इंग्लीश बोलायला शिकवणारा हुकमी ‘क्लास’ कसा निवडावा? (निमंत्रित लेख)0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

व्यावसायिक प्रगतीसाठी, नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी, शिक्षणासाठी अनेक जण अनेक वेळा अनेक प्रकारचे इंग्लीश बोलण्यासाठीचे क्लासेस लावतात आणि शक्य तितक्या वेगात इंग्लीश बोलायची इच्छा मनात ठेवतात. क्लासचा नक्की उपयोग कसा झाला, कोणत्या प्रकारचे कोचिंग आवश्यक होते, आणि ते मिळाले का, हे ज्याच त्याने ठरवायचं असतं. आपल्या आजूबाजूला अनेक इंग्लीश स्पिकिंग शिकवणारे क्लासेस असतात. यातले बहुतेक क्लासेस काही दिवसात इंग्लीश बोलायला शिकवण्याच्या जाहिराती करतात (३० दिवसात/ ४५ दिवसात इंग्लीश शिका वगेरे). काही क्लासेस त्यांच्याकडे असलेल्या सुविधांचे अवडंबर दाखवतात आणि त्याच्यातून इंग्लीश बोलायला शिकण्याच्या शक्यता व्यक्त करतात. अर्थात, हे झाले काही नमुने, पण ही यादी वाढवायची म्हटली तर आणखी खूप वाढू शकते. विशेषतः मार्केटिंगच्या आधुनिक जमान्यात प्रत्येक इंग्लीश स्पिकिंगचा क्लास नवनवीन युक्त्या वापरून इंग्लीश बोलायला शिकू इच्छिणाऱ्या जनतेला भुरळ घालण्याचा प्रयत्न ठेवणार यात शंका नाही.

परंतु या सर्व प्रकारात सामान्य विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक आणि नोकरदार मंडळी स्वतःला उपयुक्त क्लास निवडून त्याद्वारे इंग्लीश बोलायला शिकतात का, हा मूळ प्रश्न अनुत्तरीत राहतो. विशेषतः, ३ ते ४ क्लास करूनही इंग्लीश न बोलता येणारे आणि त्यामुळे स्वतःच्या धंद्याचे, नोकरीचे आणि करीयरचे नुकसान झालेले लोक पहिले की त्यांच्या निराशेचे ढग चेहऱ्यावर अगदी स्पष्ट जाणवू लागतात.

इंग्लीश स्पीकिंगचे क्लासेस लावणारे शक्यतो जाहिरातीला भुलतात किंवा ‘पिअर प्रेशर’ म्हणजे आपले मित्र-मैत्रिणी यांनी लावला किंवा आग्रह केला म्हणून इंग्लीश स्पिकिंगचा क्लास लावतात. यातले बहुतेकजण त्याच-त्या प्रकारचे व्याकरण, भाषांतर आणि पाठांतर करून इंग्लीश वाक्ये बोलणे वगेरे शिकवणाऱ्या क्लासेस मध्ये अडकतात. मध्यमवर्गीय अंधश्रद्धेप्रमाणे आपले चुकलेले निर्णय किंवा झालेले नुकसान त्वरीत इतरांना सांगायची पद्धत नसल्याने एकाचे बघून दुसराही इंग्लीश स्पिकिंगच्या या भवसागरात उडी मारतो आणि मराठीत वाक्ये तयार करून त्याचे इंग्लीश मध्ये भाषांतर करून बोलायला शिकवणारे इंग्लीश स्पिकिंग शिकत बसतो. या सर्व गदारोळामध्ये स्वतःला कसल्या प्रकारचे इंग्लीश स्पिकिंगचे प्रशिक्षण हवे होते याविषयी अजिबात विचार केला जात नाही. ‘सगळ्या आजारावर एकच गोळी’ या न्यायाने एकाच प्रकारच्या इंग्लीश स्पिकिंगच्या क्लासेसमध्ये भरती होण्याचे प्रमाण भयंकर आहे.

काय चुकत असतं नक्की इंग्लीश स्पिकिंगचा क्लास निवडताना?

कसा निवडावा अचूक इंग्लीश स्पिकिंगचा क्लास जो हुकमी पद्धतीने इंग्लीश बोलायला शिकवतो?

१. आपली इंग्लीश बोलायची समस्या नक्की काय आहे हे शोधण्यासाठी नैदानिक चाचणी व समुपदेशन क्लासमध्ये उपलब्ध आहे काय?

