कडेगावमध्ये दारूबंदी का झाली नाही?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

गेले कित्येक आठवडे महिला व राजकीय-सामाजिक कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नानंतरही कडेगाव इथं चार प्रभागांमध्ये दारूबंदीला यश मिळाले नाही आणि बाटली उभीच राहिली. या पूर्वीच्या दारूबंदीच्या प्रयत्नात मतमोजणी व मतदानाच्या वेळा याबद्दल ग्रामस्थांची तक्रार होती त्यामुळे दारूबंदीसाठी हे नव्याने मतदान घेण्यात आले होते.
प्रत्येक प्रभागातून फक्त किमान ५०% महिलांनी जर आडव्या बाटलीला मतदान केले असते तर तिथली दारू विक्री बंद होणार, असे एकूण समीकरण होते. पण स्मार्ट कडेगावकर एवढे साधे गणित सोडवू शकले नाहीत. परिणामी, दारूबंदीसाठी पुढे आलेल्या महिलांना अत्यंत निराशा सहन करावी लागत आहे. नक्की काय झाले असावे ज्यामुळे दारूच्या त्रासाने त्रस्त असणाऱ्या महिलांना सोडवण्यासाठी सर्व महिला उत्स्फुर्तपणे समोर आल्या नाहीत ?
दारूबंदी ही अलीकडच्या काळात आव्हानात्मक झाली आहे. वाढता चंगळवाद, अनारोग्यापूर्ण कौटुंबिक संस्कृती, दारूला दिलेली प्रतिष्ठेची जागा, दारू पिणाऱ्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे मानसिक आरोग्य, दारू विक्री संबंधी शासनाचे धोरण या व अश्या अनेक कारणांनी दारूबंदी होणे, आव्हानात्मक ठरते. पण, कडेगावमध्ये हा दारूबंदीचा दुसरा प्रयत्न होता. नक्की काय घडले असावे ज्यामुळे कडेगावमध्ये दारूबंदी झाली नाही ?
कडेगाव हे तसे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी परंपरा असणारे गाव ! इथे असणारी गोविंदगिरी महाराज व भैरवनाथ यांची अध्यात्मिक परंपरा, सर्व धर्मीय ऐक्याचे प्रतीक असणारा मोहरम, आणि गावाच्या प्रत्येक दिशेला असणारे पीर आणि मंदिरे अशी रचना. दुसऱ्या बाजूला अत्यंत जुनी बाजारपेठ आणि इथले वेगवेगळ्या धर्माचे व्यापारी व उद्योजक. परंतु, यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि लोप पावत चाललेली गोष्ट म्हणजे कडेगावमधील सामाजिक जबाबदाऱ्या उचलणारे दक्ष नागरिक. अगदी काही दशकांपूर्वी कडेगावमध्ये भामटे घुसणे, चोर घुसणे, बनावटी सामान विकणे, सिद्ध नसलेली औषधे विकणे किंवा करणी, तंत्र-मंत्र व इतर तथाकथित दैवी गोष्टी वापरून गावकऱ्यांची लुट करणे इत्यादी कामे थोपवणारी आणि असे करणाऱ्या व्यक्तींना पळवून लावणारे तज्ञ लोक कडेगाव मध्ये होते. बुधवार पेठेतील जंगलू मास्तर ऊर्फ न्हावकर आबा, शुक्रवार पेठेतील रावळ काका, नागपूर परिसरातील रमल तज्ञ व स्वातंत्र्य सेनानी वसंत भस्मे (कॅप्टन) हे व यांच्या पिढीतून तयार झालेले इतर गावकरी गावामध्ये काहीही चुकीचे घुसू देत नव्हते आणि चालू देत नव्हते. यामुळे गाव आणि गावाची नैतिक चौकट भक्कम होती. अर्थात, हा काळ काही दशकांपूर्वीचा आहे. जवळपास याचवेळेस गावातील सगळ्या गोष्टी, समारंभ, व यात्रा या अत्यंत वरच्या दर्जाच्या सामाजिक आणि धार्मिक एकोप्याने होत असत आणि तितक्याच प्रेक्षणीयसुद्धा असत.
