बोलण्याच्या कलेची काही नैसर्गिक रहस्ये0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

निमंत्रित लेख

‘बोलणाराच्या एरंडया विकल्या जातात पण न बोलणाराचे गहूसुद्धा विकले जात नाहीत’, अगदी अश्या अर्थाच्या म्हणी बहुतेक महाराष्ट्रातल्या सर्व बोलीभाषेत आहेत. अतिशय समर्पक पद्धतीने ‘बोलण्याच्या कलेचे महत्त्व आणि महात्म्य’ सांगणारी ही म्हण जितका प्रत्यक्ष सल्ला देते तितकाच अप्रत्यक्ष सल्लाही देते, अर्थात बोलण्याविषयीच !

बोलण्याची कला अशी काय असते काय? काय आहे त्या कलेचे रहस्य? प्रत्येकाकडे ती कला का नाही? असे हजारो प्रश्न आपल्या मनात येतात. यासाठी जाणून घेऊया बोलण्याच्या कलेविषयी आपल्या पारंपारीक ज्ञानामध्ये नक्की शिकण्यासारखे काय-काय दडले आहे.

अगदी लहान असताना आईच्या कलानं बोलायला शिकतो तेव्हा आपण त्याला ‘बाळ बोलायला लागलं’ असं म्हणतो, तेच बाळ जरा मोठं झालं आणि चढ्या आवाजात बोलायला लागलं की पुन्हा आपण ‘बाळ बोलायला लागलं’ म्हणतो. तेच शब्द फक्त बोलण्याच्या पद्धतीत बदल केला की अर्थ आणि बोलण्यामागची भावना यामध्ये कमालीचा बदल घडतो. याचा अर्थ प्रभावी संवादासाठी फक्त शब्दांचा उपयोग नसून ते शब्द जिवंत करणारी व्यक्ती बोलण्यामागे लागते. बोलण्याच्या कलेचे रहस्य जाणून घेण्यासाठी माणसां-माणसांमधला संवाद डोळे आणि कान उघडे ठेवून बघायची सवय आपण लावून घेतली पाहिजे. कारण, ‘कोणी बोलताना काय शब्द वापरले’ यावर कित्येक महिने बैठकीत किलो-किलोने तंबाखू मळली जाते.

अगदी जन्माला आल्यापासून आपण अत्यंत सहजपणे बोलायला शिकतो त्यामुळे बोलणे ही अजिबात रहस्यमयी प्रक्रीया वाटत नसते. त्याकडे आपण तितक्या गांभीर्याने बघतसुद्धा नाही. पण, जेव्हा व्यवसायाच्या निमित्ताने, सामाजिक कामांच्या निमित्ताने बोलणे आवश्यक बनते तेव्हा आपण जागे होतो. पण तेव्हाही बोलणे हा अगदी सामान्य सहज आणि नैसर्गिक प्रकार म्हणून घेतल्यामुळे नक्की कळत नसते की फक्त काही लोकांचे बोलणे जास्त प्रभावी का आहे आणि काही लोकांचे अजिबात प्रभावी नाही, मग भलेही ती व्यक्ती कितीही महत्वाची असो किंवा ज्ञानी असो. हा फरक नक्की कसा तयार झाला? निसर्गाने प्रत्येकाकडे ज्ञान घेण्यासाठी मेंदू आणि बोलण्यासाठी तोंड अगदी काही भेदभाव न करता समान पद्धतीने दिले आहे. तरीही, बोलण्याच्या कलेमध्ये आणि प्रभावामध्ये इतका फरक का आहे?

याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला अगदी जन्मापासून आपले बोलणे कसे विकसित होत आले आहे, आणि त्याचा आपल्या सामाजिकतेवर, व्यक्तीमत्वावर, व्यवसायावर, आणि स्वतःविषयीच्या जाणीवेवर कोणता प्रभाव पडला आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे.

यामध्ये अगदी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातील वातावरण आणि परंपरा. यामध्ये आपल्याला घरात नक्की कितपत बोलायला दिले जाते, कुटुंबामध्ये सर्व सदस्यांमध्ये सुसंवादाची परंपरा आहे काय? अश्या गोष्टी तपासणे महत्वाचे ठरते. बऱ्याचदा मुलांना सामाजिक पातळीवर किंवा त्यांना स्वतःला जे वाटते ते बोलण्यापासून थांबवले जाते. आणि, पूर्ण नाव सांगणे व शांत बसणे अश्या गोष्टी शिकवल्या जातात, सगळ्यात कहर म्हणजे त्याला ‘संस्कार’ वगेरे गोंडस नाव दिले जाते. यामुळे मुलांच्या नैसर्गिक बोलण्याच्या, भावना प्रकट करण्याच्या, मन मोकळं करण्याच्या सवयी दबल्या जातात. विशेषतः पाहुण्यांसमोर शांत बसायला लावायच्या वृत्तीमुळे मुले बुजरी बनतात. मग तरुण वयात अश्या मुलांचे गवेगळ्या ठिकाणच्या कार्यालयांमध्ये, शहरांमध्ये जाऊन अनोळखी किंवा नवीन व्यक्तींशी संवाद साधायचे धाडस किंवा कौशल्य अर्धवट विकसित होते. अशा ‘कला’कार घराण्यातून आलेली मंडळी संवाद साधण्याच्या कामात फारशी तरबेज नसतात आणि यांच्यासाठी साधे-साधे संवाद साधणे सुद्धा मोठे अवघड काम असते.

