राजकीय नीतिमत्तेचा सामाजिक आदर्श हरवला: साहेबांच्या जाण्याने ‘सोनहीरा’ पोरका झाला !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

जागतिक प्रवाहाच्या कलाने काहीतरी किरकोळ सुधारणा करून त्याचे भरमसाठ मार्केटिंग करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या व खाजगी उद्योजकांच्या काळात आपल्या निष्ठामय व प्रामाणिक नैतिक चौकटीला मजबूत करत विकासाचा अतुलनीय आदर्श निर्माण करणारे सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. पतंगराव कदम ! आजारासोबतची कैक आठवड्यांची शर्थीची झुंज, कुटुंबियांकडून केले गेलेले अमर्याद प्रयत्न, कृतज्ञ जनता व चाहत्यांनी केलेल्या प्रार्थना या सर्वाना बगल देत अखेर ‘सोनहिऱ्याचा विकासमहर्षी’ आपल्यातून निघून गेला. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि जागतिक पातळीवर जनतेने बहाल केलेली ‘साहेब’ ही उपाधी अखेरपर्यंत असणारे डॉ. कदम गोरगरीब जनतेसाठी व विकासोन्मुख समाजासाठी खूप मोठे योगदान देवून अनंतात विलीन झाले आहेत.

अगदी लहानपणापासून परीस्थितीशी लढवय्या सिंहासारखी झुंज देत त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केलेच पण ‘भारती विद्यापीठ’ सारखी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, पारंपारिक व्यवसाय करणारे हिंदू-मुस्लीम-लिंगायत धर्मीय, महिला, आणि शहरी विकासापासून सर्वदूर असलेल्या ग्रामीण जनतेला उच्चशिक्षणाची कवाडे उघडून देणारी संस्था उभारली. विकासाचे राजकारण करणारे रोज उठून प्रगतीची नवी स्वप्ने दाखवून दिशाभूल करत असताना साहेब क्षणभराचीही उसंत न घेता पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक, शिक्षक अश्या अनेक प्रतिष्ठित ठिकाणी पोचवत राहिले. साहेबांचे शैक्षणिक योगदान अतुलनीय ठरते ते फक्त त्याच्या भव्यतेमुळे नव्हे तर त्यामागची विकासाची दृष्टी, मूल्यात्मक मार्ग, स्वतः ज्या परिस्थितीमधून वर आलो तश्या प्रकारच्या धडपड्या कुटुंबाना आधार देण्याची तळमळ, आणि स्वतःच्या उच्चशिक्षणाचा संस्थात्मक उभारणीसाठी चातुर्याने केलेला वापर.

ग्रामीण शिक्षण विशेषतः स्त्री-शिक्षण आणि त्याची स्थिती साहेबांनी स्वतःच्या पीएचडीच्या माध्यमातून संशोधित पद्धतीने तपासली होती. त्या सखोल अभ्यासाचे प्रतिबिंब भारती विद्यापीठाच्या कार्यशैलीत तर आढळतेच पण शिक्षणमंत्री या पदावरून त्यांनी केलेले मूलगामी बदल सुद्धा साहेबांची संशोधनात्मक आणि अभ्यासू पद्धतीने विकास प्रश्न हाताळण्याची हातोटी दर्शवतात. ग्रामीण महिलांना शिकवण्याचा इतका मोठा प्रयत्न साहेबांनी यशस्वीपणे केला. भारतातच नव्हे तर जगातसुद्धा स्वतः अभ्यास करून पीएचडी मिळवलेले फार कमी लोक राजकीय वर्तुळात आहेत. साहेब जागतिक पातळीवर सुशिक्षित व्यक्तींनी केलेल्या राजकीय सुधारणा प्रक्रियेमध्ये निश्चितच अव्वल स्थानी आहेत. किंबहुना, सांगली जिल्हाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला आदर्शवत असे सुशिक्षित राजकारण साहेबांनी थियरी मध्ये न ठेवता धोरण प्रक्रियेमध्ये आवश्यक ते बदल करून सिद्ध करून दाखवले. हे सगळे करायला अपरिमित कष्ट, ध्यास, आणि आलेल्या प्रत्येक संकटावर मात करण्याची लढवय्या वृत्ती लागते. साहेबांच्याकडे हे सगळे विकासाचे रसायन ओतप्रोत भरले होते आणि त्यामुळेच साहेब कर्ममहर्षी व कर्तुत्ववान व्यक्तिमत्व  ठरलेच पण भागातील सर्व शिकणाऱ्या व्यक्तींसाठी एक ‘रोल मॉडेल’ आणि ‘अभिमान वाटावा असे प्रेरणास्रोत’ ठरले. मला अजूनही आठवते माझ्या पीएचडीच्या सुरवातीच्या काळात भारतातील राजकारणाविषयी अनभिज्ञ असलेल्या व चुकीच्या संकल्पना बाळगणाऱ्या माझ्या अमेरिकन व युरोपीय मित्रांना मी साहेबांच्या पीएचडीचे व त्यांच्या राजकीय व सामाजिक योगदानाचे उदाहरण देवून चकित करत असे. यामुळेच माझ्या आयुष्यभर साहेब हे मोठे प्रेरणास्रोत आहेत व राहतील.