बदलत्या काळात, कडेगावला ही ज्ञानाची मोठी परंपरा आणि ते घडवणारी माणसे जपता आली नाहीत आणि नवी माणसे तयारही करता आली नाहीत. यामुळे गावामध्ये भलत्या-सलत्या गोष्टी व ते घडवणारे लोक वाढले. अर्थात, हे गावातल्या काही लोकांनी समर्थन दिल्याशिवाय होतच नाही. त्यातूनच गावात एकोपा नसल्याने आणि प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल करणारे राजकीय लोक तयार झाल्याने चुकीच्या गोष्टी घडत गेल्या. याचा परीणाम म्हणजे सध्या सुरु असलेले गाव बकाल आणि प्रदूषित करणारे शहरीकरण, मुलभूत सुविधांचा सर्वत्र अभाव, लोप पावत चाललेले सांस्कृतिक लोकोत्सव, आणि शहरी मध्यमवर्गासारखे स्वार्थी विचार आणि तसेच सार्वजनिक व्यवहार. ही यादी मोठी आहे आणि अजून वाढतच आहे. कोणाही तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणाऱ्या व्यक्तीला दारूबंदीवर चिंतन करताना गावाची आणि इथल्या मुल्यांची झालेली वाताहत हाच मूळ प्रश्न आणि कारण आहे हे जाणवेल.
दारूमुळे वाढणाऱ्या व्यसनाधीनतेचे प्रमाण कष्टकरी व मजूर गटामध्ये जास्त आहे. अर्थात, हे झाले स्वस्त देशी दारूविषयी. पण त्यापेक्षा महाग दारू आणि ब्रांड पिणारे सुशिक्षित लोकही त्याच संख्येने आढळतील. सामाजिक पातळीवर त्रास दिला नाही म्हणजे दारू पिणे ठीक आहे, असे स्वतःला समजावणारे महाभाग कमी नसतात. इथे मुख्य मुद्दा हाच आहे की, दारू पिणाऱ्यामध्ये गरीब-श्रीमंत असे दोन गट सर्वत्र आढळतात. मग दारूबंदी एक प्रकारचे गरीब-श्रीमंत युद्ध तयार करते. अश्यापद्धतीने अगदी प्रकट नाही पण किमान मानसिक पातळीवर जरी विभागणी झाली तरी दारू बंदीला सरसकट पाठींबा मिळणे अवघड होते. पण अशी दरी कश्यामुळे तयार होतेय, याचा विचारसुद्धा आवश्यक आहे.
एक तर गावात सामाजिक बांधिलकी, शेजारधर्म वगेरे मानणारे लोक कमी होत जाताहेत. अश्या परिस्थितीत गरीब आणि कमकुवत व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाना असुराक्षितता वाटणे साहजिक असते. माझ्या घरी प्रसंग आला तर मला मदत करणारे सक्षम लोक आणि तश्या वृत्ती नाहीत, हे पहिल्यांदा गरिबाला जाणवते, हे कोणीही मान्य करेल. त्यांतून कडेगावमध्ये होणारे शहरीकरण इथल्या गरिबांना म्हणावा असा आर्थिक फायदा किंवा संधी देत नाही, हे वास्तव आहे. एकूणच, कडेगावमधली शहरीकरणाची प्रगती सगळ्यांना समान फळ न देता गरीब आणि श्रीमंत अशी दरी जास्त वाढवणारे जाणवत आहे. अश्यावेळी सामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबांमध्ये नैराश्य असणे आणि त्याची परिणीती व्यसनाधीनतेमध्ये होणे अपरिहार्य असते.
कडेगावमध्ये वरकरणी प्रगतीचा मुखवटा असला तरी सत्य परिस्थिती तितकीशी समाधानकारक नाही. इथले पारंपरिक उद्योग व कलाकार सध्या कोणत्याही आधाराशिवाय जगण्याचा प्रयत्न करताहेत. रोजंदारीवर काम करणारे आणि सामान्य कुटुंबातून आलेले लोक स्वतःच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण करू शकतील अशी साधने त्यांच्याकडे उरली नाहीत. आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे आलेल्या भांडवली विचारांनी तयार झालेल्या नैराश्यावर मात करायला बळ देणारे अध्यात्मिक विचार देणारी बहुजनांची अध्यात्मिक व्यवस्था कडेगावमधून जवळ जवळ घालवण्यात काही घटकांना यश आले आहेच. अश्या गोंधळाच्या परिस्थितीत ‘दारू’ हा पर्याय निवडणे हाच मार्ग योग्य, असे काही कमकुवत घटकांना वाटले तर तो त्यांचा दोष नाही. अर्थात, यामध्ये दारू पिणे या गोष्टीला समर्थन नसून दारू पिणाऱ्याला दिला जाणारा अनावश्यक दोष अधोरेखित केला आहे. दारूचे व्यसन हे चुकीच्या व्यवस्थेचा परिणाम म्हणून घेतले तर दोष देणार