मुलांना सतत टोचणी करत राहिल्याने बोलणे म्हणजे ‘समाजाला आणि इतर लोकांना आवडेल असंच कायतरी आहे आणि ते शिकणे आवश्यक आहे’, असा चुकीचा मानसिक संस्कार घडतो. आपल्यासोबत आपल्या सुरवातीच्या बालपणापासुनच्या काळात आपल्या उपजत बोलण्याच्या प्रक्रियेवर कोणते चुकीचे संस्कार झाले आहेत, हे मागे जाऊन तपासले तर तुमची ‘बोलण्याची कला’ नक्की कुठे हरवली आहे हे समजायला लागते. अर्थात हे सगळे पुराणे चुकीचे संस्कार तपासून त्यातील चुकीच्या गोष्टी घालवणे ही किचकट प्रक्रीया असते आणि तज्ञांच्या सहाय्याने केली तर व्यवस्थित प्रभाव होण्याची शक्यता जास्त असते.

बोलण्याच्या कलेचे दुसरे अत्यंत महत्वाचे रहस्य म्हणजे आपल्या ऐकण्याच्या चुकीच्या संस्कारातून जन्मलेल्या चुकीच्या सवयी. आता विषय बोलण्यातून ऐकण्यात कसा बदलला याविषयी थोडे आश्चर्य निश्चित वाटले असेल. पण, संवादाची प्रक्रीया म्हणजे फक्त बोलणे नसून त्यामध्ये ऐकण्याचा अंतर्भावसुद्धा आहे, हे आपण सर्वजण जाणतो. जोपर्यंत ऐकणे आणि बोलणे हा प्रकार एकत्रित होत नाही तोपर्यंत कोणताही विचार एकमेकांपर्यंत पोचत नसतो. आपल्या ऐकण्याच्या सवयी नक्की काय आहेत आणि त्याचा बोलण्याच्या कलेवर कसा परीणाम झाला आहे हे कसे जाणून घ्यायचे?

