मुलांच्या करीयरची दिशा लवकर ठरवणे का आवश्यक आहे?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

एक काळ होता जेव्हा पालक मुलं जन्माला यायच्या आधीच ते काय बनणार हे ठरवायचे असत. भारतासारख्या जातीप्रधान कारागिरी व शेती ठरवण्यात आलेल्या देशात मुलांचे करीयर किंवा भविष्य हे सुद्धा बऱ्याचदा आधीच ठरत असे.

पण, आता काळ बदललाय… सध्याच्या काळात आधुनिक व शहरी भागात नोकरी करणे, या गोष्टीला जास्त प्रतिष्ठा देण्यात येते. आपल्याला आठवत असेल सामना मधल्या हिंदुराव धोंडे पाटलांचा डायलॉग ज्यात ते म्हणतात – गावातली मुलं पुण्यामुंबैला शिकायला जातात आणि तिकडेच नोकरी करत राहतात, त्यांच्या ज्ञानाचा खेड्याच्या विकासासाठी काहीच फायदा होत नाही ! यातील ग्रामीण विकासाचा मोठा प्रश्न सोडला तर शहरात नोकरी करणे आणि त्यासाठी आवश्यक ते शिक्षण घेणे, हा ट्रेंड आता बऱ्यापैकी रुजला आहे.

यामध्ये सध्या एक महत्वाचे आव्हान निमशहरी, ग्रामीण व खेड्यातून येणाऱ्या मुलांच्यासमोर आहे. ज्यांच्या पिढ्या शहरातच स्थायिक आहेत अशी लोकसंख्या आणि त्यातून येणारी तरुण, मुले-मुली यांना शहरी व्यवस्था खोलातून माहीत असतात त्यामुळे शिक्षण आणि त्यानंतर नोकरी (अगदी छोकरीसुद्धा !) पटकावणे यात ही लोकसंख्या आघाडीवर असते. गावाकडच्या मुलांना या शहरी मुलांच्या क्षमतांना तोंड देत सराव व अभ्यास करून, स्वतःचे व्यक्तीमत्व घडवून शहरातली जाड-जुड पगाराची नोकरी मिळवणे, हे नाही म्हटले तरी आव्हानात्मक असते. यामध्ये शहरी-ग्रामीण असा नकारात्मक भेद करावयाचा नसून काही स्वाभाविक गोष्टी आणि शहर-केंद्रित अर्थकारणाचा सर्व ग्रामीण जनतेवर झालेला एक परीणाम दाखवून द्यायचा आहे. या सर्व गोष्टीमुळे पालक व कुटुंबातील इतर सदस्य जितक्या लवकर मुला-मुलींच्या करीयरची दिशा ठरवतील आणि त्यापद्धतीने शिक्षण व सुविधा तसेच राहणीमान उपलब्ध करून देतील तेवढे ग्रामीण मुले यशस्वी होण्याची शक्यता वाढणार आहे.

शहरी मुलांचे बहुतेक पालक नोकरदार असतात आणि काहीसे शिकलेले सुद्धा असतात त्यामुळे मुलांच्या करीयर विषयक जाणीवा तयार झालेल्या असतात व त्यादृष्टीने आधीच नियोजन केले गेलेले असते. या ठिकाणी ग्रामीण उद्योजक, व्यावसायिक, कारागीर, शेतकरी, मजूर अश्या गटातील पालकांना थोडा अभ्यास करणे आवश्यक असते तेव्हाच मुलांचे चांगले करीयर घडवणे सोपे होते. अर्थात, व्यवस्थित शिक्षण व नोकरीची दिशा ठरवण्यासाठी तज्ञ समुपदेशकाचे मार्गदर्शन घेणे हाही मार्ग सध्या उपलब्ध आहे व त्याचाही बराच फायदा होतो. त्यासाठी थोडी फी मोजावी लागते पण एकाच ठिकाणी सर्व माहिती व निर्णय प्रक्रियेला मदत या दोन कुठेही न मिळणाऱ्या गोष्टी समुपदेशक उपलब्ध करून देत असतो. एकमेकांचे बघून करीयरची वाट लागून पुन्हा घरी येवून शेत विकून, फंडाचे पैसे घालवून भांडवली धंदे करणारांची संख्या तशी कमी नाही. कोणत्याही पालकाला स्वतःचा मुलगा-मुलगी अश्या पद्धतीने जीवनात अयशस्वी झालेला बघवत नाही आणि तशी इच्छाही नसते.