बोट आपल्याकडे येऊ शकते. कष्ट करणाऱ्याला योग्य मोबदला देवून त्याच्या सुरक्षेची तजवीज करणारे नैतिक धनी लोक आता हाताच्या बोटावर मोजण्याइतके राहिलेत, हे वास्तव मान्य केले आणि यावर उपाय शोधला तर खूप सारे सामाजिक प्रश्न सुटणार आहेत. पुरुषसत्ताक परिस्थिती असल्याने कौटुंबिक पातळीवर दारूमुळे त्रस्त महिलांनी कोणत्याही वाईट रूढीला विरोध करणे दुरापास्त आहे. त्यातून, मानसिक व शारीरिक आरोग्य आणि महिला सुरक्षा यासाठीच्या आवश्यक सुविधा आणि संस्था अजूनही कडेगावमध्ये नाहीत. अश्यावेळी ‘अबला’ बनवण्यात आलेल्या महिलावर्गाला दारूबंदी अपयशी ठरली म्हणून दोष देता येत नाही.
यात आणखी भर म्हणजे पुरुषी राजकारणाच्या बाळी ठरलेल्या गावातील स्त्रिया. कडेगावमध्ये अजूनही स्त्रियांचे खरेखुरे स्वाभिमानी नेतृत्व तयार होईल अशी परिस्थिती नाही. याला कारण राजकारणात असलेल्या व येवू पाहणाऱ्या स्त्रियांच्या सक्षमिकरणाकडे केलेले दुर्लक्ष. गावात भलेही महिलांसाठी अगदी उच्च शिक्षण देणारे संस्थान असले तरीही गावातून अजूनही महिला नेतृत्व म्हणावे असे तयार झालेलं नाही किंवा तसे जाणीवपूर्वक प्रयत्न झालेले नाहीत. दारूबंदीसाठी महिलांना मतदान करण्यासाठी दिलेले अधिकार हे एका अर्थाने महिलांना सामाजिक सुधारणेसाठी पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. पण, त्याला पोषक असे वातावरण कडेगावमध्ये तयार होऊ शकलेले नाही. या गोष्टीचा नकारात्मक परिणाम दारूबंदी आंदोलनावर झाला नसेल, अस फक्त कुणीतरी स्वार्थी राजकारणीच म्हणू शकतो.
अगदी गावातलं शेंबड पोर सुद्धा सांगेल की दारूबंदी झाली नाही याला मुख्य कारण म्हणजे गावाची विस्कटलेली घडी आणि ढासळलेली नैतिक चौकट. प्रत्येक गोष्टीत राजकीयीकरण करणारे स्वयंघोषित विद्वान, भरकटलेल्या युवा पिढीला त्यांच्या मुळापासून दूर करणारे आणि त्यांना नको तिथे वापरून घेणारे स्वार्थी मुखंड, गावाच्या सांस्कृतिक ठेव्याची जाणीव आणि किंमत कमी करणारे गलिच्छ प्रकार या व अश्या अनेक चुकीच्या गोष्टीतून कडेगाव अश्या अवस्थेला पोचले आहे की पूर्ण गावाने एकत्रित बसून यावर विचार करावा आणि मगच विस्कटलेली घडी बसवावी. मग दारूबंदीच काय इतरही अनेक प्रकारच्या सुधारणा होतील. “ ॐ सहनाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु । मा विद्विषावहै॥ ” हा श्वेताश्वतरोपनिषदाचा मंत्र कडेगावसाठी यशाचा मंत्र ठरू शकेल, यात शंका नाही.
कठोर प्रयत्नानंतरही दारूबंदी भले झाली नसेल, पण या दारूबंदीच्या निमित्ताने सामाजिक पातळीवर नेहमीपेक्षा जास्त चिंतन निश्चितच झाले आहे. याचे सकारात्मक परिणाम येत्या काळात निश्चित दिसतील. दारूबंदीच्या निमित्ताने ढवळून निघालेले गाव आणि त्यातील नागरिक, विशेषतः महिला नागरिक, यांच्या मनातील नैराश्य अनेक नव्या आंदोलनाला फुंकर घालणारे असले. तेवढी क्रांतीची ज्वाला इथल्या महिला वर्गात आणि कडेगावच्या पाण्यात निश्चितच आहे.
अर्थात, हे सर्व येणारा काळच ठरवेल !

कडेगावमध्ये दारूबंदी का झाली नाही?

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणुकीचे बिगुल: कोणाचे पारडे जड ?

कडेगाव: फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताचे  लक्ष लागून असलेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली जाण्याने

Close