आता कसं ? बाळासाहेब म्हणतील तसं…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

विशेष संपादकीय

अवघ्या मऱ्हाठी मुलखात चर्चेत राहिलेली पलूस-कडेगाव विधानसभेची पोट निवडणूक काल संपन्न झाली. दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम – ज्यांना ‘साहेब’ म्हणून सर्वत्र आदराने ओळखले जाते – त्यांचे सुपुत्र आणि भागाच्या विकासात नवा अध्याय लिहू पाहणारे डॉ. विश्वजीत कदम यांची बिनविरोध निवड झाली. डॉ. विश्वजीत कदम यांना त्यांचे बहुतेक सर्व कार्यकर्ते व मतदार ‘बाळासाहेब’ या नावाने ओळखतात. कालच्या विजयाच्या घोषणेनंतर एका उत्साही कॉंग्रेस कार्यकर्त्याने अत्यंत समर्पक पद्धतीने “आता कसं ? बाळासाहेब म्हणतील तसं…!!!” अशा शब्दात सोशल मिडीयावर अभिनंदनाची ललकारी दिली. ही ललकारी जितकी प्रकट, सयुक्तीक तितकीच ती मार्मिक सुद्धा आहे. याला कारण आहे साहेबांच्या आकस्मिक निधनानंतर ज्या पद्धतीने डॉ. विश्वजीत कदम यांनी कौटुंबिक, सामाजिक पातळीवर जबाबदाऱ्या खांद्यावर घेतल्या आणि राजकीय पातळीवर आपले नेतृत्व कौशल्य दाखवले, तो अस्सल सोनहिरा खोऱ्याचा धडाडी बाणा.

एका बाजूला पितृ निधनाचे दुःख पेलताना त्यांनी भावविवशता बाजुला ठेवून भागाच्या विकासाची जबाबदारी साहेबांइतक्याच जबाबदारीने उचलली.  इतक्या लवकर आणि इतक्या अचानक त्यांना राजकारणात उतरावे लागेल आणि जबाबदारी अंगावर पडेल असे पलूस-कडेगाव मतदारसंघातील कोणालाही वाटले नव्हते. असे असतानाही, बाळासाहेबांची ज्या वेळेस राजकीय मंचावर ‘एन्ट्री’ झाली तेव्हा ते अत्यंत कुशल, प्रभावी व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व असणारे, सुशिक्षित आणि काहीतरी चांगलं घडवू पाहणारे जबाबदार राजकारणी जाणवले. याला कारण, साहेबांचे संस्कार, कदम घराण्याची सामाजिक विकासाची बांधिलकी, उच्चशिक्षणाचा आणि नियोजनाचा प्रत्यक्ष अनुभव, आणि युवक कॉंग्रेसमधील यशस्वी वाटचाल ! बाळासाहेबांचे राजकीय भविष्य त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि त्याही पुढे घेऊन जावू शकते, असा विश्वास जितका त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे तितकाच तो साहेबांच्या मुशीत विकसित झालेल्या सुज्ञ मतदारांनाही आहे.

साहेबांचे सुशिक्षित आणि सुज्ञ राजकारण आणि त्या जोडीला धडाडीचा विकास रथ – या परंपरेत तयार झालेले बाळासाहेब भागाच्या विकासात आघाडी घेण्यात कमी पडणार नाहीत, यात शंका नाही.  विकास घडवणे हे जितके आव्हानात्मक असते तितकेच आव्हानात्मक असते विकास टिकवणे आणि तो वाढवणे. बाळासाहेबांच्यावर  आता जबाबदारी आहे ती विकास वाढवण्याची. विविध जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची साहेबांची परंपरा बाळासाहेब पुढे घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी त्यांच्या सभांमधून जनतेला दिला आहे. सध्या गरज आहे ती साहेबांनी उभ्या केलेल्या साम्राज्यामध्ये मधल्या आणि वरच्या फळीमध्ये वेगवेगळ्या सामाजिक समुदायातील पुरोगामी, साहेबांच्या विचारांच्या आणि मूल्यांच्या मुशीत तयार झालेले, आणि भविष्यातील राजकारणात बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली योगदान देवू शकतील, अश्या सुशिक्षित-सुजाण मंडळीना संधी देवून, सोबत घेऊन विकास रथ पुढे नेण्याची. अर्थात, बदलत्या काळात विकासाची नवी आव्हाने बाळासाहेबांची परीक्षा घेतीलच, पण त्यासाठी बाळासाहेब तयार आहेत, हे त्यांच्या चाहत्यांना निश्चितच माहित आहे.