अचूकपणे करीयर ठरवण्यासाठी काही महत्वपूर्ण नियम जाणून घेतल्यास नियोजन करणे मुलांना व पालकांना सोपे जाते, असा अनुभव आहे.  

१) चांगला मार्गदर्शक स्वतः निवडा

 स्थिरस्थावर झालेल्या लोकांनी समोर येवून मार्ग दाखवण्याची वाट बघणारे हताश पालक व मुले पहिले की त्यांच्या दुर्दैवी अवस्थेची कीव करावी वाटते. कोणीही समोर येवून चार उपयोगाचे शब्द सांगावे अशी अट्टल देशी संस्कृती आता हरवली आहे. त्यामुळे स्वतः विचारपूर्वक मुलांच्या करीयरसाठी मार्गदर्शक व्यक्ती निवडणे खूप आवश्यक आहे. यासाठी, आपल्या परिसरातील व पाहुणे यामधील शिकून नोकरी करत असलेल्या किंवा उद्योग-व्यवसायात स्थिर झालेल्या सुजाण व्यक्ती यांच्यापासून सुरवात करणे हा सोपा मार्ग आहे. त्याचबरोबर, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षक, शाळेत उपलब्ध असल्यास करीयर  मार्गदर्शक आदी काहीतरी चांगला सल्ला देण्याची शक्यता जास्त असते. सगळ्यात सोपा व अचूक म्हणजे काही पैसे घालवून चांगल्या करीयर मार्गदर्शन तज्ञांकडे सहकुटुंब भेट देणे.

२) माहिती घेण्याची संधी सोडू नका

करिअर संबंधी कार्यशाळा, माहितीसात्रे इत्यादीमध्ये स्वतः तसेच मुलांना भाग घ्यायला लावणे, हाही उत्तम उपाय आहे. बऱ्याचदा अश्या कार्यशाळा म्हणजे शाळाबाह्य उपक्रम समजून पालक व मुले टाळतात. यामुळे आयोजकांचे नुकसान न होता पालकांचे व मुलांचे अतोनात नुकसान होते. यासाठी आपल्या आजूबाजूला मुलांच्या भविष्यासाठी उपलब्ध माहिती देणारी केंद्रे, कार्यक्रम. व्यक्ती, उपक्रम असल्यास आपण जरूर फायदा घ्या. सध्याच्या माहितीच्या मायाजालाच्या युगात इंटरनेट, करियर मासिके, वृत्तपत्रे, टीवीवरील कार्यक्रम इत्यादी आवर्जून पहा. पुरेशी आवश्यक माहितीच्या नसल्याने करिअर निवडीमध्ये जास्त नुकसान होते, असा सर्वच पालकांचा व पाल्यांचा अनुभव आहे.

३) मुलांना स्वतःशी प्रमाणिक रहायला शिकवा

स्वतःच्या शारीरिक व बौद्धिक क्षमता, शिकण्याची व काम करण्याची तयारी, स्पर्धेत उतरण्याची तयारी, आवश्यक त्या प्रशिक्षणाची व अभ्यासाची तयारी, आर्थिक क्षमता इत्यादी गोष्टींचा पुरेपूर अभ्यास करूनच अचूक करीअर निवडणे शक्य होते. बऱ्याचदा इतर मुलांचे व पालकांचे बघून ईर्ष्येने किंवा अज्ञानाने मुले किंवा पालक किंवा बहुतेक वेळा मुले-पालक असे एकत्रपणे लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करतात. यात पैसा व वेळ वाया जातो आणि बऱ्याचवेळा मुलांना निराश करणारी घटना घडते ज्यामुळे बदली शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुले अजिबात प्रेरीत नसतात. एकूणच अश्या अप्रामाणिक वागण्यामुळे कुटुंबाचे मानसिक समाधान हरवून जाते. यासाठी, अगदी लहानपणापासून मुलांना स्वतःच्या क्षमतांमध्ये बसेल अश्याच गोष्टी करायला शिकवा, तश्या प्रकारची जाणीव मुलांमध्ये विकसित करा. वेळेत दिलेला हा संस्कार भविष्यातल्या मोठ्या समस्यांपासून आपल्याला, मुलांना आणि कुटुंबाला वाचवू शकतो.

