‘पलूस-कडेगाव’ मध्ये सोशल मिडियावरची निवडणूक नक्की कोण जिंकणार? (विशेष लेख)0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस-कडेगावची पोटनिवडणूक प्रत्यक्षात जरी काही दिवसापूर्वी सुरु झाली असली तरी सोशल मिडीयावर ती खूप आधीपासून सुरु आहे. ‘आपल्या भागाचा नेता कोण?’ यासारखे पोल घेणे आणि त्याचे गणित व्हाटसप आणि फेसबुक वरून पुराव्यानिशी सगळीकडे सोडणे, झालाचं तर, वेगवेगळे ग्रुप्स आणि फेसबुकची पेजेस तयार करणे, या दोन प्रकारांना गेल्या दोन महिन्यात उधाण आले आहे. अर्थात, अजूनही काहीश्या धीम्या गतीचे इंटरनेट कनेक्शन आणि ते विकत घ्यायला लागणारा पैसा सामान्य माणसाच्या पाकिटाला परवडणारा नसल्याने यात थोडा फार चढ-उतार राहतो. परंतु, आपले माय-बाप तरुण मतदार यांच्या हातातले ते इटूकले-पिटुकले मोबाईल नावाचे यंत्र आणि त्यावरील व्हाटसप नावाचे ते गूढरम्य ‘आपलीकेशन’ अव्याहतपणे काम करत आहे.

पहाटेचे दोन-तीन तास सोडले तर डिजिटल इंडियाचा डिजिटल युवक अगदी जोशात सोशल मिडीयावर कार्यरत आहे. महत्वाचे म्हणजे आपल्या मतदारसंघातील हा मतदार गट आणि गटाच्या सदस्यांचे ‘मोबाईल’ वरचे जगणे याची पूर्ण जाणीव राजकीय पक्षांना निश्चित आहे. विशेषतः, मोदी सरकारच्या सत्तेत येण्यामागे सोशल मिडीयाने दिलेले योगदान जेव्हा सर्वत्र समजले तेव्हापासून सर्वच राजकीय पक्ष निश्चितच याबाबतीत जागरूक झालेत. पण फक्त जागरूक होऊन भागत नसते. सोशल मिडीयाला वेगळेच कायतरी लागते, ते आपल्या उमेदवारांकडे आणि त्यांच्या पक्षाकडे आहे का?

सोशल मीडियाची व्याप्ती आणि क्षमता खूप मोठी आहे. परंतु याच्या प्रभावी वापरासाठी अत्यंत विचारपूर्वक धोरण आखावे लागते व ते लक्षपूर्वक राबवावे लागते.  सोशल मिडियाला संकल्पनात्मक पोस्ट तयार करण्यासाठीचे लेखन किंवा चित्ररूपी संदेश तयार करण्याची कला यासाठी समाजाची नाडी माहीत असणारे तज्ञ जरुरी असतात. ही बुद्धिवादी जमात दुर्मिळ असते आणि त्यांचा आणि राजकीय व्यक्तींचा संपर्क कमी असतो. जे राजकीय पक्ष सोशल मिडियाचा विशिष्ट पद्धतीने वापर करून मतदारांच्या विचार प्रक्रियेवर नियंत्रण घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी होतात, त्यांच्याकडे निश्चितच असे मनुष्यबळ असते आणि त्यासाठी लागेल तेवढा खर्च करण्याची त्यांची तयारी पण असते.

शहरी भागाच्या तुलनेत सोशल मिडिया वापराच्या पद्धती ग्रामीण आणि निम-शहरी भागामध्ये काहीश्या वेगळ्या दिसतात. यामध्ये पोस्ट तयार करण्यामधील किंवा चित्र तयार करण्यामधील युक्ती किंवा वैचारिक खोली तुलनेने कमी जाणवते. त्यापेक्षा, लोकांसमोर सतत पोस्ट रुपात दिसणे यावर जास्त भर असतो. यामुळेच गेले काही दिवस पलूस-कडेगावच्या सोशल मिडीयावर एका पक्षाच्या व्यक्तीने एक पोस्ट टाकली की दुसऱ्या पक्षाचा व्यक्ती जवळपास तशीच दुसरी आपल्या नेत्याची पोस्ट टाकून स्कोअर समान करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यातून फक्त आपल्या नेत्याला आणि त्यांच्या मुख्य कार्यकर्त्यांना आपण करत असलेले काम दिसू शकते, किमान प्रयत्न जाणवल्याशिवाय राहत नाही. परंतु, हे करत असताना आपण सामान्य जनतेला किंवा ग्रुप वरील सुज्ञ व्यक्तींना अनावश्यक त्रास देतोय का? हे पोस्ट टाकणाऱ्या कार्यकर्त्याच्या लक्षात येत नाही. आणि त्यातूनही आपल्या पोस्टचा मतदारांवर आणि त्यांच्या विचार प्रक्रीयेवर नक्की कसा परिणाम होतोय याचा अजिबात विचार केला जात नाही.  नेमक इथेच घोडं पेंड खातं!

