उन्हाळी सुट्टीत नक्की काय केलं पाहिजे ?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

निमंत्रित लेख

उन्हाळी सुट्टी म्हणजे विद्यार्थी वर्गाला पर्वणी असते. अर्थात, काही शाखांच्या परीक्षा अगदी मे पर्यंत चालतात त्यामुळे पारंपारीक उन्हाळी सुट्टी तितकीशी मिळत नाही. कसेही असले तरी उन्हाळी सुट्टी हा बहुतेक विद्यार्थी वर्गाला हवीहवीशी वाटते यात तिळमात्र शंका नाही. परीक्षेचा ताण सोसून सुट्टीची वाट बघणारी शाळेची मुलं सुरवातीला अत्यंत सैराट मनाणे अगदी हवी तशी हुंदडतात पण थोड्या दिवसातच उन्हाचा कडाका वाढला की मैदानी खेळ काहीसे नियंत्रित होतात. त्यातून जागतिक तापमान वाढीमुळे सरासरी उष्मा सगळीकडेच वाढतोय. तब्बेतीची हानी होत असेल तर उन्हात खेळणे नकोच, असा बहुतेक ठिकाणी ट्रेंड आहे.  अशा परिस्थितीत नक्की कशाप्रकारे सुट्टी व्यतीत करावी, हा सध्या पालकांसमोर आणि शालेय मुलामुलींसमोर मोठा प्रश्न आहे.

यासाठी कडेगाव-पलूस लाईव न्यूज आपल्यासाठी सुचवत आहे काही उपयोगी सुट्टी घालवण्याचे उपाय.

अर्थात, शेवटी पालक आणि पाल्ये एकमताने जे ठरवतील तो अंतिम निर्णय असेल आणि असतो, हे इथे विसरायला नको.

१. निसर्ग समजून घेणे:

सुट्टी हा आपल्याला हव्या तश्या पद्धतीने निसर्ग समजून घेण्यास अत्यंत पोषक काल असतो. झाडे, आजूबाजूचे डोंगर-दऱ्या, ओढे-नद्या इत्यादी सृष्टी उन्हाळ्यामध्ये एका वेगळ्या रुपात पाहायला मिळते. मोकळ्या हवेत उन्ह वाढायच्या आत फिरणे अत्यंत आनंददायी आणि आरोग्यास उपकारक असते. सूर्यास्ताच्या थोडे आधी हवा थंड झाली आणि उन्ह खाली गेली की दिवसभरात घरी बसून अवघडलेल्या पायांना आराम देणे आवश्यक होऊन बसते.

यासाठी संध्याकाळी दूर चालत फिरायला जाणे, यासारखा आनंददायी व्यायाम नाही. रोज निसर्गाच्या  कला वेगळ्या- वेगळ्या ठिकाणाहून सूर्यास्त पहिला की हळूच लक्षात यायला लागतात. एकाच गावात असा विविध प्रकारे सूर्यास्त बघणे मुलांना निश्चितच खूप काही शिकवून जाऊ शकतो.

अर्थात, पालकांनी योग्य त्या सूचना देणे आणि घरच्यांना सांगून किंवा प्रसंगी घरातील ज्येष्ठ मंडळींसोबत बाहेर पडणे हे कधीही श्रेयस्कर असते.

 

२. आकाश निरीक्षण करणे:

सध्याच्या पिढ्या या प्रबळ दुरवस्थेत आहेत कारण आकाश समजावून सांगतील असे पालक राहिले नाहीत आणि ज्येष्ठ नागरीक सोबत राहत नाहीत. एकेकाळी उन्हाळी सुटीत शेतावर रात्री राहून आजोबा-काका यांच्यांकडून आकाशातील नक्षत्रे समजावून घेणे, हा अत्यंत विलोभनीय आनंद होता. असो.

उन्हाळ्यामध्ये रात्री बाहेर तितकासा गारवा किंवा थंडी नसते आणि आकाश शक्यतो निरभ्र असते. निसर्गाची ही अवस्था आकाश निरीक्षणास अत्यंत पोषक असते. आपल्या मुलांना अश्या वातावरणात आकाश निरीक्षणाची गोडी लागली तर त्याचा फायदा कल्पनाशक्ती वाढण्यास निश्चित होतो, असे बरेच तज्ञ सांगतात.

सोबतच, डोळ्यांचे आरोग्य सुधारते , असाही युक्तिवाद आहे. तेव्हा, या सुट्टीत मुलांना सोबत घेऊन आकाश निरीक्षण निश्चितच करा.

