावना असेल तर आपण तथाकथित नवीन ज्ञानाला बळी पडू शकता आणि मग घरात अनेक प्रकारचे विटामिन पावडरी, गोळ्या, व्यायामाची यंत्रे वगेरे साठू लागतात. या तुलनेत पारंपारीक अन्न, व्यायाम, ध्यान या पद्धती आपल्याला आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाची आणि ज्ञानपरंपरेची अभिमानास्पद जाणीव देतात. आत्मविश्वासाला आवश्यक ऊर्जा अश्या पद्धतीने तयार करणे आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त ठरते.

आत्मविश्वास हा अत्यंत क्लिष्ट घटक आहे ज्यामध्ये शारीरिक अंग जेवढे महत्वाचे असते त्यापेक्षा जास्त मानसिक अंग महत्वाचे असते. अत्यंत सूक्ष्म मानसिक पातळीवर आत्मविश्वासासंबंधी बदल घडत असतात. आणि असे बदल समजून घेणे आणि त्या बदलाच्या प्रक्रीयेचे नियंत्रण आपल्याकडे घेणे, हे आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. यामध्ये बऱ्याचदा तज्ञ समुपदेशकाची आणि मार्गदर्शकाची गरज असते. त्यासाठी वेळेबरोबरच आर्थिक खर्चही करावा लागतो आणि विशिष्ट दिशेने प्रयत्न करावे लागतात. एक मात्र निश्चित असते की एकदा आत्मविश्वास समजला, जाणवला आणि तो वाढवण्याची प्रक्रिया समजली तर तुम्ही प्रत्येक आव्हान झेलण्यासाठी तयार असता.

मग स्वीकारणार आत्मविश्वास वाढवण्याचे आव्हान?

 

लेखक: डॉ. गोविंद धस्के, संचालक, सेल्फहूड

 

टिप: लेखांमध्ये कोणताही वैद्यकीय उपचार सुचवण्यात आलेला नाही. ज्या ठिकाणी शंका असतील अश्यावेळी तज्ञांचा सल्ला घ्यावा अशी प्रस्तुत लेखकाची सूचना आहे. यासंदर्भात वाचकांनी वैयक्तिक जबाबदारी समजून निर्णय घ्यावेत.


© डॉ. गोविंद धस्के, २०१७.

आत्मविश्वास कसा वाढवावा? (निमंत्रित लेख)

by डॉ. गोविंद धस्के वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’ कडेगाव व पलूसच्या सौंदर्यात भर टाकेल: संग्रामसिंह देशमुख

कडेगाव: कडेगाव व पलूस तालुका विकासाच्या नव्या दिशेने प्रवास करत असून या शहरीकरण प्रक्रियेमध्ये 'ज्ञानहिरा बिल्डकॉन' आपल्या कामातून तालुक्याच्या सौंदर्यात

Close