आयुष्यभर साहेबांनी एक विशिष्ट पद्धतीचे नाते भागातल्या विकासोन्मुख तरुणाई सोबत तयार केले होते. ती खुबी त्यांच्या कार्यशैलीमध्ये होती. त्यामुळेच इथला अल्पभूधारक शेतकरी आणि त्यांची मुलेबाळे, तुटपुंज्या कमाईवर जीवन जगणारे ग्रामीण व्यावसायिक आपल्या मुलांनी शिकून नोकरी करावी, असे प्रत्यक्षात खरे होणारे स्वप्न पाहू शकले.

साहेबांचे विकासधोरण, नियोजन, व कृतिकार्यक्रम अत्यंत सखोलपणे अभ्यासण्यासारखे आहेत. एका बाजूला आर आर आबा यांचे स्वच्छता व तंटामुक्ती विषयक धोरण आणि दुसऱ्या बाजूला साहेबांचे सर्वांगीण विकासाचे मुल्यवादी धोरण अश्या वातावरणात वाढलेल्या असंख्य पिढ्या भारताच्याच नव्हे तर जगाच्या विकासात योगदान करत आहेत आणि करत राहतील यात शंका नाही.

साहेबांची राजकारणातील एन्ट्री झाली तेव्हा अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा हरितक्रांतीचे एकमार्गी विकास धोरण राबवले जात होते व त्याच्या आजूबाजूला सर्व राजकारण चालत होते. शुगर लॉबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाला गरज होती आपली विकासदृष्टी नव्याने सुरचित करण्याची. पण तशी हिम्मत कोणीच करत नव्हते. कोणताही साधारण राजकारणी व्यक्ती मुख्यप्रवाहाच्या विरुद्ध जायची हिम्मत करत नाही. पण साहेब उच्चशिक्षित आणि अभ्यासू राजकारणी असल्यानेच त्यांनी बदलत्या काळाची पावले ओळखली आणि शेतकऱ्यांच्या-कारागीरांच्या घरी ज्ञानाचा दिवा लावला व प्रचंड रोजगार निर्मिती करून दाखवली.

अर्थशास्त्रीय भाषेत ज्याला ‘डायवरसीफिकेशन’ म्हटले जाते ते त्यांनी यशस्वीपणे करून दाखवले आहे. भागातील अनेक युवकांना हे समजून घ्यायला अजूनही अवघड वाटेल किंवा तश्या जाणीवा अजून विकसित झालेल्या नसाव्यात. पण, साहेबांनी अत्यंत कुशल पद्धतीने १०० टक्के शेतीवर अवलंबून असलेली लाखो कुटुंबे बदलत्या अर्थकारणात शिक्षण व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून समाविष्ट करून घेतली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास करणाऱ्या तथाकथित सामाजिक व अर्थशास्त्रीय शास्त्रज्ञानी साहेबांच्या पायाशी बसून ज्ञान घ्यावे एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहेबांनी शेती आधारित समाजाचे अर्थशास्त्र मजबूत केले आहे. शेतकऱ्यांची कुटुंबे लहरी हवामानाच्या भरोश्यावर वाऱ्यावर न सोडता घरटी एक-दोन लोकांना नोकरी-रोजगार उपलब्ध करून देणे हे दूरदृष्टीचे काम साहेबांनी मूर्त स्वरूपात आणले. महाराष्ट्रात शेतीप्रश्नावर फसवे राजकारण करणाऱ्या शहरी-मध्यमवर्गीय अडाणी राजकीय लोकांना हा एक मोठा धडा आहे. जगातल्या कोणीही सोनहिरा खोऱ्यात पायी फिरून लोकमानस जाणून घेतले तर त्यासारखी विकासाच्या ज्ञानार्जनाची दुसरी प्रक्रिया नाही.

