काला-चित्रपट नव्हे तर क्रांतीपट: चेतन सावंत0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मागच्या आठवड्यातच बहुचर्चित पा. रंजिथ दिग्दर्शित सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला ‘काला’ हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा फक्त टिपिकल सिनेमा धरतीवरचा नसून त्याहीपुढे जाऊन तो अनेक प्रकारची भाष्ये करतो. तरीही अजूनही मिडियामध्ये या पिक्चरची पुरेशी चर्चा दिसत नाही.

प्रस्थापित समीक्षकांकडून काला चित्रपटावर जाणीवपूर्वक मौनव्रत पाळलं जातंय. कदाचित, चित्रपटातील रूपकात्मक शैली आणि त्यातील राजकीय भूमिका ही त्यांना एकतर कळली नसावी किंवा ती जर जनमानसात पोहचली तर आंबेडकरी चळवळीला आणखी बळ येईल ह्या भीतीने लिहीत नसावे. ते काहीही असले तरी काला निश्चितच त्याचे मिशन पूर्ण करत आहे यात शंका नाही.
मुळात आपण सिनेमा हा फक्त मनोरंजन म्हणून पाहतो त्यात चुकीचंही काही नसतं. परंतु, काही मोजके सिनेमे असतात त्यांना काहीतरी सांगायचं असत किंवा वास्तवाचं प्रतिबिंब त्यात असत. काला याच पठडीतला असून अजून चार पावलं पुढं जाऊन अक्षरशः प्रेक्षकांच्या मनाला भिडल्याशिवाय रहात नाही.
कालामध्ये दिग्दर्शकाने स्वतःच अस समाजशास्त्र आणि रचनाशास्त्र ठळकपणे दाखवलंय. सिनेमात रजनीकांतची एन्ट्री होते, त्या पहिल्याच सिनमध्ये ‘भीमवाड़ा ‘ ,बुद्ध विहार, गौतम बुद्ध, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा स्पष्टपणे दिसतात. पेरियार यांचा पुतळादेखील नजरेस पडतो.

अशा अनेक सिम्बॉलीक गोष्टींचा पा. रंजिथ ने अफलातून पद्धतीने वापर केला आहे. सध्याच्या भारतीय राजकारणात आणि समाजकारणात ज्या पद्धतीने सिम्बोलची हेळसांड केली जाते त्या सिम्बोलिक हिंसेला प्रगल्भपणे काला उत्तर देत आहे.

कालाची कथा धारावी, मुंबईतील झोपडपट्टी, SRA च वास्तव, बिल्डर या व अशा गोष्टींवर भाष्य करताना श्रमाच महत्व, आंबेडकरी चळवळ व त्यांचा संघर्ष यावर भाष्य करता करता सर्वात महत्वाच म्हणजे ‘पॉलिटिकल मेसेज ‘ देतो जे की भारतीय सिनेमांमध्ये फारच क्वचितच आपणास आढळते.

नागराज मंजुळे नंतर आता पा. रंजिथ यांनी गुळगुळीत व टिपिकलपणा यात अडकलेल्या सिनेमासृष्टीला समाजातील लुम्पेन क्लास ,सर्वहारा, वंचित, दलित यांच जगणं, जातवास्तव आपल्या रचनाशास्त्र व सौदर्यशास्त्रातून पाहायला भाग पाडलय. कालावरून अजूनएक गोष्ट अधोरेखित होतेय ती म्हणजे सिनेमांची गाडी अभिनेत्यावरून दिग्दर्शकांकडे सरकतेय.

कालात अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काला म्हणजेच रजनीकांत यांच्या एका मुलाचं नाव ‘लेनिन’ असत. काला व लेनिन यांचं साध्य एकच परंतु, साधन वेगवेगळे असतात. एके ठिकाणी, काला लेनिन ला उद्देशून म्हणतो की “दो-चार किताबे पढकर तुम जैसे क्रांती की भाषा करते हो !” जणू काही कालाच्या या एका वाक्याने भारतातील डाव्या चळवळीचा परामर्ष घेतला असावा असेच प्रेक्षकांना वाटून जाते.

काला चा प्रत्येक सीन तुमच्याशी संवाद साधतो अन तोही गंभीरतेने फक्त गरज असते ती तुमच्या प्रगल्भतेची आणि डोळसपणाची.

या सगळ्या समीक्षेच्या नादात आपणाकाडून एका अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तीला दुर्लक्षून नाही चालणार ती म्हणजे कालाचा निर्माता धनुष. कारण, पा. रंजिथ ला संपूर्ण स्वातंत्र्य देणारी व्यक्ती ही महत्त्वाची आहे. प्रयोग करायला दिग्दर्शक तयार असतात पण निर्माते रिस्क घेत नाहीत. धनुषणे ती घेऊन आपली कंमिटमेंट सिद्ध केलीय. एकूणच, काला च्या निमित्ताने दिग्दर्शन, अभिनय, आणि निर्मिती या तिन्ही क्षेत्रात आता विशिष्ट जातींनी आणि वर्गाने सुरु ठेवलेली दादागिरी संपवण्याची क्रांती सुरु झालीय यात शंका नाही. येणाऱ्या काळात भारतीय मेंदूतील बर्जात्या-चोपडा-कपूर आदींनी तयार केलेली गुलाबी सिनेमाची छबी काला अगदी त्याच रंगाने रंगवून निषेध नोंदवत आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये.

काला जर पूर्णपणे अनुभवायचा असेल तर डोळे “ऍक्रॉस दि स्क्रीन” फिरविणे अपरिहार्य आहे. काला हा आपण पाहायलाच हवा पण टायटल लक्षात असु द्या. कारण त्यातच सगळे सार भरले आहे.

लेखक: चेतन सावंत

छाया सौजन्य: www.firstpost.com

काला-चित्रपट नव्हे तर क्रांतीपट: चेतन सावंत

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
२०१८ चा वसुंधरा अवॉर्ड सोनहीरा साखर कारखान्याला

वांगी: यंदाचा महाराष्ट्र नियंत्रण प्रदुषण मंडळाकडून दिला जाणारा वसुंधरा अवॉर्ड सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण

Close