 

सोशल मिडीयावर सामान्य मतदारांनी घालवलेला वेळ सत्कारणी लागावा आणि आपला मुद्दा किंवा विकास कल्पना, ध्येय-धोरणे जर सुज्ञ मतदारांपर्यंत पोचवायची असतील तर सोशल मिडीयाच्या वापरातही उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे, कार्यशैलीचे, सुसंस्कृतपणाचे, आणि वेगवेगळ्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकांचे प्रतिबिंब पडणे आवश्यक असते. अगदी थोडक्यात सांगायचे तर सोशल मिडिया हे मुख्य प्रचार व्यवस्थेतील एक उपयुक्त ‘हत्यार’ म्हणून पाहणे आवश्यक आहे. म्हणजेच, नियमित सभा आणि जनसंपर्क याला जोड म्हणून सोशल मिडीयाचा चांगला वापर होऊ शकतो. अर्थात, याला सोशल मिडिया नीती ठरवणे आणि तश्या पद्धतीचे मनुष्यबळ किंवा सेवा विकत घेणे खूप आवश्यक असते. उमेदवारांच्या कोअर टिम कडे याची जबाबदारी असते आणि त्यात सुजाण कार्यकर्त्यांची हजेरी असणे आवश्यक असते.

पलूस-कडेगावची सध्याची पोटनिवडणूक सोशल मिडीयावर सुद्धा जोर धरत आहे. हळू हळू अत्यंत वेगळ्या पद्धतीचे सोशल मिडिया युद्ध पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्या विरोधकांवर चिखलफेक करणे हा प्रकार आता अगदी सामान्य म्हणून पहिला जाते. टीकेची पातळीसुद्धा दिवसेंदिवस घसरत आहे. कारण, सोशल मिडीयावरील तरुण कार्यकर्ते वैचारिक भांडण आणि पुरावे देवून मुद्दे मांडणे, असले प्रकार करताना कमी आढळतो. अश्या अवस्थेत आपल्या धडाडीच्या तरुण कार्यकर्त्यांकडून चुका होतायत का, हे बघणे सुद्धा आवश्यक आहे. पण, तशी यंत्रणा सध्यातरी समोर दिसत नाही.

भाजप सारखा पक्ष स्वतःकडे सोशल मिडिया वापराचे विशेष पथक घेऊन प्रचारात उतरतो, ही गोष्ट आता सर्वश्रुत आहे. सुरवातीला भलेही मागे पडले असले तरीही कॉंग्रेस पक्षानेही सोशल मिडीयावर भर दिला आहे. इतकेच नव्हे तर स्वीय सहाय्यक किंवा विशेष सोशल मिडिया पदाधिकारी वगेरे नियुक्त्यासुद्धा करण्यात आल्या आहेत. परंतु, हे सर्व असतानाही अजूनही सोशल मिडीयाचा धोरणात्मक आणि वैचारिक पद्धतीने केलेला वापर अत्यंत कमी पाहायला मिळत आहे. यामुळेच, सोशल मिडीयावर कोण जिंकणार, हे अजूनही सांगता येत नाही. किंबहुना तसे सांगता येणेसुद्धा अवघड असते. कारण, सोशल मिडीयाचा प्रभाव आणि वेग इतका असतो की अगदी एका दिवसात चित्र पलटू शकते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या युद्धात जिंकण्याची शक्यता निश्चितच असते.

परंतु, याचवेळी हाही मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे की २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांनी स्वतःच्या विचाराने मतदान करण्याची पद्धत समोर आली आहे. त्यामुळे, अगदी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमध्ये किंवा कुटुंबव्यवस्थेमध्ये महिलांची मते मिळवणे यासाठी एकूण प्रचाराची आणि सोशल मीडियाची नीती अत्यंत विचारपूर्वक ठरवणे आवश्यक आहे. एकूणच, तरुणाई सोबत महिला मतदार हे थोडे अंदाज बांधताना घोळ होण्यास निश्चितच कारण ठरू शकतात. अर्थात, सोशल मिडीयाचा प्रभावी वापर या दोन गटांना प्रभावित करण्यासाठी चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. विशेषतः, महिलांना सभांना बाहेर येणे जास्त शक्य नसल्याने सोशल माध्यमांचा वापर करून या मतदार गटाशी संवाद साधने उपयुक्त ठरू शकते.

पलूस कडेगावच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे उमेदवार हे तरुण असल्याने आणि प्रकट अर्थाने तरुणाईच्या गळ्यातला ताईत असल्याने सोशल मिडीयावर सुद्धा ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. पण, यात विजयी कोण झाले हे अगदी शेवटीच ठरणार आहे. तोपर्यंत फक्त कोण, कसा, चातुर्याने सोशल मिडीयाचा वापर करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल !

 

लेखक: डॉ. गोविंद धस्के

 

© डॉ. गोविंद धस्के, २०१८. सर्वाधिकार सुरक्षित.

‘पलूस-कडेगाव’ मध्ये सोशल मिडियावरची निवडणूक नक्की कोण जिंकणार? (विशेष लेख)

by डॉ. गोविंद धस्के वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भाजप नेत्यांच्या उपस्थितीत संग्राम देशमुख यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल

कडेगाव: भाजपतर्फे आज पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्यसाठी भाजपचे जिल्हा तसेच महाराष्ट्रातील

Close