कडेगाव-पलूस मधलं तरुण क्रांतीबीज-आकाश सातपुते, सांगली जिल्हाध्यक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

आकाश जगन्नाथ सातपुते, चिंचणी (अं) या कडेगांव तालुक्यातल्या एका विकासोन्मुख गावातलं अनोखं तरुण व्यक्तिमत्व. एरव्ही सामाजिक आंदोलने व कृती यामुळे चर्चेत असणारे आकाश सातपुते सध्या चर्चेत आहेत ते राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष झाल्यानं. अत्यंत तरुण वयात कार्यकर्ता म्हणून समाजकारणात उतरलेले आणि नंतर राजकारण आणि समाजकारण याच्यातले संतुलन ठेवत, प्रसंगी समाजकारणाला आणि सामाजिक न्यायाच्या लढाईला पुढे आणणारे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ते जिल्ह्याला माहीत आहेत. स्वतः सातपुते यांना ते स्वतः सामाजिक क्षेत्रात एवढे सक्रीय होतील अस कधी स्वप्नातदेखील वाटल नव्हत. पण नियतीच्या मनात वेगळच काहीतरी होत.

सांगली जिल्ह्यातील पुरोगामी आणि बहुजनवादी चळवळीमध्ये आकाश सातपुते यांचं नाव अगदी आदराने घेतलं जातं. त्याला कारणेही तशीच आहेत. इतक्या तरुण वयात सामाजिक चळवळीत काम करणे आणि त्यातून एका प्रगतीशील राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष बनणे या गोष्टी सहजसाध्य नाहीत. घराणेशाहीतल्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यात तेही विशेष राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि प्रमुख राजकीय पक्ष वगळता तिसऱ्या-चौथ्या पक्षांना अजिबात स्थान नसताना आकाश सातपुते यांनी प्रस्थापित राजकारणात न उतरता सामाजिक न्यायासाठी लढण्याचा वसा घेऊन स्वतःचे राजकीय धोरण ठरवले. कुठून मिळाली ही शक्ती आणि ऊर्जा आकाश सातपुते यांना ? आकाशचा प्रवास समजून घेणे हाच एक मोठा वैचारिक प्रवास आहे.

अगदी तरुण वयात असताना प्रा. मा. म. देशमुख सरांच पुस्तक वाचून प्रेरित झालेल्या आकाश सातपुते यांना क्रांतिकारी लिखाण वाचण्याची सवय झाली. प्रा. मा. म. देशमुख सरांच्या पुस्तकांमुळे तर्क करणे, चिकित्सा करणे यातूनच हळू हळू पाय आपसूक समाजकारणात वळायला लागले. प्रा.मा.म. देशमुख सर, श्रीमंत कोकाटे, पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. आ. ह. साळुंखे सर यांची मिळेल ती पुस्तके वाचुन त्यांनी स्वतःची वैचारिक बैठक आणि मुल्यवादी समाजकारणाचा आदर्श बळकट केला. यातून एक तथ्य समोर आले ते म्हणजे भारताचा इतिहास हा सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे, परंतु ईथल्या मनुवादी व्यवस्थेने बहुजनांचा ईतिहास हा बहुजनांच्या विरोधातच लिहिण्याच काम केलय. यासाठी खरा इतिहास बहुजन समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, हे एकमेव उद्दिष्ट घेऊन आकाश सातपुते यांनी सामाजिक क्षेत्रात आणि चळवळीमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. आजपर्यंत मनुवाद्यांनी जातीय तेढ निर्माण करुन समाजात दरी निर्माण केली आणि यामध्ये बहुजनांमधले काही बहुजनदेखील दलाल काम करतात हे पाहणाऱ्या आकाश सातपुते यांनी कास धरली ती शिव, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या मूलनिवासी क्रांती विचारांची.

आकाश सातपुते यांच्या कामाची चुणूक पाहिलेल्या  तत्कालीन सामाजिक चळवळींच्या नेत्यांनी मग पहिली संधी दिली ती मातंग सेवा संघात काम करण्याची. त्याहीपूर्वी बामसेफचा एक साधा कार्यकर्ता म्हणून सातपुते यांनी आपल्या सार्वजनिक जीवनास सुरवात केली होतीच. मातंग सेवा संघात ब्रिगेडीअर कर्नल सुधीर सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळणे हाही तरुण आकाश सातपुते यांना एक मोठा प्रेरणादायी स्रोत होता. या अनुभवाविषयी बोलताना सातपुते म्हणाले, “मातंग सेवा संघापासुन खरी सामाजीक कामाची सुरुवात झाली. मी ज्यावेळेला आण्णाभाऊ साठे वाचायला लागलो तेव्हा बाबासाहेब समजले, बाबासाहेब अभ्यासायला गेलो तेव्हा महात्मा फुले व शाहु समजले, शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज समजले. आणि, हे ही जाणवल की महापुरुषांचा इतिहासाच विकृतीकरण झालेल आहे. यासाठी बहुजनांनी समोर येवून स्वतःच्या इतिहासाचे पुनर्लेखन करावे.”