साहेबांच्या धडाडीच्या विकासकामांचा भाग म्हणूनच इथले सामान्य नागरीक कामाचा योग्य मोबदला मिळवू लागले. दमदाटी करून आणि पदाचा दाब दाखवून फुकटात काम करून गोरगरिबांची लुट करणाऱ्या स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांची साहेबांनी कधीच गय केली नाही. असे वागणे एरवी ‘राजकीय रिस्क’ समजले जाऊ शकते पण साहेब कोणताही राजकीय विचार डोक्यात न ठेवता फक्त मूल्यवादी पद्धतीने काम करत, अगदी एखाद्या समाजाला वाहिलेल्या समाजसेवकासारखे ! साहेबांनी तयार केलेल्या विकासाच्या लाटेमुळे सुधरलेल्या व शिकू शकलेल्या कुटुंबामधील एक उच्चशिक्षित व्यक्ती म्हणून मी हे अत्यंत अभिमानाने आणि हृदयापासून सांगत आहे.

एका बाजूला श्रीमंत आणि प्रस्थापित राजकीय घराणी तर दुसऱ्या बाजूला अत्यंत मुरलेले डाव्या विचारसरणीचे राजकारणी अश्या आव्हानात्मक सामाजिक व राजकीय परिस्थितीमध्ये साहेबांनी राजकारणात पावले उचलली. एका बाजूला साहेबांची अपक्ष उमेदवार म्हणून जाहिरात आणि त्याच्या बाजूला दादा कोंडके यांच्या ‘ह्योच नवरा पायजे’ या पिक्चरच्या जाहिराती पाहिलेले अनेकजण आजही साहेबांच्या सुरवातीच्या राजकीय लढाईच्या आठवणी सांगतील. सुरवातीच्या अपयशाने डगमगून न जाता त्यांनी अत्यंत सचोटीने जनतेशी संवाद साधत व विकासाची भाषा बोलत अखेर स्वतःची सुज्ञ मतदारांची आघाडी तयार केलीच. यामुळे विधानसभेवर जास्तवेळा निवडून येण्याचे रेकॉर्ड ते करू शकले. भारतातल्या फार कमी भागात अशी स्वामिनिष्ठ मतदारांची साहेबांना सतत पाठींबा देणारी सुज्ञ बहुजन जनतेची आघाडी आढळेल. यामागे होते ते साहेबांचे निस्वार्थी प्रयत्न आणि वेळप्रसंगी धावून जाण्याची व मदत करण्याची वृत्ती.

विकासाच्या राजकारणात देशभरातच नव्हे तर जगभरात महाराष्ट्रीय विशेषतः दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे नाव घेतले जाते. त्या सर्वांमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व व कारकीर्दीमुळे अग्रणी आहेत ते डॉ. पतंगराव कदम. शिक्षण, शेती, शेतीआधारीत उद्योगधंदे, सहकारासोबातच अनेक खाजगी उद्योग, व्यवसाय, बँकां, पतसंस्था, सूतगिरणी, साखर कारखाने, बझार अशा अनेक क्षेत्रात लाखो युवकांना व महिलांना शिक्षण, कौशल्य विकास, तसेच रोजगार व नोकरी उपलब्ध करून देण्याचे पुण्यकार्य साहेबांनी आयुष्यभर केले. अगदी साठच्या दशकात त्यांनी सुरु केलेला विकासरथ एकहाती पुढे आणला. वेगवेगळ्या जागतिक बदलांना ओळखून जनतेच्या भल्यासाठी सगळ्या व्यवस्था त्यांनी भागात आणल्या. अत्यंत गरीब परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी आवश्यक असे पोषक वातावरण साहेबांनी तयार करून दिले. सत्ता असो अथवा नसो साहेबांनी जनतेला अगदी हवी ती मदत दिली आहे. हे सगळे सर्वांगीण विकासाचे काम करणे फक्त साहेबानांच जमू शकते. अशाच एका कृतज्ञ कुटुंबातील साहेबांना पुजणारा आणि ‘आमचा राजकीय प्रतिनिधीच पीएचडी आहे’ असं जगभर अभिमानाने सांगणारा मी साहेबांच्या जाण्याने नैतिक विकास विचार आणि मुल्यवादी राजकारणाचा प्रेरणास्रोत असणारा बाप मला एकटा सोडून गेल्यासारखा व्यथित झालो आहे.

लेखक: डॉ. गोविंद धस्के

©2018, सर्वाधिकार सुरक्षित

राजकीय नीतिमत्तेचा सामाजिक आदर्श हरवला: साहेबांच्या जाण्याने ‘सोनहीरा’ पोरका झाला !

by डॉ. गोविंद धस्के वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नेर्ली येथे २२ फेब्रुवारी रोजी स्वरांजली व पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन

नेर्ली: कालकथित भास्कर पूनाप्पा लोंढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त नेर्ली येथे स्वरांजली व पुरस्कार प्रदान सोहळा उद्या दि.२२ रोजी सायं. ६

Close