‘जागृती यात्रा’: सुरवातीची सुरवात सुरु…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

जागृती यात्रेच्या तयारीसाठी अनेक प्रकारचे नियोजन केले जाते. या यात्रेसाठी माझी एक ‘यात्रेकरू’ म्हणून निवड झाली असली तरी माझा शेती व सामाजिक क्षेत्रातील अनुभव आणि प्रशिक्षण देण्यामधील कौशल्ये पाहून मला या यात्रेमध्ये ‘फॅसिलिटेटर’ चा कार्यभार देण्यात आला आहे. आजच्या तयारी सत्रामध्ये  फॅसिलिटेटर लोकांची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेविषयी मला खूपच जास्त उत्सुकता होती. माझ्यासारखे अनेक ध्येयवेडे तरुण तरुणी आणि त्यांचे अनुभव, इतरांना मदत करण्याची स्टाईल याविषयी माझ्या मनात भयंकर कुतूहल होते. या उत्सुकतेमुळेच की काय मला आदल्या दिवशी रात्रभर बराच वेळ झोप लागली नाही.

मुंबईत रविंद्र नाटय मंदिरला या कार्यशाळेसाठी जमायचं  होतं.

माझं दैनिक प्रकरण उरकून मी जेव्हा रजिस्ट्रेशन लॉबी मध्ये आलो आणि पहिले तर माझ्या आधीच  पन्नासेक फॅसिलिटेटर पोहचले होते. माझ्या उत्साहाच्या घराण्यातले आजी-आजोबा टाईपचा तुफान उत्साह असणारी काही मंडळी अगदी येरवाळीच पोचली होती.

या सगळ्या अनोळखी मंडळींच्या वर्षोनुवर्षे ओळख असल्यासारख्या गप्पा चालल्या होत्या. तसं पाहिलं तर काम आणि दांडगा उत्साह याने सगळेजण अगदी जन्मापासून कनेकटेड अस म्हटल तर चुकीचे नाही.

मी सुद्धा रजिस्ट्रेशन झाल्यावर भाया मागं सारल्या आणि सामील झालो त्या बुद्धिजीवींच्या गोतावळ्यात… मी पण बुद्धीजीवी …!!!

या चर्चांमध्ये अर्ध अधिक तरी माझ्या डोक्यावरून चाललं होतं…म्हणजे, ‘ही मंडळी इतकी हुशार कशी’, ‘नक्की हे कुठून परग्रहावरून तर आले नाहीत ना’ आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘या जगात आशा सर्व गोष्टी आहेत ही मंडळी ते निर्माण करतायत आणि अक्षरशः जगतायत हे अजून आपल्याला कसं माहीत नाही’, असे पन्नास प्रश्न मेंदुभोवती रिंगण धरून नाचत होते. ग्रामीण असणे आणि शेती क्षेत्रात कार्यरत असणे यामध्ये सध्याच्या व्यवस्थेत आपल्याला बरच दुर्लक्षित ठेवलेलं आहे, असे सतत वाटत असते. मी फारसा अपवाद नाही.

थोड्याच वेळात प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला. जागृती यात्रा ची पुर्ण टीम वर होती. स्वागताचे सोपस्कार पार पडल्यावर ओळख परेडची वेळ आली.

इथं  आधीच्या प्रकारापेक्षा जास्त मजा आली. एकेक अवलिया समजून घेणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. ओळखी साठी 30 मिनिटे नियोजीत केली असतांना ती 1.30 ते 2 तास चालली…बरं या मंडळींचा इतर फाफट पसारा काही न्हवता, ते फक्त त्यांनी केलेली काम आणि आता काय करतायत एवढंच सांगत होते. एवढी विविधता, प्रचंड प्रज्ञा, ऊर्जा, मग आम्ही काय मागे राहणार …आम्हीही आमची गावसे ओळख करून दिली.

मुळ  कार्यक्रम सुरू झाला.

शशांक सरांचा मनोगत, जागृती यात्रा टीम ची ओळख, आतापर्यंतच्या कामाचं स्वरूप. सगळ्यात महत्वाचे म्हणजे उद्योग प्रणित भारताचं निर्माण.

त्यासाठी तरुण देश म्हणून आपल्या पिढीकडे असणारी पुढची पंधरा वर्षे ह्या सर्व गोष्टी उलगडला जात होत्या.

हे सर्व प्रेरित करणारं होतं.

फॅसिलिटेटर म्हणून आमची काय काम आहेत, हे अगदी ईसकाटून सांगण्यात आले.

12 हजार अर्जामधून निवडलेल्या 450 मुलांचे-मुलींचे ग्रुप कसे आणि कोणत्या आधारावर केले आहेत, त्यातला एक ग्रुपला तुम्ही कसं सांभाळायचं, हे करताना त्यांचा उपजत कला गुणांना कसा वाव देता येईल, अश्या सर्व गोष्टी ‘जागृती यात्रा’ मॉडेलचा भाग म्हणून जाणीवपूर्वक सांगण्यात आल्या.   15 दिवस हा तसा बघितला खुप मोठा काळ या दरम्यान घरापासून दूर आलेल्या या मंडळींना होमसिक वाटू नये ही पण मोठी जाबाबदारी.

विनिता विश्वनाथन यांच्या मार्गदर्शनानंतर कर्नल भाया यांनी चार्जे घेतला. कर्नल साहेब म्हणजे या पूर्ण ट्रेन चे इनचार्ज.

त्यांनी सुरवातच आपल्या भारदस्त आवाजात आणि एक भारी वाक्याने केली “On train my word is law” बाकी आम्ही समजून गेलो.

पण या करड्या शिस्तीची खरच आवश्यकता आहे असंही वाटून गेले या फुल चार्ज यंग आर्मी ला घेऊन यात्रा पूर्ण करण्यासाठी.

कार्यक्रमच्या शेवटाकडे जाताना स्वप्नील साहेबांची ओळख करून देण्यात आली. खास या कार्यक्रमाला तो बंगलोर वरून आला होता. जागृती यात्रेचा फाऊंडर टीम मेम्बर आणि पहिला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर.

प्रचंड प्रतिभावान असून पाय जमिनीवर असणं म्हणजे काय याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वप्नील.

तो भरभरून बोलत होता… एका शटरच्या गाळ्यातून या सर्वांची सुरवात कशी झाली मग टाटांनी याला कसा सपोर्ट केला, त्यासाठी किती कष्ट उपसावे लागले, सुरवातीच्या यात्रा किती अनिश्चिततेंमध्ये झाल्या, या सगळ्याचे फोटो पाहून आम्हाला त्यांनी केलेल्या मेहनतीची कल्पना येत होती.

आणि या सर्वाचा भाग होण्याची संधी आपल्याला मिळतेय म्हणून ” लय भारी”  असं काहीतरी वाटतंय आतुन.

उद्या भेटूच बाकी यात्रीं बरोबर…

क्रमशः

7 thoughts on “‘जागृती यात्रा’: सुरवातीची सुरवात सुरु…!!!

Comments are closed.

‘जागृती यात्रा’: सुरवातीची सुरवात सुरु…!!!

by Ashish Bhosale वाचनाचा वेळ: <1 min
7
Read previous post:
एका प्रवासाचं स्वप्न: जागृती यात्रा

शशांक मणि त्रिपाठी या तरुणानही असंच एक स्वप्न पाहिलं उद्योजकतेतून भारत घडवण्याचं…आणि साकारली चैतन्याने भारलेली ‘जागृती यात्रा’. काय आहे जागृती

Close