प्रथम आपली इंग्लीश स्पिकिंगची समस्या काय आहे हे तपासले पाहिजे. बहुतेक लोकांना इतरांनी बोललेलं इंग्लीश समजतं पण स्वतः बोलायची जेव्हा वेळ येते तेव्हा शब्द फुटत नाहीत, किंवा शब्द सापडत नाहीत, किंवा भीती वाटल्यामुळे मन निराश होते आणि बोलता येत नाही. अश्या व्यक्तींनी स्वतःच्या विशिष्ट समस्येसाठी समुपदेशकाच्या माध्यमातून उपाय शोधून त्याचा सराव केला पाहिजे. भीती असेल तर त्यावर मानसिक उपचार, ध्यान, योग, पुष्पौषधी असे उपचार करून आपल्या समस्या दूर केल्या पाहिजेत. परंतु, बहुतेक इंग्लीश स्पिकिंग क्लासेसमध्ये अश्या प्रकारच्या सर्वांगीण समुपदेशनाची सोय नसल्याने घोकंपट्टी आणि पाठांतर करत वेळ वाया घालवला जातो. आपल्या इंग्लीश स्पिकिंग क्लास मध्ये सुरवातीला आपल्या समस्येचे नैदानिक पृथक्करण तेही वेगवेगळ्या चाचण्यांच्या माध्यमातून आणि समुपदेशनाच्या माध्यमातून चर्चा करून नक्की काय पद्धतीने इंग्लीश स्पिकिंग शिकले पाहिजे हे ठरवणे अत्यंत आवश्यक आहे. क्लास निवडताना समुपदेशक आहेत का आणि नैदानिक चाचणी, इंग्लीश बोलण्याची क्षमता तपासणी असे प्रकार उपलब्ध आहेत का हे जरूर तपासा. लक्षात ठेवा, चुकीचे निदान करून औषध घेतले तर आयुष्यभर रोग बरा होऊ शकत नाही.

२. काळ, डायरेक्ट-इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल्सचा वापर हे अगदी लहानपणासून शिकलेलं पुन्हा शिकवून वेळ वाया घालवला जातोय का?

बहुतेक क्लासेसमध्ये हायस्कूलमध्ये दरवर्षी शिकवून-शिकुन चोथा झालेले इंग्लीश व्याकरण आणि त्याचा वापर यावर अनावश्यक वेळ घालवला जातो. हाच वेळ इंग्लीश स्पिकिंगच्या सरावासाठी आणि बोलण्यातील इतर समस्यांना सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आपला क्लास असाच ‘टाईमपास’ करून दिवस वाया घालवत आहे का हे बघणे आवश्यक आहे.

३. क्लासमध्ये भाषा शिकवण्याची पद्धती कोणती वापरली आहे?

भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा शिकण्याची पद्धत ही ब्रिटीश गुलामी काळापासून बहुतेक जुन्याच पद्धतीची राहिली आहे. त्यामध्ये सार्वत्रिक इंग्लीश संस्कृती समजून घेण्यापेक्षा विशिष्ट वर्गातील इंग्लीश लोकांची सेवा करताना ‘साहेबाना आणि मादामला नोकरांनी काय आणि कसे बोललेलं आवडतं?’ हे शिकवण्याची चांगली व्यवस्था आहे. अश्या पद्धतीने भाषा शिकण्याचा प्रयत्न केल्यानेच अजूनही बहुतेक जनता शालेय पातळीवर चांगल्या पद्धतीने इंग्लीश बोलू शकली नाही.

यासाठी इंग्लीश संस्कृतीबद्द्लचे विडीओ, ऑडीओ, इंग्लीश लोकांची शहरी आणि ग्रामीण संस्कृती, तिथल्या स्कॉटिश-वेल्श बोली, शेतकरी संस्कृती, आहार पद्धती हे पाहणे आणि त्यातून इंग्लीश भाषेचा, शब्दांचा, म्हणींचा, लोकगीतांचा, इत्यादी गोष्टींचा उगम आणि वापर समजून घेणे यातून इंग्लीश बोलण्याची प्रक्रिया एकदम सोपी आणि सहज होऊन जाते.

लक्षात ठेवा, पुस्तक घेऊन कन्नड शिकायलासुद्धा ३-४ महिने जातात. पण छोट्या कन्नड गावात १५ दिवस राहिले तरीही १५-२० वाक्ये आणि २५-३० शब्द सहज शिकता येतात. भाषा बोलते आणि बोलल्याशिवाय भाषा जिवंत होत नाही. म्हणून भाषा ही शक्य तितकी त्या-त्या देशात जशी बोलली जाते तश्या पद्धतीने शिकली तर पटकन येते. आपल्या क्लासमध्ये अश्याप्रकारे विडीओ दाखवून इंग्लीश भाषा आणि संस्कृती एकत्रितपणे समजावली जाते काय? संस्कृतीतून भाषा कशी दिसते हे शिकवले जाते काय?

४. आधुनिक शहरी जगासाठी लागणारे इंग्लीश शिकवण्याची पद्धती कशी आहे?

सध्याच्या जागतिकिकरणाच्या काळात कोणाला कधी परदेशी जावे लागेल आणि कोणाला कधी इंग्लीश बोलावे लागेल सांगता येत नाही. यासाठी आपल्या क्लासमध्ये किमान विडीओ कॉन्फरन्सिंग, कॉर्पोरेट मिटिंग आणि मेळावे, रेल्वे स्टेशन-एअरपोर्ट, हॉटेल बुकिंग, बँकिंग, कस्टमर केअरशी बोलणे अश्या आवश्यक गोष्टींचे संवाद प्रात्यक्षिक शिकवले जाणे आवश्यक आहे. हे शिकवले जात नसेल तर आपल्या क्लासचा वेळ आणि पैसे वाया जात आहेत असे समजून जावे.