३. सिनेमा सिनेमा:

बाहेर जाणे नियंत्रित होते तेव्हा मनोरंजन करून घेण्यासाठी सिनेमा म्हणजे एक लागू पडणारे औषध आहे. अर्थात, आपल्या मुलांनी कोणते सिनेमे पाहावेत याविषयी पालकांची कशीही आणि कितीही मते असली तरी बाजारात जसे सिनेमे येतील त्यातलेच निवड करून बघावे लागतात अशी अवस्था आहे.

यावर एक चांगला उपाय म्हणजे इंटरनेटचा वापर करून चांगल्या डॉक्युमेंटरी, सिनेमे आणि इतर माहितीपर गोष्टी पाहणे. होय, युट्युब आणि इतर काही वेबसाईट च्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना जगातील विविध गोष्टी दाखवू शकता आणि स्वतःचेही ज्ञान वाढवू शकता.

यासाठी थोडी कौटुंबिक इच्छाशक्ती लागते हे मात्र तितकंच खरं!

४. पकवू नका पण पकवा जरुर:

मध्यमवर्गीय पालकांना मुलांना खूप शिकवून चांगल्या ठिकाणी नोकरी लागावी अशी इच्छा असते. त्यासाठी हवा तेवढा खर्च करायची तयारीही असते. जेव्हा मुले बाहेरगावी शिकायला जातात तेव्हा सामान्यतः दर दोन तीन महिन्याला मेस बदलत राहतात कारण विशिष्ट पद्धतीचे जेवण तितके आवडत नाही. अशावेळी जर स्वतःकडे पाक कलेचे कौशल्य असेल तर निश्चितच अत्यंत पौष्टिक आणि आवडीचे जेवण बाहेरगावी शिकणारी मुले स्वतःच्या अभ्यासाची वेळ सांभाळून तयार करू शकतात. यासाठी कुकिंग करण्याची गोडी बालवयात लागली तर त्याचा आयुष्यभर फायदा होतो.

यासाठी आपल्या परिसरातील पाकतज्ञ व्यक्ती आणि पदार्थ यांची यादी करून त्यांना गुरु बनवणे आणि शिकणे हा एक अविस्मरणीय सुट्टी अनुभव असू शकतो. हे शक्य न झाल्यास आपले स्वयंपाकघर आणि तिथे असणारी सर्व मंडळी यांच्या सहाय्याने थोडासा हात अजमावला तर काहीतरी किमान स्वयंपाक ज्ञान आणि कौशल्य येतेच.

५. पारंपारीक कारागिरी:

अलीकडच्या मोबाईल-कॉम्पुटर वापरणाऱ्या पिढ्या जेव्हा सखोल पारंपारीक ज्ञानाची वेळ येते तेव्हा खूपच कृत्रिम वाटतात. अश्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या लोकांविषयी जास्त चर्चा करण्यात हशील नाही. मुख्य मुद्दा हाच की पारंपारिक कला व कारागिरी माहित असणे, किमान तोंडओळख असणे, मुलांच्या ज्ञानात आणि विचारशक्तीमध्ये खूप भर टाकते.

आपल्या आजूबाजूला असे कारागीर असतील तर मुलांना तिकडे जरूर घेऊन जा.

 

वरील काही गोष्टींसोबतच मुलांना पारंपारिक खेळ, शेती, लोककला दाखवा. वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकवा. आजूबाजूची सरकारी कार्यालये, उत्पादक कंपन्या, निसर्गरम्य ठिकाणे, देशी औषध विकणारे दाखवा. द्राक्ष-आंब्याच्या बागेत न्या. आपणही आजूबाजूला पहिले तर आपल्यालाही अशा अनेक कल्पना सुचतील ज्यामुळे आपली मुले सुट्टीत खूप काही नवीन शिकतील आणि आपल्या पालकत्वाला धन्यवाद देतील.

मराठीत एक सुंदर म्हण आहे ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ आपल्या मुलांविषयी जगाने अशी म्हणायची वेळ येवू नये असे प्रत्येक पालकाला निश्चितच वाटते. यासाठी वेळी जागे होणे आणि कृती करणे हाच सर्वोत्तम उपाय.

उन्हाळी सुट्टीत नक्की काय केलं पाहिजे ?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
दलित संघटनांचा एससी-एसटी कायद्यामधील बदलांबाबत आज भारत बंद, उत्तरेत काही ठिकाणी हिंसा

कडेगाव: सुप्रीम कोर्टाने अलीकडेच एससी-एसटी कायद्यामध्ये केलेल्या बदलाचा निषेध म्हणून देशभर दलित संघटनांनी पुकारलेला आजचा बंद मोठ्या प्रमाणात सुरु असून

Close