उत्तर अगदी सोप आहे! अगदी लहानपणापासून कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं ऐकायचं नाही याचंही ‘संस्कार’ या नावाखाली काहीतरी चुकीचं शिक्षण मुलांना दिले जाते. यामध्ये शिक्षक, बाबा-महाराज, मोठे-मोठे साहेब लोक, नेते मंडळी, शिकले-सवरलेले लोक वगेरे-वगेरे मंडळींचे कान टवकारून, भयंकर लक्ष देवून ऐकायचे आणि ज्ञान घ्यायचे, शिकायचे, असे मानसिक शिक्षण मिळते. यामध्ये नुकसान इतकेच की आपण आपल्या मेंदूला काही व्यक्ती विशेष असतात आणि अश्या व्यक्तींचे बोलणे अनावश्यक पद्धतीने न तपासता ऐकून त्याचे कौतुक करणे याला सामाजिक मार्क्स आहेत, असे प्रशिक्षण देतो. आपणही हे आपसूक करायला लागतो आणि या अनैसर्गिक प्रक्रियेमध्ये आपले स्वतःचे बोलण्याचे कौशल्य चुकीचे आहे किंवा कमकुवत आहे, आणि त्यात खूप सुधार आवश्यक आहे, अशी मानसिक समजूत तयार करतो. सगळ्यात दुर्दैवी म्हणजे आपण तथाकथित पदावर असणाऱ्या, तथाकथित विशिष्ट जातीतून येणाऱ्या लोकांना ज्ञानी आणि पावरफुल बोलण्याची कला असणारे लोक समजायला लागतो. मेंदू गहाण ठेवून बालकासमान श्रद्धेपोटी चुकीच्या लोकांचे चुकीचे विचारसुद्धा आदरपूर्वक ऐकून घेतो आणि रोजच्या आचरणात सुद्धा आणतो. आपले ऐकण्याचे आणि अनैसर्गिक पद्धतीने आदर देण्याचे संस्कार आपल्याला बोलण्याच्या कलेविषयी चुकीच्या पद्धतीने घडवतात. यामुळेच आपल्या ज्ञानाच्या कक्षा संकुचित होतात. पारावर बसलेल्या म्हाताऱ्याची कथा आणि त्याचा अनुभव आपल्या कमी वाटायला लागतो, घरातली ग्रामीण ज्येष्ठ व अनुभवी माणसे बिनकामाची वाटतात आणि पोपटासारखे सुटा-बुटात हिंडणारे चाकर आणि कुणाचेही झेंडे वाटेल तसे खांद्यावर घेऊन नाचणारे लोक आपल्याला ‘सुधारीत’ वाटायला लागतात. आपण त्यांच्या बोलण्याच्या कलेमध्ये रस घेऊ लागतो आणि आपल्या ‘वाणी’वर चुकीचे संस्कार करून भाषणाचे उत्स्फूर्त कौशल्य मारून टाकतो. यामध्ये शिकणे बाजूला राहते आणि स्वतःतील कमीपणाची भावना खत-पाणी घेऊन वाढवण्याचे संस्कार जास्त होत जातात. कुणाचही ऐकून कुणासारखतरी बोलण्याने वक्ता भरकटतो आणि स्वतःची मुळे जमिनीतून उपटून कुणीही उचलून कुठेही ठेवावी असे कुंडीतले रोपटे बनतो. ऐकण्याच्या चुकीच्या कलेमुळे आपली बोलण्याची कला मागास राहते ती अशी. आपल्या आजपर्यंतच्या बोलण्याच्या प्रवासात असे काहीतरी निश्चित घडत आले आहे का किंवा अजूनही घडत आहे का, हे तपासून घ्या आणि पटकन दुरुस्त करा. प्रभावी वक्ते स्वतःचे विचार मांडत असतात. दुसऱ्यांचे ऐकून किंवा नक्कल करून बोलले तर त्याला मिमिक्री किंवा नकलाकार म्हणतात, भाषणकर्ता नव्हे.

स्वतःच्या भाषेत स्वतःच्या मूळ घराण्यातील, समाजातील पद्धतीने बोलता येणे हे ‘अस्सल’ असण्याचे लक्षण आहे. आपण जर बोलण्याच्या कलेमध्ये इच्छूक असाल तर कुणाचेही ऐकण्याची आणि वाहवा करण्याची आंधळी पद्धत बंद करा. मग आपले बोलणे किती प्रभावी आहे हे स्वतःला ठळकपणे समजायला लागेल.

बोलण्याच्या कलेतले शेवटचे आणि अत्यंत महत्वाचे रहस्य म्हणजे आपली भाषा. होय, आपल्या मूळ भाषेवरील अत्याचारामुळे आपली बोलण्याची कला हरवते. इतकंच नव्हे तर आपली तार्कीक विचार करण्याची मेंदूची सवय सुद्धा इतरांच्या भाषेच्या प्रभावाखाली नाहीशी होते. हे कसं होत ते समजून घेऊया.

मुलं आपल्या मातृभाषेत वेगात शिकतात आणि त्याच भाषेमध्ये त्यांच्या सगळ्या प्रकारच्या भावना व विचार व्यक्त करू शकतात. हे वास्तव आता अगदी वैज्ञानिक पद्धतीने समोर आले आहे, संशोधकांनी-शिक्षकांनी सुद्धा ते मान्य केले आहे. यामध्ये इंग्लीश किंवा इतर प्रादेशिक भाषा शिकू नये, असे अजिबात म्हणायचे नाही. मुलांच्या हायस्कूल पर्यंतच्या शिक्षणामध्ये जास्तीतजास्त भाषा शिकून घ्याव्यात, इतर भाषातील साहित्य वाचावे, त्या-त्या देशातील व्यक्तीशी संवाद साधावा व अगदी खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ बनावे. परंतु, आपल्या मूळ भाषेला हरवून किंवा कचऱ्यात टाकून नव्हे!

जागतिक पातळीवरील सगळ्या प्रबळ जमाती आणि देश आप-आपल्या मातृभाषा वापरतात आणि उगीच इंग्रजीच्या मागे धावत नसतात. जपान आणि चीन कडे बघितले की ही गोष्ट लगेच समजेल. अजूनही भाषा आणि बोलण्याच्या कलेचा संबंध समजला नाही ना? सोपं करून समजून घेऊया.