५. सर्वांगीण पद्धतींचा कितपत वापर इंग्लीश बोलायला शिकवताना केला जात आहे ?

इंग्लीश शिकताना इंग्लीश शिष्टाचार म्हणजेच सभ्य समाजाची वागण्या-बोलण्याची पद्धत, सांस्कृतिकदृष्ट्या आवश्यक गोष्टींचा समावेश जसेकी स्त्रियांशी व लहान मुलांशी बोलताना घ्यावयाची विशेष काळजी, जीवनशैली वगेरे समजून घेणे हे भाषा बोलायला शिकताना आवश्यक असते. आपल्या इंग्लीश स्पिकिंगच्या क्लासमध्ये तशी व्यवस्था आहे का हे बघणे आवश्यक आहे. आपला मेंदू भाषा आणि त्यातले शब्द यांचे विशिष्ट पद्धतीने मनात चित्र तयार करून लक्षात ठेवत असतो आणि त्यातूनच भाषा बोलून स्वतःला व्यक्त करत असतो. त्यासाठी सर्वांगीण पद्धतीने इंग्लीश भाषा समजून घेणे आणि मगच बोलणे आवश्यक असते. लक्षात ठेवा, क-कमळाचा आणि ए-अप्पलचा  (सफरचंद/सेब) हे मराठी आणि इंग्लीश नंतर आहे,  या गोष्टी मानवी मनाच्या भाषा शिकण्याच्या पद्धतीच्या निदर्शक आहेत. वरून बघितले तर कमळाची पाने ‘क’ चा आकार दर्शवतात ना? अगदी अश्याच चिन्ह पद्धतीने भाषा समजून घेतली तर इंग्लीश बोलणे सोपे होते. अर्थात, आपला क्लास अजून अश्या भाषाशास्त्रीय ज्ञानाचा वापर इंग्लीश बोलायला शिकवताना करतो का हे तपासणे आवश्यक आहे.

६. शेवटी काही महत्वाच्या गोष्टी…..

इंग्लीश स्पिकिंग शिकवणारा क्लास आपल्या भाषेचे गुणात्मक मुल्यमापन करत आहे का? त्यासाठी पेपर आणि प्रात्यक्षिक बोलणे दोन्ही वापरले जाते का? शब्दसंग्रह वाढवण्यासाठी विशेष क्लृप्त्या शिकवल्या आहेत काय? इंग्लीश भाषा आणि तिच्या बोली तसेच अमेरिकन आणि ब्रिटीश इंग्लीश यातले फरक समजावून सांगितले आहेत काय?  उच्चार आणि गती याविषयी विशेष प्रशिक्षण दिले आहे काय? इंग्लीश बोलतानाची भीती आणि इतर मानसिक समस्या यावर सोपे आणि सुरक्षित उपाय सांगितले आहेत काय? देण्यात येणारे अभ्यासाचे साहित्य कितपत दीर्घकालीन उपयोगाचे आहे काय? प्रात्यक्षिक देण्यासाठी तांत्रिक व्यवस्था आहे काय? सगळ्यात महत्वाचे म्हणजे वैयक्तीक समुपदेशन म्हणजेच कौन्सेलिंगची सोय आहे काय? आणि इंग्लीश बोलायला शिकवणारी व्यक्ती स्वतः आंतरराष्ट्रीय पातळीवरचे इंग्लीश सक्षमपणे बोलू शकते काय?

कोणी काहीही जाहिरात केली तरीही  इंग्लीश भाषा बोलायला शिकणे हा मेंदूच्या विशिष्ट प्रक्रिया आणि त्याला दिलेली मानवी शिक्षणाची जोड यातून साधलेला परीणाम असतो. त्यामुळे आपणही किती महागडा क्लास लावला यापेक्षा आपण किती सक्षम आणि संशोधित पद्धतीने शिकवणारा क्लास लावला यावर आपले इंग्लीश बोलण्यातील यश अवलंबून असते. वरील यादी वापरून आपले इंग्लीश स्पिकिंगचे क्लास तपासून बघा नक्की आपल्या इंग्लीश बोलण्यात काय घोळ झालाय आणि कुणामुळे झालाय ते शोधा ? लक्षात ठेवा, बदलाची संधी आल्यानंतर बदल केले नाहीत तर आपल्या स्वतःमध्ये बदल करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. मग करणार बदल?

©गोविंद धस्के, २०१७


इंग्लीश बोलायला शिकवणारा हुकमी ‘क्लास’ कसा निवडावा? (निमंत्रित लेख)

by डॉ. गोविंद धस्के वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​कडेगावच्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ मधील डिजिटल क्रांतीची शोकांतिका…!!!

कडेगाव: राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर डिजिटल क्रांतीसाठी भलेही स्वतःची पाठ थोपटून घेणारे सरकारी अधिकारी असले तरीही संस्थात्मक पातळीवर डिजिटल

Close