पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणुकीचे बिगुल: कोणाचे पारडे जड ?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताचे  लक्ष लागून असलेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली जाण्याने पोटनिवडणूक होत आहे. निवडणूकीसाठी मतदान २८ मे रोजी होणार आहे तर ३१ मे ला मतमोजणी होणार आहे.

कॉंग्रेसकडून साहेबांचे चिरंजीव डॉ. विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, अजूनही इतर पक्षांनी आपले उमेदवार पुढे न आणल्याने नक्की लढाई कशी होणार याविषयी मतदारसंघात शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. बहुतेक सुज्ञ मतदारांची इच्छा होती की ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, परंतु तशी शक्यता अजून दिसत नाही.  ते कसेही असले तरी डॉ. विश्वजित कदम यांचे पारडे इतरांच्या तुलनेत निश्चितच जड राहणार आहे.  याला कारणेही तशाच पद्धतीची आहेत.

कदम घराण्याची विकास कामातली आघाडी, गेल्या चार दशकांपेक्षा जास्त सुरु असलेली डॉ. पतंगराव कदम यांची भागाच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासासाठी सुरु असलेली सर्वांगीण कामे, शैक्षणिक-औद्योगिक-आर्थिक-आरोग्य अश्या आघाड्यावर विविध संस्थांच्या माध्यमातून केले गेलेले काम, कमकुवतच नव्हे तर अगदी सक्षम मध्यमवर्गीय कुटुंबांच्या विकासासाठी साहेबांनी केलेली प्रचंड रोजगारनिर्मिती, या व अश्या अनेक घटकांमुळे  डॉ. विश्वजित कदम यांचे पारडे निश्चितच जड राहणार आहे यात शंका नाही.

विकासाचे राजकारण  करताना सोनहिरा खोऱ्यामध्ये एका विशिष्ट नैतिक आणि वैचारिक चौकटीत राहून काम करावे लागते, कारण इथली सजग जनता ज्या पद्धतीची मुल्ये बाळगते त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा खोटेपणा/वावगेपणा चालत नाही. डॉ. पतंगराव कदम यांनी विकासाची परंपरा तयार करताना विशिष्ट मूल्यांच्या चौकटीत राहूनच राजकारण केले. यामुळेच, सुज्ञ मतदार कधीच कॉंग्रेसपासून दूर गेलेला नाही किंबहुना तो वाढतच राहिला आहे. या सुज्ञ मतदारांच्या सहाय्याने डॉ. विश्वजित कदम इथून पुढे साहेबांचा विकासरथ आघाडीवर नेतील, असा विश्वास बहुसंख्य जनतेच्या मनात आहे.

कै. साहेबांची जनतेच्या मनातील प्रतिमा अत्यंत प्रखरपणे आणि धडाडीने काम करणारा आणि कधीही हक्काने मदत मागता येईल असा नेता, अशी राहिली. साहेब या प्रतिमेला आणि परंपरेला अखेरपर्यंत जगले. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक विकासकामांना खीळ बसली. विशेषतः शेतकऱ्यांच्या पाण्याचा व विजेचा प्रश्न तसेच दुष्काळी परीस्थितीचा प्रश्न साहेबांनी अत्यंत काळजीपूर्वक हाताळले होते आणि आवश्यक ती मदत वेळोवेळी उपलब्ध करून दिली होती. अगदी कॉंग्रेसची सत्ता गेली तरीही भागातील विकासरथ बंद होणे दूर पण अजिबात कमी गतीनेसुद्धा चालला नव्हता. अशी क्षमता फक्त साहेबांच्याकडे होती. या प्रगल्भ  वारश्यातून समोर आलेले आणि पलूस-कडेगावच्या मुशीत घडलेले डॉ. विश्वजित कदम यांनीही अत्यंत धडाक्याने विकासकामांना हात घालत साहेबांच्या परंपरेचे सच्चे पाईक म्हणून काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे. किंबहुना, गेल्या काही आठवड्यांपासून डॉ. विश्वजित कदम यांनी भागातल्या अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने विकासकामांना धडाक्यात सुरवात केली आहे. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. मतदारही या विकासकामांच्या सुरवातीमुळे समाधानी आहेत.

साहेबांसारखीच एकाचवेळी ग्रामीण शेतकरी-कष्टकरी आणि विकासोन्मुख सुशिक्षित मध्यमवर्गीय जनता यांच्या मनात ताकतीची प्रतिमा डॉ विश्वजित यांची आहे. याला कारण ते स्वतः उच्चशिक्षित आहेत आणि अगदी लहानपणापासून अत्यंत लक्षपूर्वक विकासकामे, समाजकारण, आणि राजकारण यात सक्रीय आहेत. पलूस-कडेगाव चा युवा मतदार असो किंवा ज्येष्ठ नागरीक किंवा महिला मतदार असोत, डॉ. विश्वजित यांनी आपल्या व्यक्तिमत्वाने जितका प्रभाव तयार केला आहे तितकाच प्रभाव त्यांच्या धडाडीच्या विकासकामाच्या हाताळणीने तयार होत आहे. भागाच्या विकासाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे आहे.

‘या पोटनिवडणुकीत नक्की काय होणार’ याविषयी सुरु असलेली चर्चा लवकरच इतर पक्षांचे उमेदवार जाहीर होतील तेव्हा आणखीच रंगेल. याला कारण दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जनतेकडे असलेले महाराष्ट्राच्या विकासाचे नेतृत्व आणि राजकीय आखाड्यामध्ये इथल्या जनतेला असलेला प्रचंड रस.  बदलत्या काळात याचा परीणाम सोशल मिडीयावर दिसू लागला आहे.

ही पोटनिवडणुक सुरु असताना कर्नाटकमध्ये  विधानसभेचे इलेक्शन सुरु आहे. तिथेही कॉंग्रेसचे पारडे जड आहे. मध्य आणि दक्षिण भारतात पुन्हा कॉंग्रेससाठी सकारात्मक वातावरण तयार होत आहे. अश्या वातावरणात होत असलेल्या या पोटनिवडणुकीत डॉ. विश्वजित यांचे पारडे निश्चितच जड आहे हे फक्त मतदारच नव्हे तर राजकीय विश्लेषक सुद्धा बोलत आहेत.

________________________________________________________________________________________

जाहिरात

पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणुकीचे बिगुल: कोणाचे पारडे जड ?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘विशेष दर्पण पुरस्कार’ संपत मोरे यांना जाहीर

कडेगाव: ख्यातनाम पत्रकार संपत मोरे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा विशेष दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा या पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी

Close