मातंग सेवा संघाच्या माध्यामतून अनेक कार्यक्रम-मेळावे घेतले गेले. मातंग सेवा संघात सुरुवातीलाच जिल्हाध्यक्ष म्हणुन काम केले व प्रभावी कामामुळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणुन काम पाहण्याची संधी आकाश यांना मिळाली. मातंग सेवा संघाच्या माध्यमातून अनेक प्रकारची आंदोलने-मोर्च झाले, अनेक परिषदा घेतल्या गेल्या. अशातच मुक्ता साळवे यांचा जन्मदिन ‘मातंग क्रांती परीषद’ या नावाने घेण्यात आला. या प्रसंगी ब्रिगेडीअर सुधीर सावंत साहेब व हणुमंत उपरे यांच्या विचारमंचावरती सातपुते यांना संधी मिळाली. एका तरुण कार्यकर्त्याला ही मोठी संधी होती. याविषयी बोलताना आकाश सातपुते म्हणाले, “मला माझ मत मांडण्याची संधी मिळाली. सगळ्यांनी खुप प्रतिसाद दिला. हणुमंत उपरे सरांनी तर मला बोलावुन घेवुन कौतुक केल.”

या सर्व प्रकारातून सामाजिक कार्याची मुळातून आवड असलेल्या आकाश सातपुते यांनी ‘भेटेल तिथे प्रबोधन’ ही नीती सुरु केली आणि सामाजिक पातळीवरील बहुजन एकीकरनास  सुरवात केली.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन सांगलीत करण्यात आंदोलन करण्यात आले. तसेच मुस्लीम समाजासाठी सच्चर समिती स्थापन करण्यात यावी यासाठी देखील आंदोलन केली. वाटेगांवला प्रा. मा. म. देशमुख सरांना साहित्य संमेलन घेवुन सरांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यांनतर आकाश सातपुते यांनी जनता क्रांती दलामध्ये असताना वेगवेगळे विषय घेवुन आंदोलने केली, कित्येक आंदोलने यशस्वी केली. काही फायनान्स कंपन्या महिलांना नाहक त्रास देत होत्या, त्या कंपन्यांच्या विरोधात मोठा लढा निर्माण केला. अँट्रोसिटीसाठी आंदोलने, दिन-दलित शोषितांना न्याय मिळण्यासाठी अश्याच प्रकारची प्रखर आंदोलने केली.

या सर्व कार्याची आंदोलनाची दखल घेवुनच सध्या आकाश सातपुते यांना राष्ट्रीय समाज पक्षात काम करण्याची संधी मिळाली आहे. बहुजन चळवळीमधील काही घटकांनी सातपुते यांचे नवीन पक्षात जाणे खटकले आणि “प्रस्थापितांसोबत गेले” अशी हरकत घेण्यात आली. आकाश सातपुते मात्र याविषयी अत्यंत ठामपणे आपली भूमिका मांडतात : “राष्ट्रीय समाज पक्षात जाण्या अगोदर जानकर साहेबांची पुस्तके वाचली, मगच निर्णय घेतला. काशीरामजींनी ज्यांना माणसपुत्र मानल ते जानकर साहेब आहेत.”

सध्या आकाश सातपुते सामाजिक न्यायाचा आणि मानवाधिकारांचा लढा पुढे नेण्यासाठी सज्ज झाले आहेत. भविष्यातले राजकीय आणि सामाजिक धोरण काय असणारे याविषयी ते प्रकटपणे म्हणाले, “माझी मनुवाद्यांविरोधातील लढाई जोपर्यंत जिवात जिव आहे तोपर्यंत सुरुच राहील. रक्ताच्या शेवटचा थेंब जोपर्यंत असेल तोपर्यंत मनुवाद्यांविरोधातील माझी लढाई सुरुच राहिल.”

आकाश सातपुते एक राजकारणी म्हणून नव्हे तर सामाजिक नेता म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत. सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय पटलावर चमकण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. ते आव्हानही ते निश्चितच पेलतील यात शंका नाही.

शहरामधील कॉर्पोरेट नोकरी किंवा सरकारी अधिकारी होणे किंवा हरितक्रांतीच्या आयत्या मजा मारणे असल्या संस्कृतीमध्ये समाजकारणात मग्न असणारा आकाश सातपुते सारख्या निधड्या छातीचा तरुण अजूनही कडेगाव-पलूस मध्ये क्रांती बीजे जिवंत असल्याची अनुभूती आणि प्रेरणा देत आहे.

आता वेळ आहे संपूर्ण जिल्ह्याला व्यापण्याची. आणि आकाश सातपुते त्यासाठी सज्ज झालेतच.


जाहिरात

18 thoughts on “कडेगाव-पलूस मधलं तरुण क्रांतीबीज-आकाश सातपुते, सांगली जिल्हाध्यक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष

Comments are closed.

कडेगाव-पलूस मधलं तरुण क्रांतीबीज-आकाश सातपुते, सांगली जिल्हाध्यक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
18
Read previous post:
विद्यार्थी दिवसानिम्मित ‘सेल्फहूड’ तर्फे येत्या शनिवारी मोफत समुपदेशन शिबीराचे आयोजन

कडेगाव:  'राष्ट्रीय विद्यार्थी दिवसा'च्या अनुषंगाने 'सेल्फहूड' तर्फे येत्या शनिवारी व रविवारी (११ व १२ नोव्हेंबर रोजी ) मोफत समुपदेशन शिबिराचे

Close