आपण जेव्हा आपली भाषा सोडून इतरांची भाषा वापरायला लागतो तेव्हा आपण त्या भाषेच्या शब्दरचनेमध्ये विचार करायला लागतो. इतर भाषा या त्या-त्या जातींच्या, वंशांच्या, मूळ भौगोलिक प्रदेशात तयार झालेल्या, असतात. त्यामध्ये त्या-त्या गटांच्या भावनांचे, जाणिवांचे प्रतिबिंब असते. ते आपल्या गटाच्या जाणीवेसोबत जुळतेच असे नाही. जेव्हा आपण आपल्या भाषा बदलतो तेव्हा आपल्या नैसर्गिक विचारशक्तीवर मर्यादा येतात आणि त्यामुळे बोलण्यावरसुद्धा मर्यादा येतात. बोलण्याची कला मग विचारांपासून आणि भावनांपासून दूर जाते. यासाठीच भाषेचे सामाजिक आणि मानसिक विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे.

लिहित असताना कधीतरी आपल्या मूळ भाषेमध्ये लिहायचा प्रयत्न करा म्हणजे सगळे विचार किती व्यवस्थित आणि मुद्देसूद पद्धतीने बाहेर येतात ते स्वतः पहायला मिळेल. आपल्या देशी भावना उगाच परदेशी किंवा परदेशातून आलेल्या लोकांच्या भाषेत व्यक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहिल्यामुळे बोलण्याची कला विकसित झाली नसेल तर त्याला जबाबदार फक्त तुम्ही स्वतः असता. आता लक्षात आले असेलच की सगळ्या राज्य करणाऱ्या जाती-जमाती तुम्हाला तुमच्या भाषेपासून का दूर नेतात आणि कश्या अपंग बनवतात.

मुख्य मुद्दा हाच की बोलण्याची कला आपण आपल्या भाषेत शोधा. आपले अस्सल आणि या मातीतले मऱ्हाठी बोला म्हणजे नैसर्गिक संवाद साधता येतो. शहरी लोकांची मऱ्हाठी अत्यंत सुमार दर्जाची आणि मूळ नसलेल्या झाडासारखी असते. मध्यमवर्गीय शहरी मराठी ‘शुध्द’ समजून बोलणारे लोक शब्द शोधत आणि वाक्ये रचण्यात संवादामाधला नैसर्गिकपणा विसरून जातात. आणि त्यांची कसरत पाहून शहरी लोक आनंद घेतात, या प्रकाराला अलीकडे टीवीवर ‘विनोद’ म्हणून प्रतिष्ठा देण्यात आली आहे. 

बोलण्याच्या कलेच्या निमित्ताने इतकाच तथ्य समजा की लोकांना स्वतःच्या आईला विकायला लावणारी माणसे जगात आजूबाजूलाच असतात आणि त्यांना आपण मानाच्या जागेवर बसवत आलो असण्याची जास्त शक्यता आहे. यामागे आपल्या भाषिक गुलामीची मोठी भूमिका आहे. आधी भाषा जाते आणि मग स्वातंत्र्य जाते, असे म्हणतात त्यात किती तथ्य आहे ते बोलण्याची कला शिकणाऱ्यानी स्वतः तपासून जाणून घ्यावे.

प्रत्येक व्यक्ती बोलण्याच्या, नैसर्गिक पद्धतीने विचार मांडण्याच्या आणि संवाद साधण्याच्या प्रक्रिया जाणणारा असतो. आपली बोलण्याची कला हरवते ती चुकीच्या मानसिक आणि सामाजिक संस्कारांमुळे आणि व्यवस्थेमुळे. त्यामुळेच वेगवेगळे चुकीचे संस्कार शोधणे आणि त्याना घालवून आपल्या बोलण्याच्या नैसर्गिक शक्तीचे संस्कार पुन्हा तयार करणे, हेच आहे बोलण्याच्या कलेचे खरे रहस्य. आपल्या अनुभवावर आधारीत विचार आपल्या अस्सल भाषेत अगदी सहजपणे व्यक्त करून संवाद साधला गेला तर त्याचे मानसिक समाधान आणि प्रभावीपणा इतर कोणत्याही आनंदापेक्षा जास्त असतो. हे सगळं स्वतः करून बघितल्यानंतर समजते आणि कळते. आपल्याकडे ‘अनुभव हाच गुरु’ असं म्हणतातच की, नाही का?  मग लागा कामाला !


बोलण्याच्या कलेची काही नैसर्गिक रहस्ये

by डॉ. गोविंद धस्के वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
स्वतंत्र लिंगायत धर्म आंदोलनास रासप, बामसेफ, बहुजन मुक्ती पार्टी व मराठा सेवा संघाचा सक्रीय पाठींबा

कडेगाव: स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी घटनात्मक असून सरकारकडे लिंगायत धर्मावर झालेल्या अन्यायाला दुरुस्त करण्याची शेवटची संधी असल्याचे सांगत राष्ट्रीय समाज

Close