४) मुलांना धाडसी बनवा

बरेच पालक मुलांना अनेक शाळाबाह्य उपक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करतात. काही आडमुठे पालक प्रसंगी रागावणे, मारहाण करणे, असले वाईट प्रकार करताना आढळतात. यामुळे मुलांमध्ये संकुचित मनोवृत्ती, अन्याय झाल्याची भावना वाढीस लागते. त्याचबरोबर, मुलांची स्वतःला घडवण्याची व संधी शोधण्याची वृत्ती कमी होते किंवा नाहीशी होते. ‘आमचा बाप आमच्यासाठी सगळे ठरवतो’ अशी कुत्सित वाक्ये अलीकडे सर्रास शाळा-कॉलेजात ऐकायला मिळतात. आपण अश्या गटात न मोडता मुलांना नेहमी नवनवीन कार्यक्रम, कॅम्पस, कार्यशाळा, माहितीसत्रे, कौशल्य विकास सत्रे, परीक्षा यामध्ये भाग घेण्यास सहकार्य करा. याचा निश्चित फायदा मुलांना व त्यांच्या कुटुंबाना होतोच असा अनुभव आहे.

५) फक्त शालेय प्रगतीवर अवलंबून राहू नका

बरेच पालक ‘मुले शाळेत चांगली मार्क्स मिळवत असतील तर मुलांचे भविष्य चांगले आहे’, असा विचार करून निश्चिंत होत असतात. शाळेतील गुण मिळवणे म्हणजे जगण्याच्या लढाईसाठी आवश्यक ते रसायन मुलांमध्ये तयार होणे, असा अजिबात अर्थ नाही. मुलांना घडवण्याची पहिली जबाबदारी दोन्ही पालकांची एकत्रितपणे असते. शिक्षकांकडून व शालेय संस्थांकडून अनावश्यक अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःच्या मुला-मुलीचे करिअर घडवण्यात धोका पत्करणे आहे. यासाठी, मुलांना अनावश्यक मोबाईल-टीवी सोडून खेळायला पाठवणे, नवीन गावे-शहरे दाखवणे, वेगवेगळे उद्योग-कारागिरी दाखवणे, किमान स्वतःच्या राज्यातील वेगवेगळ्या शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था दाखवणे इत्यादी खूप आवश्यक आहे. मुलांना सतत नवीन गोष्टी वाचायला देणे, कौशल्ये वाढतील अश्या पद्धतीने माहिती घेण्यास, लोकांना भेटण्यास व संवाद साधण्यास प्रवृत्त करणे, अश्या अनेक गोष्टी मुलांचा सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यायाने यशस्वी करियरसाठी आवश्यक असतात .

सर्व कुटुंबाने एकत्रित प्रयत्न केल्यास मुलांचे करियर यशस्वीपणे घडवता येवू शकते. प्रत्येकाची निर्णय घेण्याची प्रक्रीया ही काही नियमांवर सर्वस्वी अवलंबून नसते. आयुष्यातील मुले घडवण्याच्या प्रक्रीयेतील कडू-गोड अनुभवावर आधारीत निर्णयप्रक्रीया खूपच दूरगामी असते. यासाठी पालकांनी स्वतःचा जगण्याच्या लढाईचा अनुभव मुलांचे करीयर घडवताना वापरावा. सध्याच्या काळात शिक्षण हा काही लोकांचा धंदा झाला आहे, त्यामुळे चुकीच्या मार्केटिंगला बळी पडून आपले व मुलांचे नुकसान करून घेऊ नये.

आपल्याला मुलांचे करीयर आणि स्वतःचे म्हातारपण सुरक्षितपणे पार पडावे यासाठी हार्दिक शुभेच्छा !

©Dr. Govind Dhaske, selfhood, 2018

 

मुलांच्या करीयरची दिशा लवकर ठरवणे का आवश्यक आहे?

by डॉ. गोविंद धस्के वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आज ‘गुढी’ नाही: साहेबांना भागातून भावपूर्ण श्रद्धांजली

कडेगाव: कडेगाव-पलूसच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचे भाग्यविधाते डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी तसेच साहेबप्रेमी नागरीकांनी आज गुढीपाडवा साजरा

Close