‘पलूस-कडेगाव’चा विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये: संग्रामसिंह देशमुख0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: पलूस-कडेगावचा विकास करण्याची क्षमता भाजप मध्ये आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते व सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघामध्ये होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कॉंग्रेसचे दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांनी ७ तारखेस अर्ज दाखल केला आहे. पलूस-कडेगाव ही पोटनिवडणूक आता कॉंग्रेस आणि भाजप मध्ये थेट लढत असणारे.

संग्रामसिंह देशमुख यांनी आज भाजपच्या जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील अनेक नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कडेगाव तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी झालेल्या सभेस बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्व कार्यकर्ते अचानक सुचना मिळूनही स्वतःच्या खर्चाने आले आहेत, अश्या शब्दात देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत आभार मानले. काल दुपारी देशमुख यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर अत्यंत वेगात सोशल मिडिया व फोन यांचा वापर करून वेगात या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

कै. संपतराव देशमुख (अण्णा) यांच्यानंतर पृथ्वीराज देशमुख (बाबा) यांना त्रास देण्याचे किंबहुना आमचे घर संपवण्याचे प्रयत्न झाले पण आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्यावरील प्रेमामुळे आमच्या केसालाही धक्का लागला नाही, असे विधान त्यांनी केले.

जि प. ला संधी मिळाली तर मी संधीचे सोने करून दाखवले आणि सांगली जिल्हा परिषद राज्यात आघाडीवर नेली, असे त्यांनी सांगितले. १९९५ मध्ये मतदारांनी स्वाभिमानाने जगणे निवडले आणि मतदारसंघातील मक्तेदारीची सवय मोडीत काढली. भाजपचा एक कार्यकर्ता १०० कार्यकर्त्यांना भारी आहे , अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. पत्रकारांनी जिल्हा परिषदेमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी त्यांचेही आभार मानले. त्यांना भाजपचा उमेदवार म्हणून निवडल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले व पक्ष जो निर्णय घेईल तो पाळला जाईल, असे त्यांनी सांगितले.

देशमुख-लाड घराण्याचे मैत्रीपूर्ण सबंध असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. ही पोटनिवडणूक ‘भाजपचा विजय’ अशा अर्थाने लढून जिंकायची आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेस संजयकाका पाटील, सुधीर गाडगीळ, अतुल भोसले, विक्रम पाटील, विलासराव जगताप, अजित घोरपडे, शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख, राजाराम गरुड, चंद्रसेन देशमुख (भाऊ), धनंजय देशमुख तसेच भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

राजाराम गरूड यांनी प्रास्ताविक केले तर धनंजय देशमुख (भैय्यासाहेब) यांनी आभार मानले.

संग्रामसिंह देशमुख यांच्या उमेदवारीने ही पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार, अशी चर्चा मतदार संघात जोर धरू लागली आहे.

‘पलूस-कडेगाव’चा विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये: संग्रामसिंह देशमुख

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी: उद्या अर्ज दाखल करणार

कडेगाव: पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते उद्या अर्ज दाखल करतील

Close