स्वतंत्र लिंगायत धर्म आंदोलनाची ललकार पश्चिम महाराष्ट्रात: सांगली येथे महामोर्चा संपन्न0 मिनिटे
सांगली: स्वतंत्र लिंगायत धर्मास घटनात्मक मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या मागणीसाठी आज सांगली येथे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना, आंध्रप्रदेश येथून जमलेल्या हजारो लिंगायत धर्मियांनी महामोर्चा काढला.
अत्यंत मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातून लिंगायत धर्मीय येथे उपस्थित झाले होते. कुमारी कृतिका पाटील नांदेड या तरुणीच्या स्फूर्तीदायक भाषणाने जणू लिंगायत धर्म चळवळीचा ललकार अवघ्या वातावरणात भरून टाकला. जागोजागी मोर्च्याचे साहित्य व पाणी घेऊन तरुण शरण शरणी मोर्चेकरी मंडळीना सहकार्य करत होते.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा संपन्न झाला. मोर्च्यानंतर पडलेल्या साहित्यास लिंगायत स्वयंसेवकांनी उचलून रस्ते पुनश्च स्वच्छ केले.
लिंगायत स्त्रिया विशेषतः तरुण वर्गातील महिलांचा मोठा सहभाग हे आजच्या मोर्च्याचे वैशिष्ट्य ठरले.
कर्नाटक व महाराष्ट्रात गेली कित्येक महिने लिंगायत धर्मियांचे शांततापूर्ण मोर्चे सुरु आहेत. यामध्ये वेगवेगळे लिंगायत मठ, धर्मगुरू तसेच विविध संघटना सामील आहेत.
काही आठवड्यापूर्वी लातुर येथे झालेल्या मोर्चास ५ लाख पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मोर्चे सुरूच राहतील असे आज आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
येत्या काही आठवड्यात कोल्हापूर व सातारा इथे भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आज बोलले जात होते. बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी जरी पाठींबा दिला असला तरी सरकार नक्की काय भूमिका घेते याविषयी तमाम लिंगायत धर्मियांना उत्सुकता आहे.
कडेगाव तालुक्यातून बसव ब्रिगेड तर्फे तब्बल ५ वाहने सांगलीसाठी सोडण्यात आली होती, अशी माहिती तालुका प्रमुख संदीप माळी यांनी दिली.