साहेबांच्या अकाली जाण्यानंतर अनेक प्रकारचे युक्तिवाद आणि शक्यता दिल्या जात होत्या. परंतु, त्या सर्व गोष्टीना बाळासाहेब पुरून उरले. धडाडीचे काम करणाऱ्या साहेबांचा ‘राजकीय वारसदार’ म्हणून त्यांनी छाप पाडली.  जसे साहेबांचे चाहते आणि आदर करणारे बहुसंख्य सामान्य नागरीक आहेत तश्याच पद्धतीने बाळासाहेबांना मानणारे बहुसंख्य कार्यकर्ते व नागरीक सुद्धा आहेत. अगदी त्यांच्या लहानपणापासून भागातल्या तरुण वर्गात त्यांचा वेगळा असा एक चाहता वर्ग आहे, तोच आता मतदार म्हणून समोर येत आहे.

साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युवक कॉंग्रेसची धुरा खांद्यावर घेणे आणि ती व्यवस्थित सांभाळून दाखवणे हे काम बाळासाहेबांनी अत्यंत यशस्वीपणे महाराष्ट्राला आणि कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दाखवून दिले आहे. या पोट निवडणूकीच्या घडामोडी सुरु असताना कॉंग्रेसच्या शिखर नेतृत्वाने बाळासाहेबांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देवू केली होती. परंतु, त्यांनी ती नाकारली आणि पलूस-कडेगावच्या विकासामध्ये कार्यरत राहण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली. ज्या मातीशी आणि लोकांशी नाळ जोडली आहे त्यांच्या विकासासाठी काम करेन, असे उद्गार त्यांनी काढले.  हे सर्व समजू शकणारी आणि राजकीय तसेच सामाजिक जाणीवा विकसित झालेली जनता साहेबांच्या आणि ‘आता’ बाळासाहेबांच्या मतदार संघात निश्चितपणे आहे. असं म्हणतात की-People Get the Government They Deserve-अगदी याच अर्थाने भागातल्या लोकांना त्यांना हवा तसा आमदार बाळासाहेबांच्या रूपाने  मिळाला आहे.

पोट निवडणुकीची उद्घोषणा झाल्यानंतर सुरवातीच्या काही सभांमध्ये बाळासाहेबांनी अत्यंत समर्पक शब्द वापरत कॉंग्रेस कार्यकर्त्यांना सांगितले होते की कदम घराण्याच्या विकास परंपरेला मोहनराव कदम (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्यास ते समर्थ आहेत. सभा ज्यांनी पहिली आणि बाळासाहेबांचे तब्बल अर्धा तास केलेलं भाषण ऐकले,  त्यांना निश्चितच जाणवले होते की बाळासाहेब आता नव्या आत्मविश्वासाने आव्हानांना समोर जात आहेत. एखाद्या अनुभवी  राजकारण्यासारखे त्यांनी भविष्यातील राजकारणाची दिशा, पोट निवडणुकीतील भूमिका, टिम वर्क ची मुल्ये आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या होत्या. त्या भाषणाच्या शेवटी काहीजण आपसूक बोलून गेले की बाळासाहेब महाराष्ट्राला चांगले नेतृत्व देण्याची क्षमता ठेवतात. असे उत्स्फूर्तपणे मनातून आणि हृदयातून आलेले सामान्य माणसांचे, कार्यकर्त्यांचे  विचार ही बाळासाहेबांच्या विकास उर्जेला आणि त्यांच्या नेतृत्वाला निसर्गाने दिलेली पोचपावतीच आहे.

आपल्या कुशल नेतृत्वाने राजकीय गड सर करायला जे-जे आवश्यक आहे ते-ते सर्व बाळासाहेबांच्याकडे आहे. आता फक्त गरज आहे ती जनतेला सोबत घेऊन विकासाचा नवा अध्याय लिहिण्याची. कोणी कितीही युक्तिवाद केला आणि गप्पा-गोष्टी सांगितल्या तरी आता जे काय होणार ते बाळासाहेबांच्या विकास दृष्टीचा परिणाम आणि साहेबांची विकास परंपरा म्हणून होणार !

आता कसं ? बाळासाहेब म्हणतील तसं…!!!

आता कसं ? बाळासाहेब म्हणतील तसं…!!!

by डॉ. गोविंद धस्के वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डॉ. विश्वजीत कदम ‘पलूस-कडेगाव’चे आमदार: पोटनिवडणूक अखेर बिनविरोध

कडेगाव: संपूर्ण राज्याची उत्कंठा शिगेला पोचवणारी म्हणून ज्या निवडणुकीस पहिले जाते ती पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक अखेर डॉ. विश्वजीत कदम

Close